अशक्य ते शक्य करून दाखवणारा महान शास्त्रज्ञ
जगात अशक्य असे काहीच नाही. इच्छाशक्ती प्रबळ असली, तर कोणतीही शारीरिक कमतरता रोखू शकत नाही, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्टीफन हॉकिंग. आपले जवळजवळ संपूर्ण आयुष्य व्हीलचेअरवर घालवलेले स्टीफन हॉकिंग यांनी अनेक महान शोध लावले. जन्मदिनानिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला हा आढावा...
स्टीफन हॉकिंग यांचा जन्म आठ जानेवारी १९४२ रोजी इंग्लंडमधील ऑक्सफर्ड इथे झाला. त्यांचे वडील डॉक्टर फ्रॅंक हॉकिंग जीवशास्त्राचे संशोधक होते. त्यांची आई एलिझाबेथ ऑक्सफर्डची पदवीधर होती. हॉकिंग यांना विद्यार्थिदशेपासूनच संगीत, वाचन, गणित आणि भौतिकशास्त्राची आवड होती. त्यांची बुद्धिमत्ता एवढी प्रचंड होती, की त्यांना लहानपणी ‘आइन्स्टाईन’ या नावाने ओळखले जायचे. खरे तर त्यांना विद्यापीठात जाऊन गणिताचे शिक्षण घ्यायचे होते; पण त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश घेऊन वैद्यकीय क्षेत्रात काम करावे, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. १९५९ साली त्यांनी ‘कॉस्मॉलॉजी’ हा विषय घेतला आणि त्यासाठी त्यांना स्कॉलरशिपसुद्धा मिळाली. हॉकिंग सुट्टीसाठी घरी आले होते तेव्हा एक दिवस घरातील पायरी उतरताना त्यांना चक्कर आली आणि ते खाली पडले. डॉक्टरांनी थोडा अशक्तपणा असल्याचे सांगितले. तेव्हा ते २१ वर्षांचे होते; पण दिवसेंदिवस त्यांची तब्येत आणखी खराब होत गेली, तेव्हा डॉक्टरनी सांगितले, की त्यांना ‘न्यूरोन मोटर’ हा आजार आहे. त्यामुळे शरीराचे अवयव हळूहळू काम करायचे बंद करतात आणि मग श्वसननलिका बंद झाली की माणूस मरतो. डॉक्टरनी सांगितले, की स्टीफन जास्तीत जास्त दोन वर्षे जगतील. हे ऐकून स्टीफन थोडे उदास झाले; पण लगेच त्यांनी स्वतःला सावरले आणि ते म्हणाले, 'मी दोन नव्हे, २० नव्हे, तर ५० वर्षे जगणार आहे.' आणि या दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर ते ७६ वर्षांचे आयुष्य जगले. १९६३मध्ये त्यांचे दोन्ही पाय काम करायचे बंद झाले. १९७०मध्ये हात निकामी झाले. १९८५मध्ये त्यांना न्यूमोनिया झाला. डॉक्टर म्हणाले, की श्वासनलिकेस छिद्र पाडून ऑपरेशन करावे लागेल. तशी शस्त्रक्रियाही त्यांच्यावर करण्यात आली. त्यामुळे ते आपला आवाज कायमचा गमवून बसले.
१९९०साली त्यांच्या बोटांनी काम करायचे बंद केले. १९९६ साली त्यांच्या ९२ टक्के शरीराने काम करायचे बंद केले. त्यांचे पाय आणि हात निकामी झाले तेव्हा डॉक्टरांनी त्यांना व्हीलचेअर वापरायला सांगितले. त्यांच्या व्हीलचेअरला कम्प्युटर जोडण्यात आला. ते फक्त बोटाच्या साह्याने आपल्याला काय म्हणायचे, ते कम्प्युटरद्वारे सांगत होते. त्या वेळी ते एका मिनिटाला १५ शब्द सांगू शकत होते. काही दिवसांनी त्यांच्या बोटांनीसुद्धा काम करायचे बंद केले; पण तरी त्यांनी हार मानली नाही. तेव्हा त्यांच्या कम्प्युटरवर असा एक सेन्सर बसवला होता, जो गालांच्या हालचालींच्या आधारे हॉकिंग यांना काय म्हणायचे आहे ते सांगायचा. तेव्हा ते एका मिनिटाला एकच शब्द सांगू शकत होते.
या अशा विकलांग अवस्थेतही त्यांनी अनेक महान शोध लावले. विश्वाची निर्मिती कशी झाली, आकाशातील कृष्णविवरे नेमकी कशी तयार होतात, अशा ब्रह्मांडामधील अनेक न उकलणाऱ्या गूढ रहस्यांचा शोध घेण्याचा ध्यास त्यांनी घेतला होता. असामान्य बुद्धिकौशल्याच्या जोरावर माणूस जग जिंकू शकतो, हे त्यांनी साऱ्या जगाला दाखवून दिले. त्यांनी ब्लॅक होल्स, बिग बँग थेअरी, हॉकिंग रेडिएशन या विषयांवर जास्तीत जास्त संशोधन केले. ब्लॅक होल्स म्हणजे जे तारे म्हातारे होतात त्यांच्या जवळ जबरदस्त गुरुत्वाकर्षण निर्माण होते. ते प्रकाशालाही ओढते आणि या होल्समधून काही रेडिएशन्स निर्माण होतात, हा शोध त्यांनी लावला होता. म्हणून त्यांना हॉकिंग रेडिएशन्स म्हणतात. त्यांना १२ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होत. त्यांनी चार पुस्तके लिहिली. ती सर्वच बेस्टसेलर ठरली. त्यांचे सर्वांत प्रसिद्ध पुस्तक म्हणजे ‘ए ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम.’
स्टीफन हॉकिंग यांनी सिद्ध केले आहे, की माणूस आपल्या कणखर मानसिकतेच्या जोरावर आपले स्थान निर्माण करू शकतो. तुम्ही दिसायला कसे आहात, तुमच्यामध्ये काय कमतरता आहेत, यामुळे काही फरक पडत नाही. तुम्ही मनाने कणखर आणि मजबूत असाल, तर या जगात काहीही साध्य करू शकता.
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment