पराक्रमी आणि धोरणी चिमाजीअप्पा

पेशवाईवरील लेखमालेतील नववा लेख...

पराक्रमी आणि धोरणी चिमाजीअप्पा मुख्य फोटो
मुख्य फोटो

मागील लेखात आपण पराक्रमी आणि मुत्सद्दी पेशवे अर्थात नानासाहेब पेशवे यांच्याविषयी माहिती घेतली. महाराष्ट्रभाट अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी नानासाहेब पेशव्यांबरोबच पेशवे घराण्यातील आणखी एका पराक्रमी योद्ध्याचा उल्लेख केला आहे, ते म्हणजे चिमाजीअप्पा. या लेखात आपण पेशव्यांसाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या याच पराक्रमी आणि मातब्बर सेनानीविषयी जाणून घेणार आहोत. 

चिमाजीअप्पा यांचा जन्म १७०७ साली झाला. चिमाजीअप्पा म्हणजे बाळाजी विश्वनाथ यांचे पुत्र व पहिले बाजीराव यांचे धाकटे बंधू. बाजीरावांना पेशवाई मिळाल्यानंतर चिमाजीअप्पा यांना सरदारकी मिळाली. काही वर्षे त्यांनी अंबाजी त्रिंबक पुरंदरे यांच्यासह सातार्‍याला पेशव्यांचा वकील म्हणून काम केले. तसेच काही वेळा त्यांना मोहिमांवर जावे लागे. त्यांनी केलेल्या पहिल्या मोठ्या मोहिमेत आमझरे येथे झालेल्या लढाईत त्या वेळचा माळव्याचा मुघल सुभेदार गिरिधर बहादूर व त्याचा नातेवाईक दया बहादूर यांना ठार करून सबंध माळवा आपल्या ताब्यात आणला (१७२८) आणि तो शिंदे, होळकर व पवार या तीन सरदारांत वाटूनही टाकला. त्यानंतर १७२९मध्ये पावसाळा संपल्यानंतर गुजरात प्रांतात चौथाई वसूल करण्यासाठी म्हणून चिमाजीअप्पा यांची स्वारी झाली. चिमाजीअप्पांच्या पराक्रमामुळे तेथील मुघल सरदार सरबुलंदखानाने शरणागती पत्करून मराठ्यांच्या चौथाई व सरदेशमुखीचे हक्क कबूल केले. त्यानंतर त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या आदेशानुसार कोकणात मराठी राज्याला त्रास देणार्‍या जंजिरेकर सिद्दीचा बंदोबस्त करण्यासाठी १७३६ साली कोकणात स्वारी केली. या स्वारीत सिद्दीला ठार केले व कोकणात कायमचा वचक बसवला. त्या वेळी बाजीराव उत्तरेत होते. ते परत येत असताना निजामाने भोपाळजवळ त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी चिमाजीअप्पांनी निजामाला दक्षिणेतून येणारी मदत बंद करून जेरीस आणले. तेव्हा तो बाजीरावांना शरण आला. 

चिमाजीअप्पा इतिहासात अजरामर आहेत ते वसईच्या लढाईमुळे. खरे तर अनेक परकीय आक्रमकांना पहिल्या बाजीराव पेशव्यांनी जवळजवळ सबंध हिंदुस्थानात थोपवून धरले होते. वसईमध्ये मराठ्यांचा मुकाबला होणार होता तो पोर्तुगीजांशी. हे पोर्तुगीज व्यापाराच्या निमित्ताने भारतात आले. पुढे ते राजकारणात आले. राज्य प्राप्त झाल्यावर त्यांची धर्मांधता दिसू लागली. पोर्तुगीज जवळजवळ ५०० वर्षे या भूमीवर होते. हिंदुस्थानातील पोर्तुगीजांच्या राज्याचे दोन भाग होते - दक्षिण फिरंगाण आणि उत्तर फिरंगाण. दक्षिण भागात गोव्यापर्यंतचा भूप्रदेश येतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात पोर्तुगीजांना बंध घातला होता. नंतर छत्रपती संभाजी महाराजांनीही त्यांना शह दिला. त्यांच्या मृत्यूनंतर मात्र मधल्या काळात महाराष्ट्रात बऱ्यापैकी अस्थिरता होती. त्यानंतर पोर्तुगीजांना पहिला शह दिला तो पहिल्या बाजीरावांनी. 

उत्तर फिरंगाणमध्ये पोर्तुगीजांचे महत्त्वाचे शहर होते वसई. त्या वेळच्या ठाणे शहराला तटबंदी घालण्याचा निर्णय पोर्तुगीजांनी घेतला होता. हे करत असताना तिथल्या स्थानिक लोकांना सक्तीने या कार्यात सहभागी करून घेण्यासाठी त्यांनी नागरिकांवर अनेक निर्बंध घातले. जो ख्रिश्चन धर्म स्वीकारेल, त्यालाच शहरात राहता येईल, असाही एक नियम पोर्तुगीजांनी केला. या व्यतिरिक्त एखाद्या हिंदू धर्मीयाच्या वारसाला त्याच्या वडिलांच्या संपूर्ण संपत्ती हवी असेल त्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारावा, असाही एक भयानक नियम त्यांनी केला. अशा अनेक अन्यायकारक निर्बंधांमुळे तेथील हिंदू जनता त्रस्त झाली होती. त्या वेळी गंगाजी अंजनूरकर हे या भागातील हिंदूंचे नेतृत्व करत होते. त्यांनी पेशव्यांकडे यासंबंधीचे गाऱ्हाणे घातले होते. त्या वेळी पहिले बाजीराव पेशवे उत्तरेतील मोहिमेमध्ये व्यग्र होते. त्यामुळे ही मोहीम थोडी लांबणीवर पडली. नंतर मात्र या मोहिमेचे नेतृत्व चिमाजीअप्पांकडे आले. चिमाजीअप्पा, शंकराजी फडके, जंजिरा मोहिमेवेळी आपले कर्तृत्व गाजवणारे होनाजी बलकवडे, खंडोजी मल्हार यांनी संपूर्ण मोहिमेची रचना केली. फडक्यांच्या नेतृत्वाखालील सैन्याने वसईवर हल्ला करावा, त्याच वेळी खंडोजी व होनाजी यांनी साष्टी म्हणजेच ठाण्यावर हल्ला करायचा अशी योजना तयार करण्यात आली. त्याप्रमाणे ३० मार्च १७३७ रोजी मराठ्यांचे सैन्य वसई आणि ठाण्यात आले. ३१ मार्च १७३७ या दिवशी होनाजींनी जमिनीवरून आणि खंडोजी यांनी पाण्याच्या बाजूने अर्थात पाणकोटावरून चढाई केली. पोर्तुगीजांच्या ताब्यातील ठाण्याचा हा किल्ला त्यांनी एका दिवसात ताब्यात घेतला. वसईकडे गेलेल्या सैन्याच्या तुकडीने आक्रमण केले; मात्र वसईचा हा किल्ला अभेद्य होता. प्रथम मराठ्यांना मोठा प्रतिकार सहन करावा लागला. मराठ्यांनी वसईच्या किल्ल्याला वेढा दिला. याचदरम्यान १७३८मध्ये बाजीराव आणि निजाम यांच्यात संघर्ष सुरू झाला. त्यामुळे चिमाजीअप्पा आणि त्यांच्या काही सैनिकांना वसईतून बाहेर पडावे लागले. नेमकी त्याच वेळी पोर्तुगीजांना पोर्तुगाल आणि गोव्याकडून जास्तीची कुमक मिळाली. परिस्थिती थोडी बिकट झाल्याने चिमाजीअप्पांना १७३९मध्ये पुन्हा वसईला यावे लागले. 

मराठ्यांकडे आधुनिक शस्त्रे नव्हती. त्यांच्याकडे होते ते मनुष्यबळ. पोर्तुगीजांकडे मात्र आधुनिक तोफा, बंदुका होत्या. या सगळ्याचा परिणाम म्हणजे वसईच्या या संघर्षात मराठ्यांचे जास्त मनुष्यबळ कामी आले. असे असले, तरी वसईचा हा किल्ला ताब्यात घ्यायचा आणि ही मोहीम फत्ते करायची असा निर्धार चिमाजीअप्पांनी केला होता. पोर्तुगीजांना गोव्याहून मिळणारी रसद तोडण्यासाठी व्यंकटराव घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली मोठे सैन्य वसईत पाठवले गेले. चिमाजीअप्पा इतक्या निर्धाराने हा लढा लढत होते, की 'वसईचा किल्ला जिंकता येत नसेल तर मला तोफेच्या तोंडी द्यावे, जेणेकरून माझे मुंडके तरी किल्ल्यात जाईल,' असे त्यांचे उद्गार होते. शेवटी मराठ्यांच्या या प्रखर प्रतिकाराने पोर्तुगीज नामोहरम झाले आणि त्यांनी वसईचा तह केला. हा तह झाल्याने पोर्तुगीजांना आठ शहरे, चार बंदरे, २० किल्ले, दोन पहाडी किल्ले आणि ३४० गावे मराठ्यांना द्यावी लागली, अशीही एक नोंद आहे. पोर्तुगीजांचे राज्य यामुळे गोव्यापर्यंतच मर्यादित राहिले. पोर्तुगीज मुंबईपर्यंत आले नाहीत. त्यामुळे तेथील मूळ संस्कृती टिकून राहिली. याचे श्रेय जाते पहिले बाजीराव पेशवे आणि चिमाजीअप्पा यांना! 

त्यानंतर नानासाहेब पेशवे यांना घेऊन चिमाजीअप्पा उत्तरेच्या स्वारीवर निघाले. चिमाजीअप्पांना क्षयाचा त्रास होता. त्यात या सर्व दगदगीमुळे त्यांची तब्येत अतिशय बिघडून १७ डिसेंबर १७४० रोजी एदलाबाद येथे त्यांचे निधन झाले. पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात त्यांची समाधी आहे. चिमाजीअप्पा हे काही बाबतीत थोरल्या बाजीराव पेशव्यांपेक्षा श्रेष्ठ, तसेच शूर, धोरणी व मनमिळाऊ होते. बाजीरावांच्या अनुपस्थितीत घर आणि खासगी कारभार त्यांनी अत्यंत कौशल्याने सांभाळले. वसईच्या किल्ल्यात सापडलेल्या एका फिरंग्याच्या मुलीला त्यांनी सन्मानाने पाठवल्याची हकीकत प्रसिद्ध आहे. चिमाजीअप्पा यांची पहिली पत्नी रखमाबाई. तिच्यापासून त्यांना तीन ऑगस्ट १७३० रोजी सदाशिव नावाचा मुलगा झाला. त्यानंतर काही दिवसांतच रखमाबाईंचे निधन झाले. सदाशिवरावभाऊंनी पुढे १७६१ साली पानिपतच्या तिसर्‍या युद्धात पराक्रम गाजवला. अन्नपूर्णाबाई ही चिमाजीअप्पांची दुसरी पत्नी. चिमाजीअप्पांच्या निधनानंतर त्या सती गेल्या. 

त्या काळात पेशवे आणि मराठे यांना एकाच वेळी मुघल, इंग्रज, पोर्तुगीज, तसेच जाट, राजपूत यांसारखे काही स्वधर्मीय यांच्याशी लढा द्यावा लागत होता. याशिवाय महाराष्ट्राचा राज्यकारभार, अंतर्गत कुरबुरी, परिवारातून कधीकधी होणारा विरोध यालाही तोंड द्यावे लागत होतेच. असे असतानाही पेशवे किंवा त्यांच्या कोणत्याही सरदारच्या कर्तृत्वावर कोणताही विपरीत परिणाम झाला नाही. चिमाजीअप्पा हे तर नि:स्वार्थ बुद्धीचे उत्तम उदाहरण होते. आपण स्वत: किंवा पुत्र सदाशिवरावभाऊ केव्हाही पेशवा बनणार नाही, हे ठाऊक असूनही ते कायमच पेशवाईशी एकनिष्ठ राहिले. मराठ्यांच्या राजकारणाला उत्तराभिमुख बनवून मराठा साम्राज्यविस्ताराला चालना देण्यात बाजीराव पेशव्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते आणि चिमाजींचे सारे जीवितकार्य त्याला पूरक होते. आपल्या बंधूप्रमाणेच राजकारण आणि रणांगण यांचा उत्तम मेळ त्यांनी साधला. असे पराक्रमी, शूर, धोरणी शिलेदार म्हणजे चिमाजीअप्पा. स्वत: पेशवेपदी विराजमान झाले नस,ले, तरी पेशव्यांना अभिमान वाटेल असे कर्तृत्व त्यांनी गाजवले. 

पुढील लेखात आपण अशाच आणखी एका पराक्रमी पेशव्यांच्या कार्याचा आढावा घेऊ या. 

(क्रमश:)

(संदर्भ : मराठी रियासत - खंड क्र. ३, मराठी विश्वकोश, इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे यांचे ‘स्वराज्य ते साम्राज्य - वसई मोहीम’ हे व्याख्यान.)

(या लेखमालेतील आधीचे लेख खालील लिंकवर वाचता येतील.)

१. पानिपतची लढाई म्हणजे शौर्याचे प्रतीक... पराभवाची गाथा नव्हे!

२. पानिपत लढाईची पार्श्वभूमी - पूर्वार्ध

३. पानिपत लढाईची पार्श्वभूमी - उत्तरार्ध

४. मराठेशाहीचे स्वातंत्र्ययुद्ध आणि पेशवाईचा उदय

५. पेशवेकालीन महाराष्ट्र - भाग १ 

६. पेशवेकालीन महाराष्ट्र - भाग २

७. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ

८. पराक्रमी आणि मुत्सद्दी नानासाहेब पेशवे




Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 11-03-2026 News publication date | Time: 01:55 AM News publication time | Views: 151 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 11-03-2026 News publication date | Time: 01:55 AM News publication time | Views: 151 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words