भिक्षा मागायचीच तर...!

बोधकथा - ४३

भिक्षा मागायचीच तर...! मुख्य फोटो
भिक्षा मागायचीच तर...! अतिरिक्त फोटो

दिल्लीत अकबराचं राज्य होतं, त्या वेळी एका जंगलात एक साधू आपल्या छोट्याशा झोपडीत राहत होता. तो अत्यंत पवित्र आणि साध्या स्वभावाचा होता. अनेक जण त्याच्या दर्शनासाठी आणि आशीर्वादासाठी त्याच्याकडे येत असत. एके दिवशी त्या साधूच्या मनात विचार आला, की आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करावं; पण त्याच्याकडे तितकी संपत्ती नव्हती. मग त्याने ठरवले, की अकबराकडे मदत मागावी.

साधू राजवाड्यात गेला. त्या वेळी अकबर आपल्या रोजच्या प्रार्थनेत मग्न होता. साधू शांतपणे एका कोपऱ्यात जाऊन बसला. प्रार्थना संपत आली तेव्हा अकबर म्हणाला, 'हे परमेश्वरा, मला धन दे, संपत्ती दे, वैभव दे...'

हे शब्द साधूच्या कानावर पडले. ते ऐकताच तो उठला आणि निघून जाऊ लागला. अकबराने त्याला थांबण्याची खूण केली. प्रार्थना संपल्यानंतर अकबराने विचारले, 'तुम्ही मला भेटायला आलात आणि काहीही न बोलता निघून का जात होतात?'

साधू नम्रपणे म्हणाला, 'महाराज, आता मला काही सांगण्याची गरज नाही. मी निघतो.'

अकबराने आग्रह केला तेव्हा साधू म्हणाला, 'माझ्याकडे अनेक लोक येतात. त्यांच्या आदरातिथ्यासाठी थोडी मदत मागायला मी येथे आलो होतो.'

अकबर म्हणाला, 'मग तुम्ही काही न सांगताच परत का निघाला होतात?'

तेव्हा साधू शांतपणे उत्तरला, 'मी पाहिले, की तुम्हीही परमेश्वराकडे धन आणि संपत्ती मागत होतात. म्हणजे तुम्हीसुद्धा एक भिकारीच आहात. मग मी एका भिकाऱ्याकडे भिक्षा का मागू? जर मागायचेच असेल, तर थेट परमेश्वराकडेच मागणे अधिक योग्य.'

बोध : परमेश्वर हाच खरा आधार. त्यामुळे माणसाने ईश्वरावरच अंतिम विश्वास ठेवावा.

(रामकृष्ण परमहंसांनी शिष्यांना सांगितलेल्या गोष्टीवर आधारित)

Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 10-05-2026 News publication date | Time: 07:17 AM News publication time | Views: 335 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news
Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 10-05-2026 News publication date | Time: 07:17 AM News publication time | Views: 335 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement