पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ

पेशवाईवरील लेखमालेतील सातवा लेख...

पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ मुख्य फोटो
मुख्य फोटो

मागील लेखात आपण पेशवेकालीन महाराष्ट्राची माहिती घेतली. मुळात पेशवेपदाची खरी सुरुवात झाली ती बाळाजी विश्वनाथ यांच्यापासून. शाहू महाराजांना राज्य मिळाल्यानंतर त्यांनी श्रीवर्धनचे बाळाजी विश्वनाथ भट यांना बोलावले. तेव्हापासून बाळाजी विश्वनाथ यांच्या कुटुंबाला प्राधान्य देऊन उत्तरोत्तर मराठेशाहीचा कारभार विस्तारत गेला. यालाच ‘पेशवाई’ या नावाने ओळखले जाते. पेशव्यांच्या राज्यकारभारातील सहभागामुळे पुढे अनेक ब्राह्मण घराणी युद्धाचा पेशा पत्करून राज्यकारभारात आली. पहिले पेशवे म्हणून बाळाजी विश्वनाथ प्रसिद्ध झाले असले, तरी त्यांच्या अंगभूत बुद्धिमत्तेमुळे त्यांनी या पदाचा महिमा मोठा केला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. या लेखात आपण बाळाजी विश्वनाथ यांच्या सुभेदारी घराण्यापासून त्यांच्या पेशवेपदापर्यंतचा आणि पेशवे झाल्यावर त्यांनी गाजवलेल्या पराक्रमाचा आढावा घेणार आहोत. 

छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्राचा पश्चिम किनारा ताब्यात घेतला आणि मराठा आरमार निर्माण केले. पश्चिम किनारपट्टीवर चित्पावन ब्राह्मणांची पुष्कळ वस्ती होती. कान्होजी आंग्रे आणि सिद्दी यांच्यात या किनारपट्टीवर सतत संघर्ष होत होता. त्यामुळे त्यांच्या चुरशीत तेसुद्धा सहभागी झाले. अशा प्रकारे कोकणातील ब्राह्मणांचा देशावर येण्यास प्रारंभ झाला. बाळाजी विश्वनाथांचे घराणे दीर्घ काळ सिद्दीच्या राज्यात श्रीवर्धन येथे होते. तिथे त्यांना त्या परगण्याची देशमुखी दिलेली होती. त्यांना तत्कालीन वेळी देसाई किंवा देशमुख असे नाव होते. ही देशमुखी पंधराव्या शतकाच्या अखेरीस भटांच्या घराण्यात आली. बाळाजी विश्वनाथ साधारण इसवी सन १६८९च्या सुमारास घाटावर आले असावेत. छत्रपती राजारामांच्या काळात ते पुण्याच्या सरसुभेदारीवर होते.

बाळाजी विश्वनाथांचा जन्म १६६०च्या आसपास झाला. शाहू महाराज बादशहाच्या कैदेत असताना त्यांचा बाळाजींशी संबंध आला. हा परिचय ब्रह्मेंद्रस्वामी यांच्यामार्फत झाला असावा. त्यानंतर बाळाजी विश्वनाथांनी अनेक मोहिमा गाजवल्या. खंडो बल्लाळ चिटणीस आणि बाळाजी यांच्यामुळे खेडच्या लढाईत ताराबाईंचा पराभव झाल्यानंतर धनाजीने शाहू महाराजांचा पक्ष स्वीकारला. शाहू महाराजांनी बाळाजीचा पक्ष घेतल्यामुळे धनाजीचा मुलगा चंद्रसेन महाराणी ताराबाईंना मिळाला. अन्यही काही सरदारही ताराबाईंना जाऊन मिळाले. त्याच वेळी काही मुघल अधिकाऱ्यांनी शाहू महाराजांना विरोध करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे शाहू महाराज चहूबाजूंनी शत्रूंनी वेढले गेले होते. बाळाजीपंतांनी कर्जे काढून फौजा उभारल्या आणि कृष्णराव खटावकर, दमाजी थोरात, उदाजी चव्हाण यांच्यासारख्या पुंडांचा आणि छत्रपतींच्या इतर शत्रूंचा पराभव केला. सेनाकर्ते ही पदवी त्यांनी सार्थ केली. कान्होजी आंग्रे त्या वेळी ताराबाईंना जाऊन मिळाले आणि लोहगड घेऊन त्यांनी पुण्यावर स्वारी केली. शाहू महाराजांनी त्याचा बंदोबस्त करण्याकरिता पेशवा बहिरोपंत पिंगळे यांना पाठवले; पण पेशव्यांचा पराभव होऊन तेच कान्होजींच्या कैदेत पडले. अशा बिकट परिस्थितीत बाळाजीपंतांनी मुत्सद्देगिरीने कान्होजींना शाहू महाराजांच्या पक्षात ओढले आणि त्यांना सरखेलपद बहाल करवले.

