मराठी भाषा आणि संत वाङ्मयाचे अभ्यासक, संशोधक डॉ. शं. गो. तुळपुळे यांचा पाच फेब्रुवारी हा जन्मदिन.
शंकर गोपाळ तुळपुळे तथा डॉ. शं. गो. तुळपुळे हे मराठी भाषा आणि संत वाङ्मयाचे अभ्यासक, संशोधक आणि पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी विभागप्रमुख. त्यांचा जन्म पाच फेब्रुवारी १९१४ रोजी पुण्यात झाला. त्यांचे वडील गोपाळ विष्णू तुळपुळे हे एक ज्ञानसंपन्न व्यक्तिमत्त्व होते. तुळपुळे यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. त्यांनी मुंबई विद्यापीठातून १९३८ साली एमए आणि १९४० साली पीएचडी पदवी प्राप्त केली. पुणे विद्यापीठाची स्थापना झाल्यावर सुमारे वीस वर्षे म्हणजे १९६९ सालापर्यंत ते मराठी भाषा-साहित्य विभागाचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख होते.
विद्यापीठाच्या सुरुवातीच्या काळात विभागाला आणि मराठीच्या अभ्यासाला एक प्रकारची शिस्त लावण्याचा मोठा प्रयत्न त्यांनी केला, अनेक नामवंत विद्यार्थी घडवले. शंकर गोपाळ तुळपुळे यांनी १९६०नंतर आपले संशोधनात्मक ग्रंथ लोकांसमोर आणले. त्यांमध्ये पाश्चात्यांना मराठी शिकण्यासाठी अधिक उपयुक्त ठरेल असे 'अॅन ओल्ड मराठी रीडर' (१९६०), 'लिंग्विस्टिक स्टडी ऑफ ओल्ड मराठी' (१९७३), 'फाइव्ह पोएट सेंट्स ऑफ महाराष्ट्र' (१९६२), 'मराठी शिलालेख' (१९६३), 'महानुभाव संप्रदाय आणि साहित्य', 'रा. द. रानडे जीवन आणि तत्त्वज्ञान' (१९६५), 'महाराष्ट्र सारस्वताची पुरवणी, असे सुमारे वीस ग्रंथ होते. प्राचीन मराठी शब्दकोश' हा सुमारे आठशे पानांचा महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे डॉक्टरांची मराठी भाषेला महत्त्वाची देणगी म्हणावी लागेल. डॉ. अॅनफेल्ड हौस (अॅरिझोना विद्यापीठ, अमेरिका) यांच्या साह्याने १९९९मध्ये मुंबईच्या पॉप्युलर प्रकाशनाने हा शब्दकोश प्रसिद्ध केला. अकराव्या शतकापासून तेराव्या शतकाच्या अखेरपर्यंतच्या मराठी संतांच्या रचनांतून येणार्या मराठी शब्दांची व्युत्पत्ती, व्याकरण, अर्थ आणि उदाहरणे अशा प्रकारे सविस्तर माहिती देणारा हा शब्दकोश मराठीत आजही अद्वितीय आहे. अशा या महान संशोधकाचे ३० ऑगस्ट १९९४ रोजी निधन झाले.
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment