भक्ती म्हणजे काय? एकाग्रतेचे दुसरे नाव!

बोधकथा - ४५

भक्ती म्हणजे काय? एकाग्रतेचे दुसरे नाव! मुख्य फोटो
भक्ती म्हणजे काय? एकाग्रतेचे दुसरे नाव! अतिरिक्त फोटो

स्वामी रामकृष्ण परमहंसांनी शिष्यांना सांगितलेली ही गोष्ट आहे. एक माणूस तलावात मासेमारी करायचा. एके दिवशी तो शांतपणे तलावाच्या काठी बसून गळ टाकून मासा पकडण्याची वाट पाहत होता. बराच वेळ गेला. अचानक गळाची तरंगती खूण हलू लागली. कधी तिचे टोक पाण्यात जाई, तर कधी वर येई. मच्छिमाराने दोन्ही हातांनी काठी घट्ट पकडली होती. मासा अडकला, की तो गळ वर खेचण्याच्या तयारीत होता. तेवढ्यात एक वाटसरू तेथे आला आणि म्हणाला, 'बॅनर्जी यांचे घर कुठे आहे, सांगाल का?'; पण मच्छिमाराने काहीच उत्तर दिले नाही. त्याचे संपूर्ण लक्ष त्या तरंगत्या खुणेकडे होते. वाटसरू पुन्हा मोठ्याने म्हणाला, 'अहो, बॅनर्जी यांचे घर कुठे आहे?' तरीही काही प्रतिसाद नाही. तो माणूस वारंवार विचारत राहिला; पण मच्छिमाराला आजूबाजूचे काहीच ऐकू येत नव्हते. त्याचे हात थरथरत होते, डोळे फक्त गळावर खिळले होते. शेवटी वाटसरू चिडून पुढे निघून गेला. थोड्याच वेळात ती खूण पूर्णपणे पाण्याखाली गेली. मच्छिमाराने जोरात काठी खेचली आणि मोठा मासा पकडला. त्यानंतर त्याने कपाळावरील घाम पुसला आणि दूर गेलेल्या वाटसरूला मोठ्याने हाक मारली, 'अहो! इकडे या जरा!' वाटसरू आधी वळलाच नाही; पण बराच वेळ हाका मारल्यानंतर तो परत आला आणि रागाने म्हणाला, 'आता का बोलावत आहात?' मच्छिमाराने विचारले, 'तुम्ही मला काय विचारत होतात?' हे ऐकून वाटसरू आणखी वैतागला. तो म्हणाला, 'मी इतक्या वेळा विचारले, तेव्हा तुम्ही उत्तर दिले नाही आणि आता पुन्हा तेच विचारत आहात!' त्यावर मच्छिमार शांतपणे म्हणाला, 'त्या वेळी माझा गळ बुडणार होता. माझे संपूर्ण लक्ष त्याच्याकडे होते. त्यामुळे तुम्ही काय बोलत होतात, ते मला ऐकूच आले नाही.' ज्या प्रकारे त्या मच्छिमाराचे पूर्ण मन गळावर एकवटले होते, त्याच प्रकारे जेव्हा मनुष्य ध्यान, साधना किंवा भक्तीत पूर्णपणे तल्लीन होतो, तेव्हा त्याला बाहेरचे काही दिसत नाही, ऐकू येत नाही. मनाची अशी एकाग्रता हीच खरी भक्ती असते. बोध : ज्या कार्यात किंवा ईश्वरभक्तीत पूर्ण मनाने एकाग्र होता येते, तेथेच यश, शांतता आणि आत्मानुभव प्राप्त होतो.

Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 17-05-2026 News publication date | Time: 06:33 AM News publication time | Views: 662 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news
Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 17-05-2026 News publication date | Time: 06:33 AM News publication time | Views: 662 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 1 Comments

S
Shriram Y Moghe
17-05-2026 08:58 PM

खूप छान

Write a Comment
0 / 50 words
Advertisement