त्यांच्या या पराक्रमामुळे १७ नोव्हेंबर १७१३ रोजी शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवाईची वस्त्रे दिली. जवाहीर, शिरपेच, तुरा, कंठी, चौघडा, ढाल, तलवार, शिक्के-कट्यार, साहेब नौबत, हत्ती, घोडे, जरीपटका अशी वस्त्रे दिली. त्याचप्रमाणे पाच महालांची सरदेशमुखी दिली. आबाजीपंत पुरंदरे यांना मुतालकी तर रामाजीपंत भानू यांना फडणीशी देण्यात आली. खरे तर इ. स. १७०७च्या खेडच्या लढाईपासून बाळाजी विश्वनाथ शाहू महाराजांसोबत होते. नंतर शाहू महाराजांच्या सत्तेला मान्यता आणि स्थैर्य बाळाजी विश्वनाथांनी मिळवून दिले. बाळाजी विश्वनाथांनी सय्यद बंधूंशी तह करून मुघल राजकारणात प्रवेश मिळवला. या प्रवेशामुळे बाजीराव पेशव्यांना उत्तरेकडे मराठी राज्याचा विस्तार करता आला. चौथ-सरदेशमुखीचे जे हक्क पेशव्यांनी मिळवले, ते वसूल करण्याच्या निमित्ताने मराठी फौजांचा संचार दक्षिणेत चहूकडे सुरू झाला व त्यांच्या वाढत्या पराक्रमाला वाव मिळाला. त्यामुळे पेशवाईसाठी त्यांची निवड सार्थ होती. बाळाजी विश्वनाथ यांची समयसूचकता, प्रगल्भता, आलेला प्रसंग धूर्तपणे निभावून नेण्याची क्षमता, स्वामीभक्ती यांमुळे लवकरच ते शाहू महाराज यांचे विश्वासू बनले. शाहू महाराजांना संतुष्ट ठेवून प्राप्त परिस्थितीत मराठा राज्याचा शक्य तितका विस्तार करणे हेच त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते. त्यांना परिस्थितीची चांगली जाणीव होती. मराठे व मुसलमान या दोन्ही पक्षांतील प्रमुख व्यक्ती, त्यांचे वर्तन, त्यांचे उद्देश, अंतर्गत राग, द्वेष यांचे भान त्यांना होते. कठीण अवस्थेतून अंगभूत चतुराईने त्यांनी शत्रूपक्षाला दुर्बल केले आणि शाहू महाराजांचा पक्ष सुदृढ बनवला. बाळाजी विश्वनाथ दिल्लीहून परत आल्यावर दक्षिणेत कोल्हापूरच्या बंदोबस्तासाठी गेले. काही दिवस कोल्हापूरला वेढा देऊन ते १७२०च्या मार्च महिन्यात साताऱ्यात आले आणि तिथून सासवडला गेले. तिथेच त्यांचे निधन झाले. त्यांची पत्नी राधाबाई त्यांच्या मृत्यूनंतर बरीच वर्षे जिवंत होती. त्यांना पहिले बाजीराव आणि चिमाजीअप्पा असे दोन मुलगे होते.

बाळाजी विश्वनाथ पेशवेपदावर विराजमान झाले तेव्हा महाराष्ट्रात स्थैर्य आणणे, विस्तार करणे अशी अनेक आव्हाने होती. बाळाजीपंत यांनी काय विशेष कामगिरी केली, असा प्रश्न उपस्थित झाला तर खालील मुद्द्यांनी त्याचे उत्तर देता येईल.

  • - अत्यंत कमी संख्या असणाऱ्या मराठ्यांकडून बलवान मुघलांना कब्जात आणण्याचा प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखवला.
  • - सतत संकटे आली तरी त्यातूनही फायदा घेऊन राष्ट्रात ऐक्य आणले. 
  • - मुघल बादशहांनी भेदनीती वापरण्याचा प्रयत्न केला; पण तो बाळाजीपंतांनी हाणून पाडला.
  • - आपापसांत लढणाऱ्या मराठ्यांना एकत्र करून त्यांना मराठा साम्राज्याचा विस्तार करण्यास प्रवृत्त केले. 
  • - घरोघरी सेनानायक निर्माण केले. देशभर अनेक मराठा सरदार निर्माण केले. 
  • - दिल्ली दरबारी मराठ्यांचा दरारा निर्माण केला.
  • - सततच्या परकीय आक्रमणांनी निर्धन झालेल्या महाराष्ट्राच्या जनतेला सधन बनवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या.
  • - मराठ्यांचा हा आदर्श घेऊन राजपूत, बुंदेले, जाट, शीख यांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा दिली. 
  • - मराठ्यांच्या सर्व विरोधकांना नामोहरम केले.
  • - छत्रपती शाहू महाराज यांच्या आधिपत्याखाली हिंदू राष्ट्राचे संघटन केले.


अशा पद्धतीने पेशव्यांच्या पराक्रमी कारकीर्दीची सुरुवात बाळाजी विश्वनाथ यांच्यापासून सुरू झाली. पुढील लेखात आपण अशाच एका पराक्रमी पेशव्यांचे कार्यकर्तृत्व बघणार आहोत.

(क्रमश:)

(संदर्भ : मराठी रियासत - खंड ३, मराठी विश्वकोश)

(या लेखमालेतील आधीचे लेख खालील लिंकवर वाचता येतील.)

१. पानिपतची लढाई म्हणजे शौर्याचे प्रतीक... पराभवाची गाथा नव्हे!

२. पानिपत लढाईची पार्श्वभूमी - पूर्वार्ध

३. पानिपत लढाईची पार्श्वभूमी - उत्तरार्ध

४. मराठेशाहीचे स्वातंत्र्ययुद्ध आणि पेशवाईचा उदय

५. पेशवेकालीन महाराष्ट्र - भाग १ 

६. पेशवेकालीन महाराष्ट्र - भाग २


Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 25-02-2026 News publication date | Time: 01:55 AM News publication time | Views: 127 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 25-02-2026 News publication date | Time: 01:55 AM News publication time | Views: 127 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words