सशस्त्र क्रांतीचा आदर्श भारतीय तरुणांसमोर ठेवणारे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा १७ फेब्रुवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने...
१९व्या शतकाच्या उत्तरार्धात ज्यांच्या नावाचा ब्रिटिशांनी, अन्यायी सावकारांनी धसका घेतला होता, ते व्यक्तिमत्त्व म्हणजे वासुदेव बळवंत फडके! दुष्काळाच्या काळात गरिबांची कष्टाची कमाई हिरावून घेणार्या सावकार-धनिकांच्या घरांवर झडप घालून, त्यांच्याकडील धनाचा विनियोग सशस्त्र क्रांतिकार्यासाठी करणारे आद्य क्रांतिकारक म्हणजे वासुदेव बळवंत फडके हे होत. १७ फेब्रुवारी हा त्यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने त्यांच्या अतुलनीय कार्याचा हा परिचय.
वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म चार नोव्हेंबर १८४५ रोजी रायगड जिल्ह्यातील शिरढोण गावी झाला. वयाच्या सातव्या वर्षापासून त्यांच्या शिक्षणाची सुरुवात झाली. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके लहानपणापासूनच तडफदार व्यक्तिमत्त्वाचे होते. शिक्षणात त्यांचे मन विशेष रमले नाही. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी प्राथमिक शाळेत प्रवेश केला. पुढील शिक्षणासाठी ते पुण्याला आले. तिथे त्यांनी इंग्रजीचे शिक्षण घेतले. त्यांनी रेल्वेत लिपिक म्हणून नोकरी केली. त्यानंतर १८६४मध्ये ते लष्कराच्या वित्त विभागात दाखल झाले. आर्थिक अडचणींमुळे त्यांना नोकरी करणे भाग पडले. म्हणून मुंबईमध्ये प्रथम मिलिटरी अकाउंट्स विभागात व त्यानंतर ग्रॅंट मेडिकल कॉलेजात त्यांनी नोकरी केली; पण याच काळात ते अचानकपणे आजारी पडले. त्यांना प्रचंड ज्वराने ग्रासले होते. त्यांना मुंबईची हवा मानवत नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे होते. त्यामुळे पुढे ते पुणे येथे नोकरी करू लागले. ही नोकरी करत असताना १८६५ साली त्यांची आई खूप आजारी असल्याचे त्यांना समजले. त्यांनी वरिष्ठांकडे रजेचा अर्ज केला; पण तो नामंजूर झाला. तरी आईच्या ओढीने ते आपल्या गावी, शिरढोणला पोहोचले. तत्पूर्वीच त्यांच्या आईने या जगाचा निरोप घेतला होता. इथेच त्यांच्या मनात असंतोषाची पहिली ठिणगी पडली.
पुढील वर्षी आईच्या वर्षश्राद्धालाही रजा नाकारली गेल्याने उद्विग्न अवस्थेत त्यांनी याचा प्रतिशोध घेण्याचे ठरवले. दरम्यानच्या काळात न्यायमूर्ती रानडे यांच्या 'स्वदेशी'वरील व्याख्यानाचा त्यांच्यावर खोलवर प्रभाव पडला व त्यांच्यातील देशभक्तीचा अंगार अधिकच फुलू लागला. ते स्वदेशीच्या प्रचारासाठी फिरू लागले, व्याख्याने देऊ लागले. याच काळात त्यांनी आपली आध्यात्मिक साधनाही सुरू केली होती. त्यांना काही काळ अक्कलकोट स्वामींचा सहवासही लाभला. स्वदेशप्राप्तीसाठी नुसती भाषणे व व्याख्याने पुरेशी नाहीत. त्यासाठी बालपणापासूनच विद्यार्थ्यांवर तसे संस्कार होणे गरजेचे आहे, असा विचार करून त्यांनी सन १८७४मध्ये पुणे नेटिव्ह इन्स्टिट्यूटची स्थापना केली. यातूनच त्यांनी पुढे पुण्यात सुप्रसिद्ध झालेले भावे विद्यालय सुरू केले. या पद्धतीने राष्ट्रीय शिक्षणाचा पायाच जणू त्यांनी घातला.
ब्रिटिशांच्या दडपशाहीची आणि पारतंत्र्याची जाणीव त्यांच्या मनात जागृत होतीच. त्यातूनच त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड पुकारले. त्यांनी गावोगाव भटकत ब्रिटिशांविरुद्ध असंतोष निर्माण करत बंडाची पार्श्वभूमी तयार केली. दरम्यान, महाराष्ट्राला दुष्काळाने घेरले. विहिरी, नद्या, नाले सुकून गेले. गावेच्या गावे ओस पडली. परिस्थिती इतकी विकोपाला गेली, की प्रेतांच्या अंत्यविधीसाठी पैसे नसल्याने कुत्र्या-गिधाडांसाठी प्रेते ठेवून लोकांना पुढे जावे लागे. यातच देवीच्या साथीची भर पडली आणि इंग्रजांच्या छळालाही सीमा उरली नाही. त्यातूनच पुढे फडके यांनी सरकारच्या विरोधात काहीतरी करायचा निर्णय घेतला. या काळात वासुदेव फडके लहुजी वस्तादांकडे दांडपट्टा, इतर शस्त्रे, मल्लविद्या व घोडेस्वारी शिकण्यास जात होते. या काळातच त्यांनी रामोशी समाजाला संघटित केले. रामोशी जमातीच्या बहुसंख्य लोकांकडे पूर्वी प्रामुख्याने गडरक्षणाचे काम होते; पण गड व किल्ले इंग्रजांनी खालसा केल्यामुळे ते रानोमाळ भटकत असत. या रामोशी समाजाला (तसेच काही भिल्ल लोकांनाही) सोबत घेऊनच त्यांनी सशस्त्र बंडाची तयारी सुरू केली.
जे धनिक, सावकार गरिबांचे शोषण करून धनाढ्य झाले होते, त्यांच्याकडून स्वराज्यप्राप्तीसाठी परतीच्या बोलीवर पैसे घ्यायचे आणि त्यांनी दिले नाहीत, तर ते लुटायचे अशा मार्गाचा अवलंब करून त्यांनी आपल्या बंडाचे पहिले निशाण धामारी या गावी २३ फेब्रुवारी, १८७९ रोजी फडकवले. त्यानंतर जवळजवळ ४-५ वर्षे बंडाचे कार्य नियमितपणे प्रामुख्याने पुणे व सातारा जिल्ह्यात सुरू होते. या बंडामुळे फडकेंचे नाव लंडनपर्यंत पोहोचले होते. हे बंड करत असताना त्यांनी ब्रिटिशविरोधी जाहीरनामाच प्रसिद्ध केला होता. सशस्त्र क्रांतीचा मंत्र देऊन, बहुजन समाजाला सोबत घेऊन, आपल्या अतुल पराक्रमाने इंग्रजी साम्राज्याला शह देणार्या वासुदेवरावांनी शिवछत्रपतींप्रमाणे स्वराज्यप्राप्तीचा यथाशक्ति प्रयत्न केला. यांच्या कार्यातूनच व बलिदानातून असंख्य क्रांतिकारकांनी, स्वातंत्र्यसेनानींनी प्रेरणा घेतली व पुढील काळात स्वातंत्र्यप्राप्तीसाठी विविध मार्गांनी प्रयत्न केले.
पुण्याच्या जवळपास असलेल्या खडकवासला, हवेली, सोनापूर, कोटवाडी, सिंहगड परिसर या भागात वासुदेव सेनेचा अप्रत्यक्ष अंमल सुरु झाला होता. त्यांचा बंदोबस्त करण्यासठी सरकारने मेजर डॅनियल याची नेमणूक केली. त्याला वासुदेव फडके यांनी निम्म्या महाराष्ट्रभर फिरवले. पुढे त्यांनी गाणगापूर येथे काशीकरबुवा या नावाने काही काळ भूमिगतपणे काम केले. आपली अध्यात्मसाधना त्यांनी सुरूच ठेवली होती. या ठिकाणीच त्यांनी रोहिल्यांना एकत्र करून, त्यांची भाडोत्री सेना घेऊन इंग्रजांविरुद्ध लढण्याचा प्रयत्नही केला. ब्रिटिश त्यांचा पाठलाग हरतर्हेने करत होते. फितुरांचा, स्थानिक पोलिसांचा आधार घेत होते. वासुदेव फडक्यांनी पोलिसांना अक्षरश: झुंजवले; पण अखेर बेळगाव व कोल्हापूर यांच्या मध्ये असलेल्या कदलगी येथे त्यांना अटक झाली. त्यांना काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी जानेवारी १८८०मध्ये एडन येथे स्थानबद्ध करण्यात आले. एडनमध्ये असताना त्यांना पाणी चामड्याच्या पखालीने पुरवले जाई. याविरुद्धही वासुदेवरावांनी आवाज उठवला. त्यानंतर त्यांना कोलू फिरवून तेल गाळून घेण्याचे काम दिले गेले. अशा अवस्थेतून त्यांची सुटण्याची धडपड सुरू होतीच. त्यातच १२ ऑक्टोबर १८८० रोजी ते बेड्या तोडून तुरुंगातून पळाले; पण लवकरच त्यांना पुन्हा पकडण्यात आले. त्यानंतर त्यांची रवानगी एकांतवासात झाली. या काळातच त्यांना क्षयरोगानेही ग्रासले. पुढे या आजारात तुरुंगातच १७ फेब्रुवारी १८८३ रोजी त्यांचे निधन झाले.
(संकलित)
Comments 1 Comments
Sharad Godbole
खुप छान माहिती दिली आहे सुंदर लेख
Write a Comment