गर्व आणि भक्ती

बोधकथा - ४०

गर्व आणि भक्ती मुख्य फोटो
गर्व आणि भक्ती अतिरिक्त फोटो

स्वामी रामकृष्ण परमहंसांनी भक्तीविषयी आपल्या शिष्यांना सांगितलेली ही गोष्ट आहे. एकदा अर्जुनाला असा गर्व झाला, की श्रीकृष्ण आपल्यावर सर्वांत जास्त प्रेम करतात. आपल्यासारखा त्यांचा दुसरा कुणीच भक्त नाही, असे त्याला वाटू लागले. भगवान श्रीकृष्णाने हे ओळखले.

एके दिवशी श्रीकृष्ण अर्जुनाला सोबत घेऊन फिरायला गेले होते. चालता चालता त्यांना एक विलक्षण ब्राह्मण दिसला. तो वाळलेले गवत खात होता; पण त्याच्या कमरेला एक मोठी तलवार लटकत होती. अर्जुनाला ते पाहून खूप आश्चर्य वाटले. तो विष्णुभक्त ब्राह्मण दिसायला अतिशय साधा होता. कोणत्याही जिवाला त्रास होऊ नये म्हणून तो हिरवे गवतही खात नव्हता. वाळलेले, निर्जीव गवत खाऊन तो जगत होता; पण मग असे असेल, तर त्याच्याकडे तलवार का, असा प्रश्न अर्जुनाला पडला.

अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, “प्रभो, हे काही समजत नाही. जो माणूस गवताच्या पात्यालाही इजा होऊ नये अशी काळजी घेतो, तो तलवार कशासाठी बाळगत असेल बरे?”

श्रीकृष्ण हसून म्हणाले, “तूच त्याला विचार.”

अर्जुन त्या ब्राह्मणाजवळ गेला आणि म्हणाला, “महाराज, आपण इतके दयाळू आहात, कुठल्याही जिवाला इजा करत नाही. मग ही तलवार कशासाठी?”

ब्राह्मण शांतपणे म्हणाला, “मला चार जण कधी भेटले, तर त्यांना शिक्षा करायची इच्छा आहे.”

अर्जुनाला उत्सुकता वाटली. त्याने विचारले, “कोण आहेत ते चार जण?”

ब्राह्मण म्हणाला, “पहिले म्हणजे नारद.”

अर्जुन चकित झाला. त्याने विचारले, “नारदमुनी? त्यांनी काय केले?”

ब्राह्मण म्हणाला, “त्यांचे धाडस बघा! सतत वीणा वाजवून, भजन गाऊन ते माझ्या प्रभूला विश्रांतीच घेऊ देत नाहीत. दिवस-रात्र फक्त नामस्मरण आणि स्तुती!”

अर्जुनाने हसू आवरत विचारले, “दुसरी व्यक्ती कोण?”

ब्राह्मण म्हणाला, “द्रौपदी.”

अर्जुन म्हणाला, “तिचा काय दोष?”

ब्राह्मण म्हणाला, “माझे प्रभू जेवायला बसले होते, त्या वेळी तिने त्यांना हाक मारली. प्रभूंना अर्धवट जेवण सोडून काम्यक वनात जावे लागले आणि पांडवांना दुर्वासांच्या शापापासून वाचवावे लागले. इतकेच नाही, तर तिने प्रभूंना स्वतःच्या उरलेल्या अन्नाचाही घास खायला दिला.”

अर्जुन आता अधिकच आश्चर्यचकित झाला. त्याने विचारले, “तिसरी व्यक्ती कोण?”

ब्राह्मण म्हणाला, “प्रल्हाद.”

अर्जुन म्हणाला, “प्रल्हाद? तो तर महान भक्त म्हणून ओळखला जातो!”

ब्राह्मण म्हणाला, “असेल भक्त; पण त्याने माझ्या प्रभूंना किती त्रास दिला! त्याच्यामुळे त्यांना उकळत्या तेलात उतरावे लागले, हत्तींच्या पायाखाली जावे लागले आणि खांब फोडून प्रकट व्हावे लागले!”

अर्जुन आता पूर्णपणे गोंधळला होता. त्या गोंधळातच त्याने विचारले, “आणि चौथी व्यक्ती कोण?”

ब्राह्मणाच्या चेहऱ्यावर थोडा राग दिसू लागला. तो म्हणाला, “अर्जुन!”

हे ऐकताच अर्जुन दचकला. त्याने विचारले, “अर्जुनाने काय केले?”

ब्राह्मण म्हणाला, “त्याने माझ्या प्रभूंना कुरुक्षेत्राच्या युद्धात स्वतःचा सारथी बनवले. जगाचा पालनकर्ता असलेल्या भगवानांकडून रथ चालवून घेतला!”

हे ऐकून अर्जुन पूर्ण शांत झाला. त्या साध्या ब्राह्मणाच्या मनात श्रीकृष्णांविषयी किती अपार प्रेम आणि भक्ती आहे, हे त्याला जाणवले. त्या क्षणी त्याच्या मनातील गर्व नाहीसा झाला. आपण स्वतःच सर्वांत मोठे भक्त आहोत, हा विचार किती चुकीचा आहे, याची त्याला जाणीव झाली.


विविध बोधकथा वाचण्यासाठी येथे क्लिक करा.



Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 02-05-2026 News publication date | Time: 07:55 AM News publication time | Views: 346 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news
Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 02-05-2026 News publication date | Time: 07:55 AM News publication time | Views: 346 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement