आपण प्रामाणिकपणे कर्तव्य करावे, काळजी घ्यायला 'तो' समर्थ आहे!

बोधकथा - ४२

आपण प्रामाणिकपणे कर्तव्य करावे, काळजी घ्यायला 'तो' समर्थ आहे! मुख्य फोटो
आपण प्रामाणिकपणे कर्तव्य करावे, काळजी घ्यायला 'तो' समर्थ आहे! अतिरिक्त फोटो

एका गावात एक विणकर राहत होता. तो अत्यंत साधा, प्रामाणिक आणि परमेश्वरभक्त मनुष्य होता. गावातील सर्व लोकांना त्याच्या ईश्वरभक्तीवर विश्वास होता आणि ते त्याच्यावर प्रेम करत. तो बाजारात कापड विकायला जात असे. एखाद्या ग्राहकाने कापडाची किंमत विचारताच तो शांतपणे म्हणे, 'श्रीरामाच्या इच्छेने सुताची किंमत एक रुपया, मेहनत चार आणे आणि नफा दोन आणे. म्हणून श्रीरामाच्या इच्छेने या कापडाची किंमत एक रुपया सहा आणे.'

विणकराचा हा प्रामाणिकपणा पाहून ग्राहक त्याने सांगितलेली किंमत लगेच देत आणि कापड घेऊन जात. तो खरा ईश्वरभक्त होता. रात्री जेवण झाल्यावर तो देवघरात बसून बराच वेळ रामनाम जपत असे, ध्यान करत असे आणि देवाचे गुणगान गात असे.

एके रात्री त्याला झोप येत नव्हती. तो देवघरात बसून रामाचे स्मरण करत होता. इतक्यात त्या रस्त्याने चोरांचे एक टोळके आले. त्यांना चोरीचा माल वाहून नेण्यासाठी एका माणसाची गरज होती. त्यांनी विणकराला जबरदस्तीने सोबत नेले. चोरांनी एका घरात चोरी केली आणि चोरीचा माल विणकराच्या डोक्यावर ठेवला. इतक्यात पोलीस तेथे आले. चोर पळून गेले; पण मालासह उभा असलेला विणकर पकडला गेला. पोलिसांनी त्याला रात्रभर कोठडीत ठेवले.

दुसऱ्या दिवशी त्याला न्यायाधीशांसमोर उभे करण्यात आले. गावातील लोकांना ही गोष्ट समजताच ते न्यायालयात आले आणि म्हणाले, 'महाराज, हा मनुष्य चोरी करण्याची शक्यताच नाही.'

न्यायाधीशांनी विणकराला विचारले, 'तू काय सांगू इच्छितोस?'

विणकर नम्रपणे म्हणाला, 'महाराज, श्रीरामाच्या इच्छेने मी रात्री जेवलो. मग श्रीरामाच्या इच्छेने देवघरात बसलो होतो. श्रीरामाच्या इच्छेने मी रामनाम घेत होतो. इतक्यात श्रीरामाच्या इच्छेने चोर तिथून गेले. श्रीरामाच्या इच्छेने त्यांनी मला ओढून नेले. श्रीरामाच्या इच्छेने त्यांनी चोरी केली आणि श्रीरामाच्या इच्छेने त्यांनी चोरीचा माल माझ्या डोक्यावर ठेवला. त्याच वेळी श्रीरामाच्या इच्छेने पोलीस आले आणि श्रीरामाच्या इच्छेने मला अटक झाली. रात्रभर श्रीरामाच्या इच्छेने मी कोठडीत राहिलो आणि आज श्रीरामाच्या इच्छेने तुमच्यासमोर उभा आहे.'

विणकराचे निरागस बोलणे आणि त्याची ईश्वरभक्ती पाहून न्यायाधीशांना सत्य समजले. त्यांनी लगेच त्याची मुक्तता केली. घरी परतताना विणकर आपल्या मित्रांना हसत म्हणाला, टश्रीरामाच्या इच्छेने माझी सुटका झाली!'

बोध : जीवनात सुख असो वा दुःख, प्रत्येक गोष्ट ईश्वराच्या इच्छेनेच घडते, हे एकदा आपल्या मनात पक्के बसले, की सारे काही सोपे होते. माणसाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करत राहावे आणि सगळी जबाबदारी परमेश्वरावर सोपवावी.

(रामकृष्ण परमहंसांनी आपल्या शिष्यांना सांगितलेल्या गोष्टीवर आधारित)

Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 09-05-2026 News publication date | Time: 10:54 AM News publication time | Views: 380 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news
Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 09-05-2026 News publication date | Time: 10:54 AM News publication time | Views: 380 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement