बोधकथा - ४६
एका गावात एक लहान मुलगा राहत होता. तो रोज शाळेत जाण्यासाठी दाट जंगलातून जात असे. जंगलात उंच झाडे होती. पक्ष्यांचे विचित्र आवाज येत. निर्जन वाट असल्यामुळे त्याला खूप भीती वाटत असे; पण शाळेत जाण्यासाठी त्याला तो रस्ता रोज पार करावाच लागे. एके दिवशी घाबरतच तो आईजवळ आला आणि म्हणाला, 'आई, मला त्या जंगलातून जाताना खूप भीती वाटते.'
आईने प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, 'बाळा, भीती वाटली की मधुसूदनाला हाक मार.'
मुलाने आश्चर्याने विचारले, 'आई, हा मधुसूदन कोण आहे?'
आई हसली आणि म्हणाली, 'तो तुझा मोठा भाऊ आहे. तू मनापासून हाक मारलीस तर तो नक्की तुझ्या सोबतीला येईल.'
दुसऱ्या दिवशी तो पुन्हा जंगलातून जात होता. सुरुवातीला तो धीराने चालत होता; पण तो अधिक घनदाट जंगलात जाऊ लागला, तसतशी त्याच्या मनात भीती वाढू लागली. अचानक वाऱ्याने झाडांची पाने सळसळली आणि तो घाबरला. त्याने मोठ्याने हाक मारली, 'अरे मधुसूदन दादा, कुठे आहेस तू?'
काहीच उत्तर आले नाही. आता त्याच्या डोळ्यांत अश्रू आले. तो रडतच पुन्हा म्हणाला, 'मधुसूदन दादा, मला खूप भीती वाटते. माझ्या सोबतीला ये ना रे!'
त्या निष्पाप हाकेत इतकी आर्तता आणि दृढ विश्वास होता, की देवाला राहवेनाच. क्षणात त्याच्यासमोर भगवंत प्रकट झाले. त्यांनी मुलाचा हात हातात घेतला आणि प्रेमाने विचारले, 'मी आलोय. आता कसली भीती?' भगवंत त्याच्यासोबत चालत शाळेपर्यंत गेले. शाळेजवळ पोहोचल्यावर ते म्हणाले, 'जेव्हा जेव्हा तू मला मनापासून हाक मारशील, तेव्हा मी नक्की येईन. कधीही घाबरू नकोस.'
त्या दिवसानंतर त्या मुलाच्या मनातील भीती कायमची नाहीशी झाली.
बोध : देवावर निरागस, निस्सीम आणि एखाद्या बालकाप्रमाणे विश्वास असेल, तर संकटाच्या वेळी आपल्याला नक्कीच आधार मिळतो. तो आपल्यासोबत आहे या विश्वासाने आपण निर्भयपणे वाटचाल केली पाहिजे.
(स्वामी रामकृष्ण परमहंस यांनी शिष्यांना सांगितलेल्या कथेवर आधारित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment