बोधकथा - ४७
एकदा एका वाघिणीने शेळ्यांच्या कळपावर हल्ला केला. तेवढ्यातच तिने एका बछड्याला जन्म दिला आणि तिचा मृत्यू झाला. तो वाघाचा छोटा बछडा शेळ्यांच्या कळपातच वाढू लागला.
शेळ्या गवत खात असत. त्यामुळे तो बछडाही गवत खाऊ लागला. शेळ्या 'में… में…' असा आवाज काढत. म्हणून वाघाचा बछडाही त्यांच्यासारखाच ओरडू लागला. हळूहळू तो मोठा झाला आणि साहजिकच एका बलवान वाघात त्याचे रूपांतर झाले; पण त्याला स्वतःची खरी ओळखच नव्हती.
एके दिवशी जंगलातील एक रानटी वाघ त्या कळपाजवळ आला. गवत खाणारा आणि शेळ्यांसारखा वागणारा वाघ पाहून तो आश्चर्यचकित झाला. तो त्याच्या मागे धावला आणि त्याने अखेर त्याला पकडले. पकडताच तो वाघ शेळ्यांसारखा ओरडू लागला. तो रानटी वाघ त्याला ओढत एका तलावाजवळ घेऊन गेला आणि म्हणाला, 'पाण्यात तुझा चेहरा बघ. तो अगदी माझ्यासारखाच आहे.'
नंतर त्याने थोडे मांस त्याच्या तोंडात घातले. सुरुवातीला त्या वाघाला ते अजिबात आवडले नाही. तो पुन्हा शेळ्यांसारखा ओरडू लागला; पण हळूहळू त्याला रक्ताची चव लागली आणि मांस खायला आवडू लागले. तेव्हा रानटी वाघ त्याला म्हणाला, 'आता तुला समजले ना, तुझ्यात आणि माझ्यात काहीही फरक नाही? चल, आता माझ्यासोबत जंगलात ये.'
बोध : मनुष्य अनेकदा स्वतःची खरी शक्ती आणि स्वभाव विसरून इतरांच्या प्रभावाखाली जगत असतो. योग्य गुरू, मार्गदर्शक किंवा सत्संग लाभला, तर माणसाला स्वतःची खरी ओळख पटते आणि त्याला आपल्या खऱ्या सामर्थ्याची जाणीव होते.
(रामकृष्ण परमहंसांनी शिष्यांना सांगितलेल्या कथेवर आधारित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment