वारकरी संप्रदायाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या पंथाने स्त्रियांना केवळ भक्तीचेच स्वातंत्र्य दिले नाही, तर त्यांना संतत्वाच्या सर्वोच्च शिखरावर नेऊन बसवले. जाणून घेऊया अशाच एका मातृशक्तीची भक्तीगाथा -
अनंता जन्मांचे सुकृत पदरीं । तोचि उच्चारी ऒठी हरिनाम ॥१॥ अनंता जन्माचें पुण्य जया गांठी । तोचि उच्चारी ओठी हरिनामा ॥२॥ अनंता जन्मांचे तपादि साधन ।तोचि नारायण जपे नाम ॥३॥ अनंता जन्मांची सोडियेली जोडी । तरीच लागे गोडी हरिनामीं ॥४॥ निर्मळा म्हणे अनंता जन्माचें । उच्चारतां वाचे पाप जाय ॥५॥ वारकरी संप्रदायाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या पंथाने स्त्रियांना केवळ भक्तीचेच स्वातंत्र्य दिले नाही, तर त्यांना संतत्वाच्या सर्वोच्च शिखरावर नेऊन बसवले. १३ व्या शतकातील अत्यंत विषम सामाजिक आणि कौटुंबिक वातावरणात राहून ज्या स्त्री संतांनी आपल्या प्रासादिक वाङ्मयाने मराठी भाषा समृद्ध केली, त्यात संत निर्मळा यांचे स्थान अनन्यसाधारण आहे. त्या संत चोखामेळा यांच्या सख्ख्या लहान बहीण होत्या. बंधू चोखोबांचे आचार-विचार आणि विठ्ठलभक्तीचा वारसा घेऊन निर्मळाबाईंनी स्वतःचे एक स्वतंत्र आध्यात्मिक स्थान निर्माण केले. त्यांच्या अभंगांमधील आर्जवी भाव आणि विरक्ती आजच्या पिढीलाही भुरळ घालणारी आहे. संत निर्मळाबाईंचा जन्म १३ व्या शतकाच्या उत्तरार्धात सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढे येथे एका सात्विक आणि विठ्ठलभक्त महार कुटुंबात झाला. त्यांचे वडील सुदाम आणि आई सावित्रीबाई यांच्या पोटी जन्मलेल्या निर्मळाबाई बालपणापासूनच अत्यंत शांत आणि अंतर्मुख स्वभावाच्या होत्या.: निर्मळाबाईंचे संपूर्ण कुटुंबच वारकरी संप्रदायाचा एक भक्कम स्तंभ होते. मोठे भाऊ: संत शिरोमणी चोखामेळा भावजय: संत सोयराबाई पुतण्या: संत कर्ममेळा पती: संत बंका महार (जे स्वतः एक थोर संत आणि विठ्ठलभक्त होते) अशा घरात वावरताना निर्मळाबाईंना बालपणापासूनच टाळ-मृदंगाचा आवाज आणि विठ्ठल नामाचे बाळकडू मिळाले. बंधू चोखोबांच्या भक्तीचा त्यांच्यावर एवढा प्रभाव होता की, त्या चोखोबांना केवळ भाऊ न मानता आपले 'आध्यात्मिक गुरू' मानत असत. संत निर्मळा यांचा विवाह संत बंका महार यांच्याशी झाला. बंका महार हे स्वतः सोयराबाईंचे भाऊ होते, म्हणजेच नातेसंबंधात ते चोखोबांचे मेव्हणे होते. बंकाजी हे स्वतः उत्तम अभंगकार आणि विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. पती आणि पत्नी दोघेही अध्यात्माच्या एकाच वाटेवर प्रवासी असल्यामुळे त्यांच्या घरात शांतता असायला हवी होती, परंतु तत्कालीन सामाजिक परिस्थिती आणि गरिबी यामुळे त्यांचा प्रपंच अतिशय कष्टाचा गेला. अन्नधान्याची टंचाई आणि समाजाकडून मिळणारी उपेक्षेची वागणूक यामुळे निर्मळाबाईंचे मन संसारातून पूर्णपणे उडाले. त्यांना समजले की, हा प्रपंच केवळ नश्वर असून जगाचा संसार चालवणारा तो पंढरीचा विठ्ठल हाच आपला खरा सखा आहे. त्या पतीच्या साथीने अखंड नामस्मरणात राहू लागल्या. संत निर्मळा यांच्या अथांग श्रद्धेमुळे साक्षात विठ्ठलाने त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी अनेक चमत्कार घडवले, ज्याची साक्ष वारकरी संप्रदाय आजही देतो. एकदा चोखामेळा, सोयराबाई, बंका महार आणि निर्मळाबाई सर्वजण घरात विठ्ठलाच्या भजनात मग्न होते. दुपारची वेळ झाली होती, पण घरात अन्न शिजवण्यासाठी विस्तव (अग्नी) नव्हता आणि लाकडेही ओली होती. गरिबीमुळे शेजाऱ्यांनीही विस्तव देण्यास नकार दिला. निर्मळाबाई काळजीत पडल्या की घरी आलेल्या संतांना आणि पतीला काय खायला द्यावे? त्यांनी डोळ्यात अश्रू आणून चुलीसमोर बसून विठ्ठलाचा धावा केला. "देवा, माझ्या घरी आलेले भक्त उपाशी गेले तर तुझ्या या बहिणीची अब्रू जाईल," अशी आर्त हाक त्यांनी मारली. असे म्हणतात की, साक्षात पांडुरंगाने एका लहान बालकाचे रूप घेतले आणि झोपडीत येऊन चुलीत फुंकर मारली. ओल्या लाकडांमधून अचानक अग्नी पेटला. जेव्हा निर्मळाबाईंनी त्या बालकाचे मनोहर रूप बघितले पाहिले, तेव्हा त्यांना समजले की हा माझा विठ्ठल माऊली आहे. निर्मळाबाई दरवर्षी चोखोबा आणि नामदेव महाराजांच्या दिंडीसोबत पंढरपूरची वारी करत असत. एका आषाढी वारीच्या वेळी, चंद्रभागेच्या वाळवंटात नामदेव महाराजांचे मोठे कीर्तन सुरू होते. कीर्तनात सर्व संत डोलायला लागले. निर्मळाबाईंना मंदिराच्या आत जाण्याची बंदी असल्यामुळे त्या महाद्वाराच्या पायरीबाहेर दूर उभ्या राहून डोळ्यांतून अश्रू गाळत विठ्ठलाची मूर्ती डोळ्यांसमोर आणत होत्या. त्यांची ही आर्तता पाहून गाभाऱ्यातील विठ्ठलाची मूर्ती हलली. साक्षात पांडुरंग मंदिराबाहेर धावत आला आणि त्याने गर्दीतून वाट काढत दूर उभ्या असलेल्या निर्मळाबाईंसमोर उभा राहिला. संत निर्मळाबाईंचे सुमारे २४ ते २५ अभंग आजच्या काळात उपलब्ध आहेत. संख्या जरी मर्यादित असली, तरी त्यातील भक्तीचा आणि विरक्तीचा दर्जा अतिशय उच्च आहे. त्यांच्या अभंगांवर बंधू चोखामेळा यांच्या विचारांची स्पष्ट छाप दिसते. त्या विठ्ठलाला हक्काने आपली 'माऊली' म्हणतात आणि स्वतःला तिचे लहान लेकरू मानतात. त्यांनी आपल्या अभंगांत संसाराला 'असार' (व्यर्थ) म्हटले असून, मनुष्याने वेळेवर देवाची भक्ती का करावी? याचे सुंदर मार्गदर्शन केले आहे. संत चोखामेळा यांच्या निधनानंतर (जेव्हा मंगळवेढ्याची भिंत कोसळली) निर्मळाबाईंना खूप मोठा धक्का बसला. त्यांचा मुख्य आध्यात्मिक आधार तुटला होता. परंतु, नामदेव महाराजांनी जेव्हा चोखोबांच्या अस्थी पंढरपूरला आणल्या, तेव्हा निर्मळाबाईंनी स्वतःचे मन विठ्ठल चरणी स्थिर केले. त्यांनी आपले उर्वरित आयुष्य पंढरपुरात विठ्ठलभक्तीत घालवले. त्यांनी समाधी कुठे घेतली याबद्दल कुठलीच माहिती उपलब्ध नाही. वारीला येणाऱ्या महिला वारकरी आणि भाविक संत निर्मळाबाईंच्या त्या सोशिकतेला आणि भक्तीला मोठ्या आदराने वंदन करतात. अशा या थोर मातृशक्तीला शतश: नमन!!
-संकलित
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment