पराक्रमी आणि मुत्सद्दी नानासाहेब पेशवे

पेशवाईवरील लेखमालेतील आठवा लेख...

पराक्रमी आणि मुत्सद्दी नानासाहेब पेशवे मुख्य फोटो
मुख्य फोटो

या लेखमालेच्या मागील भागात आपण पहिले पेशवे अर्थात बाळाजी विश्वनाथ यांच्या कार्याची माहिती घेतली. या लेखात आपण थोरल्या बाजीरावांचे पुत्र म्हणजेच नानासाहेब पेशवे यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती जाणून घेणार आहोत.

दशरथ देऊनि राज्यश्रीसी रामलक्ष्मणाचिया करी ।

प्रभात तारा देऊनि जाई कांति आपुली सूर्यकरी ।

तशीच बाजीराये हिंदु - स्वातंत्रयाची ध्वजा दिली ।

या नरवीरा नानांच्या या भाऊंच्या दुर्दात करि ।।

महाराष्ट्रभाट अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नानासाहेब पेशव्यांविषयी लिहिलेल्या ओळी किती सार्थ आहेत ना! बाजीरावांचे निधन महाराष्ट्रासाठी धक्कादायक होते. त्याचप्रमाणे शाहू महाराजांनाही या घटनेने मोठा हादरा बसला होता. आता पेशवेपद कोणाला द्यावे, हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न होता. तेव्हा बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब यांनी त्यांचे लक्ष वेधले. खरे तर लहानपणापासूनच नानासाहेब छत्रपती शाहू महाराजांच्या जवळ होते. त्यामुळे त्यांच्या दरबारातून नानासाहेबांना राज्यकारभाराचे धडे मिळत होते. चिमाजीअप्पा म्हणजेच बाजीराव पेशव्यांचे भाऊ शाहू महाराजांच्या दरबारी ‘मुतालिक’ म्हणजे कारभारी म्हणून कार्य करत होते. त्यांच्याबरोबर नानासाहेबही तिथेच होते. साहजिकच राज्यकारभार, अष्टप्रधान मंडळ, त्यांची रचना, कार्ये या सगळ्याचे धडे नानासाहेबांना मिळत होते. त्यामुळेच छत्रपती शाहू महाराजांनी नानासाहेबांना वयाच्या १९व्या वर्षी पेशवेपदाची धुरा दिली. 

नानासाहेबांचा जन्म १२ डिसेंबर १७२१ रोजी झाला आणि २५ जून १७४० रोजी त्यांना पेशवाईची वस्त्रे मिळाली. वडिलांच्या निधनानंतर अवघ्या चारच महिन्यांत चिमाजीअप्पा यांचे निधन झाले. बाजीरावांच्या पश्चात चिमाजीअप्पा हेच नानासाहेबांच्या अगदी जवळचे होते. त्यामुळे एकीकडे या दोघांच्या निधनाचे अतीव दु:ख होते, तर दुसरीकडे मराठ्यांच्या सर्व शत्रूंना उत्साह आला होता. या शत्रूंनी चौफेर उठाव केले. बाजीरावांनी ज्या माळवा, बुंदेलखंड भागात मराठ्यांचे वर्चस्व निर्माण केले होते, त्याच भागात त्यांच्या मृत्यूनंतर बंड पुकारले गेले. तेथील स्थानिक संस्थानिकांनी मराठ्यांचे वर्चस्व स्वीकारण्यास नकार दिला. जसे हे आव्हान उत्तर भारतात निर्माण झाले, तसेच दक्षिणेतसुद्धा उठाव होऊ लागले. नानासाहेब पेशव्यांनीही आव्हान स्वीकारले. 

नानासाहेब पेशव्यांनी उत्तर आणि दक्षिण भागात अनेक मोहिमा आखल्या. त्यांनी उत्तर हिंदुस्थानात एकूण चार स्वाऱ्या केल्या. १७४०मध्ये माळवामधील मोहिमेसाठी त्यांनी पुण्याहून कूच केले. पुढे धार, देवास, तसेच नर्मदा नदीच्या उत्तरेकडील भागावर पुन्हा मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले. तिथे त्यांनी शिंदे, होळकर आणि पवार असे सरदार ठेवले. त्यानंतर १७४१मध्ये त्यांनी निजामाशी चर्चा केली व त्याला मराठ्यांना सहकार्य करण्यास तयार केले. निजाम हा मुघलांचा सर्वांत मुत्सद्दी नेता होता. त्याच्याशी चर्चा करून त्याला राजी करणे, हे नानासाहेब पेशव्यांच्या परिपक्व राजकारणाचे उदाहरण होते. नानासाहेबांच्या तिसऱ्या स्वारीत त्यांनी भोपाळच्या नवाबावर पुन्हा आपले वर्चस्व स्थापित केले. भोपाळचे निम्मे संस्थान आणि जबलपूरचा भाग पुन्हा मराठा साम्राज्यात आणला. १७४७मध्ये नानासाहेबांनी चौथी स्वारी केली, ही स्वारी राजस्थानातील होती. तेथील जाट, राजपूत राजे सात ते आठ वर्षे मराठ्यांना चौथाई देत नव्हते. याशिवाय जयपूर आणि जोधपूर येथील भावाभावांच्यात वाद निर्माण झाले होते. मराठे हे त्यांचे एकप्रकारे पालक होते, म्हणून हा वाद मिटवण्यासाठी नानासाहेब तिकडे गेले होते. त्यांच्यातील वाद मिटवून त्यांनी तिथे पुन्हा स्थैर्य निर्माण केले. 

हे सगळे होत असताना त्याच वेळी दिल्लीच्या बादशहाला नादिरशहाचे फर्मान आले. त्याआधीच्या काळात बाजीरावांच्या भीतीने नादिरशहा भारतातून माघारी निघून गेला होता. पुन्हा एकदा त्याने भारतावर चाल करण्याचा बेत आखला होता. दिल्लीच्या बादशहाने मराठ्यांना बोलावले. नानासाहेबांना दिल्लीदरबारी सन्मानपूर्वक येण्याचे आमंत्रण दिले गेले. नानासाहेब दिल्लीत पोहोचल्यावर त्यांचा तिथे मोठा सत्कार झाला. ज्या मुघलांच्या दरबारी छत्रपती शिवाजी महाराजांची अवहेलना झाली होती, मराठ्यांना आपले शत्रू मानले होते, तोच दिल्ली दरबार आज त्यांच्या मदतीसाठी मराठ्यांकडे याचना करत होता! हेच तर मराठ्यांचे शौर्य होते. नानासाहेबांनी मुघल बादशहाला मदतीचे वचन दिले. १७४८मध्ये नादिरशहाची हत्या झाली आणि दिल्लीवरचे संकट तात्पुरते टळले. त्याच्यानंतर इराणच्या गादीवर विराजमान झाला अहमदशहा अब्दाली. त्याने भारतावर आक्रमणाची योजना आखली. या वेळीही मराठे दिलेल्या शब्दाला जागले. इतिहासात अजरामर झालेल्या पानिपतच्या लढाईत मराठे निकराने लढले. 

नानासाहेबांच्या उत्तरेतील स्वाऱ्यांविषयी आपण माहिती घेतली. परंतु नानासाहेब पेशवे यांनी दक्षिण भारतातही स्वाऱ्या केल्या आहेत. आरकाट, कडप्पा, करनूर, हिरा आणि सावनूर असे दक्षिणेत मुघलांचे एकूण पाच सुभे होते. काही हिंदू संस्थानिकांची छोटी-छोटी संस्थानेही होती. बाजीरावांनी तिथे मराठ्यांचे वर्चस्व निर्माण केले होते आणि तेथील चौथाई व सरदेशमुखीचे अधिकार मिळवले. बाजीरावांच्या निधनानंतर उत्तरेप्रमाणेच तिथेही उठाव झाले. श्रीरंगपट्टण येथे तेथील सेनापती हैदरअली याने उठाव केला. नानासाहेब पेशवे यांनी १७४७मध्ये सदाशिवरावभाऊ, फत्तेसिंगराव भोसले, रघोजी भोसले, बाबूजी नाईक यांना दक्षिणेत पाठवले. त्याच सुमारास आरकाटच्या नवाबाने तंजावर, त्रिचनापल्ली येथे आक्रमण केले. नानासाहेबांच्या या शूर सरदारांनी तंजावर मुक्त केले. त्रिचनापल्लीचा किल्ला पुन्हा जिंकून घेतला. आरकाटही ताब्यात घेतले. एवढेच नाही, तर उत्तरेतील मोहिमा संपवून आल्यावर स्वत: नानासाहेब यांनी पाच स्वाऱ्या दक्षिणेत केल्या. पहिली स्वारी १७५३ रोजी श्रीरंगपट्टण येथे केली. तेथे हैदरअलीचा पराभव केला. त्याने मराठ्यांचे आधिपत्य पुन्हा एकदा मान्य केले. दुसरी स्वारी १७५४मध्ये बागलकोट व सावनूर येथे केली. तो भाग पुन्हा मराठ्यांच्या आधिपत्याखाली आणला. तिसरी स्वारी १७५५मध्ये बिदनूरला केली. चौथी स्वारी पुन्हा एकदा श्रीरंगपट्टण आणि पाचवी स्वारी हिरा व कडाप्पा. या सगळ्या सुभ्यांमध्ये पुन्हा एकदा मराठ्यांचे नियंत्रण आले. 

नानासाहेब यांचे हे कार्य खूप मोठे आहे. बाजीरावांनंतर नानासाहेब पेशवे यांनी पुन्हा एकदा मराठा वर्चस्व निर्माण केले. त्यांच्याच काळात आसेतुहिमाचल म्हणजेच हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत मराठ्यांचे एकसंध साम्राज्य निर्माण झाले. नानासाहेब पेशवे यांनी धार्मिक आणि प्रशासकीय कार्येसुद्धा मोठ्या प्रमाणावर केलेली आहेत. जमिनीचा दर्जा पाहून जमीन महसुलाचे दर आखण्यात आले, वाहतुकीचे मार्ग सुधारले आणि महाराष्ट्राचा व्यापार वाढवला, शेती सुधारली. परक्यांचे आक्रमण थांबल्यामुळे आणि बाहेरून चौथाईच्या रूपाने येणाऱ्या द्रव्याने महाराष्ट्र समृद्ध झाला. नानासाहेबांनी नियोजनबद्ध पद्धतीने स्वराज्याचा केवळ विस्तारच केला नाही, तर स्वराज्य आर्थिकदृष्ट्या मजबूत केले. अंतर्गत प्रशासकीय, व्यवस्थापन, कायदेव्यवस्था, शिस्तबद्ध आर्थिक व्यवस्था, नवनवीन आर्थिक स्रोतांना उत्तेजन, स्वराज्याच्या उन्नतीला अनुसरून ठरविलेले परराष्ट्रीय धोरण, कला व व्यापाराला चालना, शेतीला प्राधान्य, सेना उभारणी, सैनिकांच्या कुटुंबाची व्यवस्था, नगरविकास, धार्मिक स्थळांना संरक्षण, नदीवरील घाट, पाणीपुरवठा यावर जातीने लक्ष ठेवून उल्लेखनीय कामगिरी बजावली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भारतातील समाजासाठी सर्वसमावेशक धोरण अनुसरून स्वराज्य सार्वभौम केले. २३ जून १७६१ रोजी त्यांचे निधन झाले. अशा या पराक्रमी, कार्यतत्पर, मुत्सद्दी आणि चतुर पेशव्याने मराठ्यांचा भगवा ध्वज चारही दिशांना फडकवला. 

लेखमालेच्या पुढील भागत आपण आणखी एका अशा पराक्रमी पेशव्यांची कारकीर्द जाणून घेऊ या. 

(क्रमश:)

(संदर्भ : हिंदूपदपादशाही - स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित पुस्तक; ज्येष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे यांची प्रसाद प्रकाशनाने घेतलेली मुलाखत)

(या लेखमालेतील आधीचे लेख खालील लिंकवर वाचता येतील.)

१. पानिपतची लढाई म्हणजे शौर्याचे प्रतीक... पराभवाची गाथा नव्हे!

२. पानिपत लढाईची पार्श्वभूमी - पूर्वार्ध

३. पानिपत लढाईची पार्श्वभूमी - उत्तरार्ध

४. मराठेशाहीचे स्वातंत्र्ययुद्ध आणि पेशवाईचा उदय

५. पेशवेकालीन महाराष्ट्र - भाग १ 

६. पेशवेकालीन महाराष्ट्र - भाग २

७. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 04-03-2026 News publication date | Time: 03:55 AM News publication time | Views: 125 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 04-03-2026 News publication date | Time: 03:55 AM News publication time | Views: 125 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words