प्रतिभावान गायक, नट व संगीत दिग्दर्शक कृष्णराव गणेशपंत फुलंब्रीकर यांचा २० जानेवारी हा जन्मदिन.
प्रतिभावान गायक, नट व संगीत दिग्दर्शक कृष्णराव गणेशपंत फुलंब्रीकर यांचा जन्म २० जानेवारी १८९८ रोजी श्री क्षेत्र आळंदी येथे आजोळी झाला. त्यांचे आडनाव पाठक असे होते. परंतु त्यांच्या पूर्वजांनी नानासाहेब पेशव्यांसमोर वेदांमधील ऋचांचे स्पष्ट व सुस्वर सादरीकरण केले. तेव्हा त्यांच्या सन्मानार्थ फुलंब्रीकर अशा नावाने पेशव्यांनी त्यांचा गौरव केला. पुढे तेच नाव रूढ झाले.
कृष्णरावांचे वडील वेदपठण करत असत. त्यांच्या आईचे नाव मथुराबाई होते. कृष्णराव सहा-सात वर्षांचे असताना त्यांचे कुटुंब पुण्यात वास्तव्यासाठी आले. गाण्याच्या ओढीमुळे त्यांना शालेय शिक्षणात रस वाटेना. त्यामुळे लहानपणीच त्यांच्या वडीलबंधूंनी त्यांना 'नाट्यकला प्रवर्तक मंडळी' या संगीत नाटक मंडळींमध्ये भरती केले. हरिभाऊ आपट्यांच्या संत सखूबाई (१९११) या नाटकात त्यांनी विठ्ठलाची भूमिका केली. तेथे त्यांचा सवाई गंधर्वांच्या गायकीशी परिचय झाला. १९११पासून त्यांना गायनाचार्य भास्करबुवा बखले यांचे पट्टशिष्यत्व लाभले. भास्करबुवांप्रमाणेच कृष्णरावांच्याही गायनात ग्वाल्हेर, आग्रा व जयपूर या घराण्यांचा संगम दिसून येतो. ते महाराष्ट्रात 'मास्तर कृष्णराव' या नावाने प्रसिद्ध झाले.
मास्तर कृष्णरावांची पहिली स्वतंत्र मैफल वयाच्या सतराव्या वर्षी जलंदरच्या संगीत महोत्सवात झाली. हमखास मैफल जिंकणारे कल्पक व अष्टपैलू गायक म्हणून मास्तरांची ख्याती होती. त्यांच्या सुमारे तीन हजार मैफली संबंध भारतात ठिकठिकाणी झाल्या. ख्याल, ठुमरी, नाट्यगीत, भजन इ. गानप्रकार ते सारख्याच रंगतीने पेश करीत.
मास्तरांचा विवाह राधाबाई यांच्याशी झाला. त्यांना माधव उर्फ राजा फुलंब्रीकर, अनुपमा सुभेदार व वीणा चिटको ही अपत्ये. त्यांच्या वीणा चिटको या कन्या संगीतकार म्हणून ओळखल्या जातात. २० ऑक्टोबर १९७४ रोजी वृद्धापकाळाने मास्तर कृष्णराव यांचे पुण्यात निधन झाले.
(माहिती स्रोत : मराठी विश्वकोश)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment