कृतज्ञता : आनंदी राहण्याचा उत्तम उपाय

माझिया मना- लेख क्रमांक-४

कृतज्ञता : आनंदी राहण्याचा उत्तम उपाय मुख्य फोटो
कृतज्ञता : आनंदी राहण्याचा उत्तम उपाय अतिरिक्त फोटो

आपल्या सगळ्यांनाच आनंदी राहायला आवडते, पण नेहमी आनंदी राहता येत नाही. ज्या चांगल्या सवयी रोज सराव करून करता येतात, तशीच रोज आनंदी राहण्याची पण सवय लावावी लागते.

सकाळी उठल्याबरोबर आपण काय विचार करतो?

"आज खूप काम आहे...", "पुन्हा ट्रॅफिक...", "मुलांचा अभ्यास...", "ऑफिसची डेडलाईन...", "बिझनेसची काळजी..." नुसती नकारात्मकता. आपल्या दिवसाची सुरुवात अनेकदा तणावाने होते. गंमत म्हणजे दिवसभरात अनेक चांगल्या गोष्टी घडतात, पण दिवस संपताना लक्षात राहतात त्या फक्त अडचणी! आणि त्याच दुसऱ्या दिवशी सकाळी आठवतात.

यामागे एक महत्त्वाचे मानसशास्त्रीय कारण आहे. आपल्या मेंदूमध्ये Negativity Bias असतो. म्हणजेच, मेंदू धोक्याच्या, समस्यांच्या आणि नकारात्मक अनुभवांच्या गोष्टी अधिक पटकन लक्षात ठेवतो. ही सवय आपल्या पूर्वजांना जगण्यासाठी उपयोगी होती; पण आजच्या जीवनात तीच सवय अनेकदा आपल्या आनंदाच्या आड येते.

यावर एक साधा, विनामूल्य आणि प्रभावी उपाय आहे – कृतज्ञता (Gratitude).

सकारात्मक मानसशास्त्राचे जनक मानले जाणारे डॉ. मार्टिन सेलिगमन आणि अनेक संशोधकांनी असे आढळून आणले आहे की, नियमित कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या व्यक्तींमध्ये आनंद, मानसिक शांतता, आशावाद आणि नातेसंबंधांची गुणवत्ता अधिक चांगली असते. कृतज्ञता म्हणजे समस्या नाकारणे नाही; तर समस्यांसोबतही जीवनातील चांगुलपणा पाहण्याची क्षमता विकसित करणे.

एकदा कल्पना करा... काही लोकांच्या आयुष्यात एकामागोमाग एक संकटे येतच असतात, पण जर त्यांनी दिवसाच्या शेवटी स्वतःला एकच प्रश्न विचारला – "आज माझ्यासोबत कोणती एक चांगली गोष्ट घडली?" – तर त्यांच्या मनाची दिशा बदलू लागते.

कदाचित उत्तर असेल...

"आज मुलाने मला मिठी मारली."

"सहकाऱ्याने मला मदत केली."

"आज एका ग्राहकाने माझ्यावर विश्वास दाखवला."

हे क्षण छोटे असतात; पण त्यांच्यात मोठा आनंद दडलेला असतो.

सध्या Gratitude Journal बद्दल पण बरंच बोललं जातं. हे जर्नल म्हणजे नेमकं काय? Gratitude Journal म्हणजे दररोज फक्त दोन मिनिटे स्वतःसाठी काढून, त्या दिवशी ज्या तीन गोष्टींसाठी आपण कृतज्ञ आहोत त्या लिहिणे.

उदाहरणार्थ –

आज मी निरोगी उठलो.

आईने प्रेमाने जेवण बनवले.

मित्राने माझी विचारपूस केली.

ही सवय आपल्या मेंदूला हळूहळू चांगल्या गोष्टी शोधण्याचे प्रशिक्षण देते. काही आठवड्यांतच अनेकांना अधिक शांत, समाधानी आणि सकारात्मक वाटू लागते.

आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो.

Gratitude journal कोणीही लिहू शकतं. त्याला कोणतेच नियम किंवा अटी नाहीत. तुम्ही पण हे आनंद देणारे प्रयोग करून बघू शकता.

प्रयोग १ – "तीन गोष्टींचे आभार"

आज रात्री झोपण्यापूर्वी तीन गोष्टी लिहा, ज्याबद्दल तुम्ही मनापासून कृतज्ञ आहात.

हे सलग सात दिवस करा आणि तुमच्या विचारांमध्ये काय बदल होतो ते स्वतः अनुभवून पाहा.

प्रयोग २ – "धन्यवादाचा एक फोन"

आज तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधल्या एका व्यक्तीला फोन करा किंवा संदेश पाठवा आणि फक्त एवढेच सांगा – "तुम्ही माझ्या आयुष्यात आहात याबद्दल धन्यवाद."

तुमच्या चेहऱ्यावर आणि समोरच्या व्यक्तीच्या मनात उमटणारा आनंद तुम्हाला जाणवेल.

प्रयोग ३ – "तक्रार थांबवा"

एक दिवस असा घालवून पाहा की प्रत्येक तक्रारीऐवजी एक चांगली गोष्ट शोधून बघा.

उदा. "आज पाऊस आहे" ऐवजी "आज निसर्ग ताजातवाना झाला आहे."

प्रयोग ४ – "स्वतःचे आभार"

दररोज सकाळी आरशात पाहून स्वतःला सांगा –

"माझ्या प्रयत्नांसाठी मी स्वतःचा आभारी आहे." ही छोटी सवय आत्मविश्वास वाढवते.

प्रयोग ५ – "कुटुंबातील कृतज्ञता"

रात्रीच्या जेवणाच्या वेळी प्रत्येकाने त्या दिवसातील एक चांगली गोष्ट सांगायची.

फक्त पाच मिनिटांचा हा संवाद घरातील वातावरण बदलू शकतो.

कृतज्ञता व्यक्त केली की मनावर कोणत्याही गोष्टीचे किंवा इतरांच्या वागण्याचे दडपण येत नाही आणि आपल्या मनातील साठलेल्या गोष्टींचा रोजच्या रोज निचरा करता येतो. खरं तर आनंद हा मोठ्या यशात, महागड्या वस्तूंमध्ये किंवा भविष्यकाळात लपलेला नसतो. तो आपल्या रोजच्या छोट्या क्षणांमध्ये, नात्यांमध्ये आणि "धन्यवाद" म्हणण्याच्या सवयीत दडलेला असतो.

आजपासून फक्त एक चांगली सवय लावा. दररोज तीन गोष्टींसाठी मनापासून कृतज्ञ राहा.

कदाचित काही दिवसांनी परिस्थिती तशीच असेल; पण ती पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदललेला असेल. अनेकदा आयुष्य बदलण्याची सुरुवात परिस्थिती बदलण्यापासून होत नाही, तर दृष्टिकोन बदलण्यापासून होते.

"कृतज्ञ मनात तक्रारींसाठी जागा कमी आणि आनंदासाठी जागा जास्त असते." तुम्ही हे प्रयोग करा आणि छान अनुभव आला की इतरांनाही करायला सांगा. नकारात्मक व्यक्तीसोबत राहून कसं आपल्याला नकारात्मक वाटू लागतं, तसंच सकारात्मकतेकडेही एकाकडून दुसऱ्याकडे जाता येऊ शकतं. तुम्ही त्यात एक मध्यम मार्ग शोधू शकता.

ही तर झाली आपल्यापासून करायची सुरुवात. पण अशा अनेक प्रश्नांसाठी, समस्यांसाठी आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला एखाद्या मित्राची किंवा मार्गदर्शकाची गरज पडते. काळजी करू नका! 'अमृत मानस मित्र' आहे ना! हा एक असा ऑनलाइन मित्र आहे ज्याला तुम्ही तुमच्या सर्व अडचणी विचारू शकता, त्याच्याशी बोलू शकता आणि समुपदेशकांना भेटू शकता. आता तुम्ही एकटे नाही आहात. अमृत मानस मित्र तुमच्या सोबत सदैव आहे.

—डॉ. मीताली मोरे

औद्योगिक मानसशास्त्रज्ञ आणि करिअर मार्गदर्शक

अमृत मानस मित्र समिती सदस्य.


माझिया मना- लेख-क्र.१ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

'आनंद' हा योगायोग आहे की सवय?

https://amrutmaharashtra.org/news.php?id=1953

माझिया मना- लेख-क्र.२ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती घडवूया ..

https://amrutmaharashtra.org/news.php?id=2036

माझिया मना- लेख-क्र.३ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

मानसिक आरोग्याचे वाढते संकट : भारतीय गुरुकुल परंपरा, प्राणायाम आणि ध्यान हा शाश्वत मार्ग

https://amrutmaharashtra.org/news.php?id=2163

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 10-07-2026 News publication date | Time: 11:40 AM News publication time | Views: 97 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 10-07-2026 News publication date | Time: 11:40 AM News publication time | Views: 97 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 2 Comments

S
Sharad Godbole
10-07-2026 09:21 PM

सर्व लेखमाला खुपचं छान आहेत.आयुष्यकडे बघण्याचा दृष्टीकोन अश्या लेखमाला मधुन निश्चित साध्य होईल.अमृत महाराष्ट्र चे अभिनंदन

माधुरी बनसोड
10-07-2026 12:59 PM

अगदी बरोबर,नेमके मुद्दे सांगितले आहेत.

Write a Comment
0 / 50 words
Advertisement