मठ (ता. लांजा, जि. रत्नागिरी) इथल्या श्री देव लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानातल्या चैत्रोत्सवाची कीर्ती अल्पावधीतच सर्वत्र पसरली आहे ती त्याच्या वेगळेपणामुळे. अवघ्या आठ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या मंदिरातल्या या उत्सवाची वैशिष्ट्यं नेमकी कोणती आहेत, याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणारा हा लेख...
शिशिरातल्या पानगळीचा काळ संपत आला, की चराचर सृष्टीला वेध लागतात ते चैत्रपालवीचे. सरलेल्या वर्षाच्या कटू-गोड स्मृती मागे टाकून पुन्हा नव्याने उभं राहण्याचा हा काळ असतो. याच तत्त्वाचं आध्यात्मिक-सांस्कृतिक बाबतीतलं उदाहरण द्यायचं झालं, तर मठ (ता. लांजा, जि. रत्नागिरी) या गावातल्या श्री देव लक्ष्मीपल्लीनाथाच्या चैत्रोत्सवाचं देता येईल. कोकण हा मुळातच उत्सवप्रिय प्रांत आहे आणि इथल्या अनेक उत्सवांमध्ये आजच्या आधुनिक काळातही पारंपरिकपणा बऱ्यापैकी टिकून राहिला आहे; मात्र त्यातही मठ गावातल्या लक्ष्मीपल्लीनाथाचा उत्सव म्हणजे आपला स्वतंत्र ठसा उमटवेल असं एक वेगळंच रसायन आहे. वर्षभरातल्या सांसारिक सुख-दुःखांचे उन्हाळे-पावसाळे झेललेले लक्ष्मीपल्लीनाथाचे कुलोपासक या चैत्रोत्सवाची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहत असतात. चैत्र शुद्ध दशमी ते पौर्णिमा असा हा आठवड्याभराचा उत्सव या सर्वांना एक नवी ऊर्जा देतो, नव्या उभारीने पुढच्या वर्षभराची वाटचाल करण्याची शक्ती देतो आणि सामूहिक उपासनेच्या माध्यमातून एक आध्यात्मिक-सांस्कृतिक-वैचारिक घुसळण घडवून आणतो. त्या मंथनातून निघालेलं नवनीत म्हणजे साऱ्या कुलोपासकांना जणू नवसंजीवनी देणारं अमृतच असतं. आता तर कोकणातल्या सर्वांत मोठ्या उत्सवांमध्ये त्याची गणना होऊ लागली आहे.
मठ इथल्या श्री देव लक्ष्मीपल्लीनाथाचा यंदाचा चैत्रोत्सव २८ मार्च ते तीन एप्रिल २०२६ या कालावधीत झाला. नेहमीप्रमाणेच अत्यंत उत्साहात तो साजरा करण्यात आला. या चैत्रोत्सवाची अनेक वैशिष्ट्यं आहेत. त्यापैकी पहिलं वैशिष्ट्य म्हणजे हा उत्सव मंदिराची वास्तू उभी राहण्याच्या आधीपासून साजरा होत आहे. या मंदिराची उभारणीच मुळी उत्सवप्रेमापोटी झाली आहे. रत्नागिरी तालुक्यातल्या पाली इथे श्री लक्ष्मीपल्लीनाथाचं मूळ मंदिर आहे. काही कारणांमुळे कुलोपासकांनी नवं मंदिर उभारायचं ठरवलं. त्यानंतर मठ गावातल्या शशिभाऊ गुण्ये यांनी दोन एकर जागा नाममात्र मोबदल्यात उपलब्ध करून दिली. या संस्थानाच्या न्यासाठी रीतसर नोंदणी १७ ऑक्टोबर २०१२ रोजी झाली. कुलोपासक आणि भक्तांच्या आर्थिक मदतीतून पाहता पाहता मंदिर उभं राहिलं आणि २०१८च्या चैत्रोत्सवात मंदिराचं कलशारोहण झालं. या मंदिराच्या प्रांगणातला चैत्रोत्सव मात्र २०१३ सालापासूनच साजरा केला जातोय. सुरुवातीला छोटी घुमटी बांधून आणि तसबीर ठेवून केला जाणारा हा उत्सव आता अत्यंत भव्यदिव्य स्वरूपात होतोय. दर वर्षी त्याचं वैभव वाढतच जातंय. इथे 'वैभव' हा शब्द आर्थिकदृष्ट्या अपेक्षित नाही. या उत्सवात केली जाणारी आध्यात्मिक उपासना, सांस्कृतिक वारशाची जपणूक आणि भक्तिभावाने त्यात सहभाग घेणाऱ्या भाविकांची वाढती संख्या या अर्थाने वैभव हा शब्द वापरला आहे. मंदिर आताच्या काळात उभारण्यात आलेलं असलं, तरी त्याचं बांधकाम करताना जुन्या काळातल्या मंदिरांचा अभ्यास करून त्यातल्या आवश्यक त्या तत्त्वांचा आदर्श ठेवून ते उभारलेलं आहे. मंदिराच्या बांधकामात कुठेही श्रीमंती भपका दिसत नाही. त्या मंदिराची आध्यात्मिक श्रीमंती मात्र तिथे गेलेल्या सश्रद्ध व्यक्तीला जाणवल्याशिवाय राहत नाही. (यंदा श्री लक्ष्मीपल्लीनाथाचा ११०वा आणि या नव्या मंदिराच्या प्रांगणातला चौदावा उत्सव होता.)
एखादं देवस्थान जागृत आहे, असं केव्हा म्हटलं जातं? अनेक भक्तांना चांगले अनुभव येतात आणि त्याची कीर्ती पसरत जाते, तेव्हा ते जागृत देवस्थान म्हणून नावारूपाला येतं. उपासना केल्याशिवाय माणसाची प्रगती होत नाही... मग ती ऐहिक जीवनातल्या कष्टांच्या रूपातली उपासना असो किंवा आध्यात्मिक जीवनातली साधनारूपी उपासना असो! अगदी हेच तत्त्व देवस्थानाच्या बाबतीतही लागू पडतं. धार्मिक-आध्यात्मिक उपासना घडवणारे कार्यक्रम एखाद्या देवस्थानात भक्तांकडून सातत्याने आणि मुख्य म्हणजे भक्तिभावाने घडत असतील तर तिथलं ईशतत्त्व अधिकाधिक जागृत होत जातं, असं या क्षेत्रातल्या जाणकार व्यक्ती सांगतात. ती सामूहिक उपासनेची शक्ती असते. तेच बळ पुढे त्या ईशतत्त्वाकडून सर्व भक्तांना मिळत जातं. कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये असलेलं ईशतत्त्व आणि मंदिरातलं ईशतत्त्व शेवटी एकच असतं ना! ते जागृत करणं आपल्याच हातात असतं. आताच्या काळातल्या भाषेत सांगायचं झालं, तर अशा जागृत देवस्थानातूनच 'पॉझिटिव्ह व्हाइब्ज' मिळतात. श्री लक्ष्मीपल्लीनाथ मंदिरात येणाऱ्या कोणालाही या 'व्हाइब्ज' अगदी आल्याक्षणी जाणवतात. हे या उत्सवांचंच संचित आहे. वैज्ञानिक भाषेत सांगायचं झालं, तर ऊर्जा अक्षय्यतेचा नियम या ठिकाणी लागू पडत असावा. ऊर्जा कधीही नष्ट होत नाही, तिचं एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतर करता येतं, असं हा नियम सांगतो. भक्तांच्या उपासनेतून, श्रद्धेच्या भावनेतून निर्माण झालेली ऊर्जा ईशतत्त्वाशी एकरूप होते आणि त्यातून ती पुन्हा सर्व भक्तांना मिळते, असं आपण म्हणू शकतो. आध्यात्मिक बाबतीत बोलायचं झालं, तर आपल्या हातून जितकं सत्कार्य (उपासना) घडेल, तितकी किंबहुना त्यापेक्षा जास्तच सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळत जाते आणि देवस्थान हा त्यातला एक दुवा असतो. श्री देव लक्ष्मीपल्लीनाथाच्या मठ गावातल्या या देवळात गेल्यानंतर हे जाणवल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच या मंदिराची कीर्ती अल्प काळात दूरदूरपर्यंत पसरली आहे आणि तिकडचे भाविक आवर्जून या उत्सवाला हजेरी लावू लागले आहेत.
लेखाच्या सुरुवातीला केलेल्या उल्लेखानुसार, या उत्सवाची आणखी काही वैशिष्ट्यं पाहू या. हा कोकणातला सर्वांत मोठा चैत्रोत्सव ठरला आहे, असं म्हणायला हरकत नाही. याचं कारण असं, की कोकणात अनेक ठिकाणी मोठे उत्सव होत असले, तरी त्यामध्ये जत्रा असते. जत्रांमध्ये मोठी गर्दी होते. त्यामुळे त्या उत्सवांमध्ये गर्दीचे उच्चांक मोडले जातात; पण उत्सवात प्रत्यक्ष सहभागी असलेल्यांची संख्या कमी असते. मठ इथल्या लक्ष्मीपल्लीनाथाच्या या चैत्रोत्सवात मात्र जत्रा नसते. येणारे सर्व कुलोपासक आणि भक्तमंडळी प्रत्यक्ष उत्सवात सहभागी होतात. मठच्या या उत्सवात पारंपरिकता आणि आधुनिकता यांचा सुरेख संगम असतो. उत्सवाचं व्यवस्थापन, आयोजन, नीटनेटकेपणा आणि एकंदरीत सांगायचं झालं, तर उत्सवाचं मॅनेजमेंट आधुनिक पद्धतीने होतं; पण उत्सवातले धार्मिक विधी, कीर्तन, भोवत्या, पालखी-छबिना या सर्व गोष्टी पारंपरिक पद्धतीनेच होतात. उत्सवात मंदिराची आणि प्रामुख्याने मूर्तीची सजावट अत्यंत उत्तम पद्धतीने आणि कोणाही कलासक्त व्यक्तीला हरीरूपाची अधिकच गोडी लावील, अशा पद्धतीची असते. त्यात फुलांचा तर वापर स्वाभाविकपणे असतोच; पण फळं, भाज्या आदींचा वापर करूनही मूर्तीची सजावट किती सुंदर पद्धतीने करता येऊ शकते, हे देहभान हरपून पाहत राहण्यासारखंच. अर्थात, सजावटीइतकंच महत्त्व धार्मिक विधी साग्रसंगीत, शास्त्रशुद्ध पद्धतीने मनोभावे करण्याला दिलं जातं आणि मुळात उपासना घडावी यासाठीच उत्सवाचा सगळा घाट घातलेला असतो, याचं कुठेही आणि कुणालाही विस्मरण होत नाही, हे आवर्जून नमूद करायला हवं.
वेदपठण, मंत्रजागराने उत्सवाची सुरुवात होते. दर वर्षी या चैत्रोत्सवात चतुःषष्टी राजोपचार पूजा केली जाते. त्यामध्ये ६४ उपचारांनी पूजन केलं जातं. साहजिकच त्याचा व्याप सर्वार्थाने मोठा असतो. सर्वसाधारणपणे अन्य ठिकाणी प्रत्येक वार्षिकोत्सवात ही पूजा केली जातेच असं नाही; लक्ष्मीपल्लीनाथाच्या चैत्रोत्सवात मात्र ती कटाक्षाने दर वर्षी केली जाते. त्या व्यतिरिक्त त्या त्या दिवसानुसार सौर याग, रुद्र स्वाहाकार, गणेशयाग, विष्णुयाग, दत्तयाग, नवचंडी असे यज्ञयागही केले जातात. यंदाही ते करण्यात आले आणि त्याच्या जोडीला यंदा संपूर्ण उत्सवकाळात ऋग्वेद संहिता पारायणही करण्यात आलं. वेदशास्त्रसंपन्न आणि धर्माचरणी ब्रह्मवृंदाकडून हे सारे विधी पार पाडले जातात.
या मंदिरातलं कीर्तनही पारंपरिक पद्धतीने होतं. वेदान्त, अध्यात्म, विज्ञान आणि आजच्या काळातलं व्यावहारिक जीवन अशा सगळ्या गोष्टींची सांगड घालून योग्य विषय ताकदीने मांडणाऱ्या, अभ्यासू कीर्तनकारांना या उत्सवासाठी बोलावलं जातं. यंदाच्या उत्सवात ह. भ. प. मकरंदबुवा सुमंत (रामदासी) यांचं कीर्तन झालं. त्यांना सुशील गद्रे (हार्मोनियम), विश्वास (राजू) जोशी (तबला) यांनी साथसंगत केली. 'भाव धरी संता पायी' या अभंगाच्या ओळीच्या अनुषंगाने मकरंदबुवांनी वेगवेगळे विषय कीर्तनांतून मांडले. सध्याच्या काळात भोंदूपणाचा बाजार झाला आहे आणि भोंदूबाबांची बजबजपुरी झाली आहे. या पार्श्वभूमीवर, बुवांनी 'संत कसे ओळखावेत' याबद्दल मार्गदर्शन केलं. ह. भ. प. अमेयबुवा गुण्ये (रामदासी) यांनी लळिताचं कीर्तन केलं. या मंदिराचं सभागृह कीर्तनावेळीही संपूर्ण भरलेलं असतं, हे या उत्सवाचं आणखी एक वेगळेपण आहे. अनेक ठिकाणी केवळ उपचार म्हणून कीर्तन होतं आणि तिथे सक्तीने माणसं बसवावी लागतात, असं विदारक चित्र असतं. लक्ष्मीपल्लीनाथाचा चैत्रोत्सव त्याला अपवाद आहे.
दिवसभर धार्मिक विधी, तिन्हीसांजेला साग्रसंगीत पारंपरिक आरत्या, मग नामजप, त्यानंतर रात्री नऊ ते मध्यरात्री बारा वाजेपर्यंत कीर्तन आणि रात्री बारानंतर पहाटेपर्यंत भोवत्या असं या उत्सवाचं सर्वसाधारण स्वरूप असतं. आपापले नोकरी-व्यवसाय सांभाळून सलग आठवडाभर या उत्सवात उपस्थित राहणं हे येरागबाळ्याचं काम नाही. तरीही या उत्सवात दररोज मोठी गर्दी असते, हे या उत्सवाचं वेगळेपण नव्हे तर काय! एके दिवशी संध्याकाळी संगीताचा कार्यक्रम, तसंच एके दिवशी स्थानिक कलाकारांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम असतो. यंदा तरुण गायक अजिंक्य पोंक्षे यांची 'संगीतरजनी' ही अभंग, भक्तिसंगीत, नाट्यसंगीताची सुरेल मैफल झाली. त्यांना सुशील गद्रे (हार्मोनियम), विश्वास (राजू) जोशी (तबला) आणि कैलास दामले (पखवाज) यांनी उत्तम साथसंगत केली.
तरुणाईचा आश्वासक सहभाग
भोवत्यांमध्ये नाचण्यापासून भाविकांना जेवण वाढण्यापर्यंत, धार्मिक विधींपासून उत्सवाच्या मॅनेजमेंटपर्यंत, वाद्यवादन-गीतसादरीकरणापासून रांगोळी घालण्यापर्यंत आणि साफसफाईपासून सजावटीपर्यंत उत्सवाशी निगडित सर्वच कार्यक्रमांमध्ये, कामांमध्ये तरुणाईचा मोठ्या प्रमाणावर सहभाग हे या उत्सवाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. हे सर्व जण स्वयंप्रेरणेने काम करतात. 'प्रोटोकॉल'च्या नावाखाली नाटकीपणा दिसत नाही. आजच्या मोबाइलच्या आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) युगात तरुणाई या उत्सवात एकत्र येऊन सहभागी होते, हे कौतुकास्पद आहे. तरुणाईची सकारात्मक ऊर्जा उत्सवात असल्यावर मग कशाची कमतरता का भासेल बरं? अगदी काही महिन्यांच्या बाळांपासून नव्वदी ओलांडलेल्या ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत सर्व जण या उत्सवाला उपस्थित असतात; पण अगदी आताच्या भाषेत सांगायचं, तर मिलेनियल्स (१९८१ ते १९९६ या कालावधीत जन्मलेले), जेन झी (१९९७ ते २०१२ या काळात जन्मलेले) आणि जेन अल्फा (२०१३ नंतर जन्मलेले) या सगळ्या पिढ्यांमधलं सळसळतं रक्त या उत्सवात मोठ्या प्रमाणात सहभागी झालेलं दिसतं, हे या उत्सवाचं खरं वैभव आहे. या उत्सवात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरासारख्या सामाजिक उपक्रमांनाही म्हणून चांगला प्रतिसाद मिळतो. यंदा २७ जणांनी या शिबिरात रक्तदान केलं.
श्री लक्ष्मीपल्लीनाथ हा अंदाजे ४० कुटुंबांचा (कुळांचा) कुलस्वामी आहे. त्यात प्रामुख्याने कऱ्हाडे ब्राह्मणांचा समावेश आहे. दर वर्षी कोणी तरी एक कुटुंब उत्सवाची आर्थिक जबाबदारी उचलतं आणि ती उत्तम रीतीने निभावतंही. अर्थातच, यजमान कोणीही असलं, तरी अन्य सर्वांची त्यांना उत्तम साथ मिळते. म्हणूनच हा उत्सव अत्यंत चांगल्या रीतीने पार पडतो. उत्सव कुलोपासकांचा असला, तरी उत्सवाला उपस्थित राहण्यासाठी कोणतंही बंधन नसतं. या उत्सवाला आवर्जून उपस्थित राहणाऱ्या कुलोपासकांव्यतिरिक्तच्या अन्य भक्तांचंही प्रमाण मोठं आहे. त्याचं कारण म्हणजे या उत्सवाच्या वेगळेपणाची सर्वत्र पसरलेली कीर्ती! मोबाइलच्या आजच्या युगात हा उत्सव 'व्हायरल' झाला नसता तरच नवल! आता तर तिथे भक्तनिवासाचंही काम जोरात सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या भक्तांच्या वास्तव्याची चांगली सोयही लवकरच उपलब्ध होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेकडच्या खेडपासून शेजारच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगडपर्यंत अशा अनेक ठिकाणांहून अनेक भक्त यंदा हा उत्सव पाहण्यासाठी आवर्जून आले होते.
उत्सवाच्या काळात दररोज अन्नदानही केलं जातं. यंदा संपूर्ण उत्सवकाळात दररोज सुमारे एक हजारांहून अधिक भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला. अन्नदानाच्या ठिकाणची व्यवस्था दररोज वेगवेगळ्या गावातल्या कुलोपासकांकडे सोपवलेली असते. त्यामुळे एवढी गर्दी असली, तरी भोजनगृहात सारं काही गोंधळाविना शिस्तीत पार पडतं. रात्री उशिरापर्यंत हा अन्नयज्ञ सुरू असतो.
उत्साहपूर्ण भोवत्या
भोवत्या हा या उत्सवाचा सर्वांत महत्त्वाचा आकर्षणबिंदू. वेगवेगळी पदं म्हणून हरिनाम घेत आनंदाने नाचणं, त्यातल्या संगीताचा आणि तालाचा आनंद घेणं हे या भोवत्यांचं ढोबळ स्वरूप. या भोवत्यांमध्ये पारंपरिक अभंगांचंच गायन केलं जातं. वेशभूषाही पारंपरिकच असते. उत्सवाचं पावित्र्य टिकून राहावं, यासाठी या बाबी कटाक्षाने पारंपरिकच असाव्यात, यासाठी कुलोपासक आग्रही आहेत. मूळचे नागपूरचे असलेले कीर्तनकार ह. भ. प. विनोदबुवा खोंड यांनी एकदा या उत्सवात कीर्तनसेवा केली होती. त्या वेळी त्यांनी भोवत्या हा प्रकार महाराष्ट्रात केवळ रत्नागिरी जिल्ह्यातच पाहायला मिळतो, असं निरीक्षण नोंदवलं होतं. शिवाय, लक्ष्मीपल्लीनाथाच्या मंदिरात पारंपरिकता जपून होणाऱ्या भोवत्यांचं त्यांनी कौतुकही केलं होतं. 'समाजाचं ऐक्य टिकायचं असेल, तर अशा पद्धतीचं कार्य व्हायलाच हवं,' असं मत त्यांनी मांडलं होतं.
इथल्या भोवत्यांमध्ये अनेक वेगवेगळी पदं म्हटली जातात. पदं म्हणणारी मंडळीही वेगवेगळी असतात; मात्र त्या सगळ्यातून निर्माण होणारा आनंद मात्र एकसारखाच असतो. 'आनंदकंद घ्या हा छंद, घ्या मुकुंद मुरारी गोविंद' हे या भोवत्यांमध्ये हमखास म्हटलं जाणारं एक पद. तबला-पेटी-टाळ-मृदंग अशा वाद्यांच्या साथीने पदाच्या तालावर नाचणारी हजारो पावलं एका वेगळ्याच आनंदात तल्लीन झालेली असतात. मध्यरात्र सरून पहाट व्हायला लागते, तसतसा या भोवत्यांना अधिकच रंग चढतो. वर्तुळाकार नाचणाऱ्या स्त्री-पुरुष भक्तांचा हा तालबद्ध नृत्याविष्कार नुसता पाहणंदेखील आनंद देणारं असतं, मग प्रत्यक्ष नाचणाऱ्यांचा आनंद काय बरं वर्णावा! आनंदकंद या शब्दाचा अर्थ आनंदाचा उगम किंवा आनंदाचं मूळ. आनंदाचं मूळ नेहमी आपल्या स्वत्वात आणि आपल्यातल्या ईशतत्त्वात दडलेलं असतं, असं अध्यात्म सांगतं. अध्यात्माच्या भाषेत त्याला आत्मानंदही म्हणतात. या आनंदाचं मूळ शोधण्याचा प्रवास म्हणजे जीवन. जीवनाच्या या प्रवासात अनेक चढउतार असतात, अनेक प्रकारच्या अडचणी तर असतातच असतात. त्यात गांजलेला मनुष्य कंटाळून जातो, काही वेळा वाट चुकतोही; पण आनंदकंदाचा शोध घेण्याचा छंद त्याला लागला तर मात्र ही वाटचाल सुकर होते. मठ इथल्या श्री देव लक्ष्मीपल्लीनाथाचा चैत्रोत्सव म्हणजे त्या आनंदकंदाचा छंद लावणारं एक प्रभावी साधन आहे!
- अनिकेत कोनकर
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment