कमल रणदिवे - अमृत महाराष्ट्र

कमल रणदिवे

कर्करोग आणि विषाणू यांच्या संबंधांवरील संशोधनासाठी प्रसिद्ध असलेल्या कमल रणदिवे यांचा ११ एप्रिल हा स्मृतिदिन. त्यांचा कार्यपरिचय...

कमल रणदिवे मुख्य फोटो
मुख्य फोटो

कमल जयसिंग रणदिवे यांचा जन्म आठ नोव्हेंबर १९१७ रोजी पुणे येथे झाला. त्यांचे शिक्षण हुजूरपागा या प्रशालेत झाले. वैद्यकीय शिक्षण घ्यावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. परंतु त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात वनस्पती व प्राणिविज्ञान हे मुख्य विषय घेऊन पदवी संपादन केली. पुढे त्यांनी पुण्याच्या कृषी महाविद्यालयातून पदव्युत्तर पदवी मिळवली. अ‍ॅनोनेसी (सीताफळ) कुलातील पेशीजननशास्त्र हा पदव्युत्तर पदवीवेळी त्यांचा मुख्य विषय होता. त्यानंतर त्या मुंबईमध्ये टाटा मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये रुजू झाल्या. त्यांनी विकृतिविज्ञानातील (पॅथॉलॉजी) तज्ज्ञ आणि इंडियन कॅन्सर रिसर्च सेंटरचे संस्थापक संचालक वसंत रामजी खानोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई विद्यापीठातून पीएचडी पदवी संपादन केली. पुढे त्यांच्याच सल्ल्याने त्यांनी बाल्टिमोर येथील जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी जॉर्ज गे यांच्या मार्गदर्शनाखाली ऊतीसंवर्धन तंत्रज्ञानावर संशोधन केले. 

रणदिवे भारतात परतल्यानंतर पुन्हा इंडियन कॅन्सर रिसर्च सेंटरमध्ये वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून काम करू लागल्या. तेथे त्यांनी प्रायोगिक ऊतीसंवर्धन प्रयोगशाळा आणि प्रायोगिक जीवविज्ञान विभाग सुरू केले. त्यांनी काही काळ इंडियन कॅन्सर रिसर्च सेंटरच्या संचालकपदाची जबाबदारीसुद्धा सांभाळली. तेथे कार्यरत असताना त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह ऊतीसंवर्धनासाठी आवश्यक वृद्धी मिश्रणे आणि रसायनांची निर्मिती करण्यात यश मिळवले. तसेच तेथे कर्करोग पेशी, प्रतिक्षमता आणि पेशीविज्ञान संशोधन विभाग नव्याने चालू करण्यात महत्त्वाचा सहभाग घेतला. कर्करोग पेशींचे विकृतिक्रिया विज्ञान, प्राण्यांवरील प्रयोगातून करताना त्यांनी स्तन कर्करोग, रक्ताचा कर्करोग यांवर केलेले काम महत्त्वपूर्ण होते. रणदिवे यांचे महत्त्वाचे संशोधन कर्करोग, संप्रेरके आणि विषाणूजन्य कर्करोग यांच्यातील परस्परसंबंध हे होते. 

कुष्ठरोग जिवाणू (मायकोबॅक्टेरियम लेप्री) यामुळे झालेल्या कुष्ठरोगावरील लसीमुळे संबंधित कुष्ठरोगाचे प्रमाण कमी झाले. स्त्रिया आणि बालकामधील कर्करोगावर संशोधन करण्याची प्रेरणा त्यांनी इतर संशोधकांना दिली. आदिवासी समूहातील रक्ताच्या, प्रतिक्षमता रक्त तपासण्या हा त्यांच्या संशोधनाचा मुख्य भाग होता. रणदिवे यांनी टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये विकृतिविज्ञान विभागात उंदराच्या बाह्य स्तन लक्षणावरून स्तन कर्करोग ओळखण्यावर तुलनात्मक अभ्यास केला होता. स्तन कर्करोगावर त्यांनी बरेच संशोधन केले. रणदिवे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह ‘सत्य निकेतन’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यात आदिवासी बालकांच्या पोषणावर पथदर्शी कार्य केले. इंडियन विमेन सायंटिस्ट्स असोसिएशनच्या त्या संस्थापक सदस्या होत्या. असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी आरोग्य आणि वैद्यकीय सेवा प्रकल्प अहिल्यानगर जिल्ह्यातील खेड्यांमध्ये राबवला.

रणदिवे यांना पद्मभूषण पुरस्कार, तसेच इतरही महत्त्वपूर्ण मानसन्मान मिळाले. त्यात मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाकडून सिल्व्हर ज्युबिली रिसर्च ॲवार्ड (१९६४), जी जे वाटुमल फाउन्डेशन प्राइझ (१९६४), इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचा गुणश्री वैद्यकीय संशोधक सन्मान. कर्करोग आणि कुष्ठरोग यांवर त्यांचे दोनशे शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. अशा या थोर संशोधिकेचे ११ एप्रिल २००१ पुण्यात निधन झाले.

(संदर्भ - मराठी विश्वकोश)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 11-04-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 234 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 11-04-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 234 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement