५२ वर्षे वृत्तपत्र वितरण आणि २२ वर्षे बातमीदारीचे व्रत निष्ठेने निभावलेले सटाणा (जि. नाशिक) येथील विश्वास चंद्रात्रे यांनी वयाचा अमृतमहोत्सव पूर्ण केला असून, त्यांना देशदूत वृत्तपत्राने बागलाण भूषण पुरस्काराने गौरवले आहे. त्यांचा हा प्रेरक कार्यप्रवास...
केवळ स्वप्ने मोठी असून चालत नाही, ती पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची, कार्यनिष्ठेची पराकाष्ठा करावी लागते. नुसते कार्य करणे महत्त्वाचे नाही, तर जे काम आपण करतो ते मनापासून, प्रमाणिकपणे आणि चिकाटीने करणे खूप महत्त्वाचे आहे, तरच ते कार्य समाजावर प्रभाव टाकू शकते. अशाचच कार्यनिष्ठेचे, प्रामाणिकपणाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नाशिक जिल्ह्यातील सटाणा परिसरात गेल्या पाच दशकांपासून अविरतपणे वृत्तपत्र वितरण आणि पत्रकारिता करणारे आदरणीय व्यक्तिमत्त्व विश्वास चंद्रात्रे.
आज 'एआय'चा जमाना आहे. कालानुरूप अनेक व्यवसायांचे स्वरूप बदलले. तंत्रज्ञानाने माहितीची साधने बदलली. आज जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील कोणत्याही स्वरूपाची माहिती अगदी एका क्लिकवर उपलब्ध आहे. तरीही कोणतेही तंत्रज्ञान माणसापेक्षा मोठे नाही. कितीही साधने आली, तरी व्यक्तीची आपल्या कामाप्रति असलेली निष्ठा महत्त्वाची असते. कारण ते कार्य तंत्रज्ञानामुळे नाही, तर त्यामागे असणाऱ्या व्यक्तीच्या अथक परिश्रमांनी पूर्णत्वास जाते. अशीच कार्यनिष्ठा चंद्रात्रे यांनी सिद्ध केली आहे. त्यांनी आपल्या कष्टातील सातत्य, दुर्दम्य जिद्द आणि वाचकांप्रति असलेल्या बांधिलकीत कधीच खंड पडू दिला नाही.
१९७३मध्ये अत्यंत बेताच्या परिस्थितीतून त्यांनी वृत्तपत्रवितरणाचा प्रवास सुरू केला. आज त्यांच्या या प्रवासास ५२ वर्षे झाली आहेत. आजही ते त्याच उत्साहाने आपले कार्य करत असतात. आजही बारा उपविक्रेत्यांच्या माध्यमातून वृत्तपत्र वितरणाचे त्यांचे काम अविरत चालू आहे. त्यांचे सर्व सहकारी त्यांच्या कुटुंबाचाच एक भाग बनले आहेत. 'असो किती माध्यमे तरीही संवाद व्हावा थेट, संपर्क वाढतो माणूस जुळतो, जेव्हा होते भेट,' या उक्तीप्रमाणे सहकाऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, त्यांच्याशी असलेले आपुलकीचे नाते जपणे आणि त्यांच्याशी विश्वासाचे बंध जपणे ही त्यांच्या कार्यशैलीची ठळक वैशिष्ट्ये आहेत.
१९७८ साली देशदूत या वृत्तपत्रात त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या कारकिर्दीला सुरुवात केली. फक्त वृत्तपत्र वितरणापुरते मर्यादित न राहता बातमीदार म्हणूनही त्यांनी जबाबदारी सहज स्वीकारली आणि निभावलीही. याच वृत्तपत्रातून त्यांनी २२ वर्षे ग्रामीण भागातील प्रश्न जोमाने मांडले. सामाजिक बांधिलकी जपून बातमीदारी केली. त्यांनी त्यांच्या लेखणीतून कायमच सामान्य नागरिक, शेतकरी, कष्टकरी यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. १९८०च्या दशकातील शेतकऱ्यांच्या 'भीक नको, हवे घामाचे दाम' या ऐतिहासिक आंदोलनामध्ये त्यांनी दाखवलेली कार्यतत्परता त्यांच्या कार्यनिष्ठेची साक्ष देते. १९८१ साली अत्यंत विपरीत परिस्थिती असताना, रस्ते व वाहतूक ठप्प असतानासुद्धा त्यांनी बातमीदारी आणि वृत्तपत्र वितरणाचे काम अत्यंत चिकाटीने आणि अखंडपणे चालू ठेवले. रात्री उशिरा मोटरसायकलवरून नाशिक गाठून दोन ते अडीच हजार प्रतींचे गठ्ठे घेऊन येणे आणि पहाटेपर्यंत ती सारी वृत्तपत्रे वितरित करण्याचे अवघड कामही त्यांनी सहज केले. कामाप्रति असलेल्या निष्ठेशिवाय हे होऊ शकत नाही. त्या वेळी आंदोलकांनीही त्यांना रस्ता मोकळा करून दिला होता. दैनिक देशदूतचे तत्कालीन मालक, संपादक, व्यवस्थापक यांनीसुद्धा श्री. चंद्रात्रे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या कार्याचे कौतुक आणि सन्मान केला होता. त्यांच्या अशा निःस्पृह कार्यसेवेमुळे सर्वांसाठी ते आदरणीय आहेत.
आता त्यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली आहेत. तरीही त्यांची ऊर्जा, कार्यनिष्ठा यत्किंचितही कमी झालेली नाही. त्याच जोमाने आणि उत्साहाने ते कार्य करत असतात. त्यांचे हे गुणविशेष पुढील पिढीसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहेत. जोपर्यंत श्वासात श्वास आहे, शरीर जिवंत आहे तोपर्यंत ही सेवा सुरूच राहील असा ठाम विश्वास त्यांना आहे. त्यांचा हा प्रवास त्यांच्या कार्यनिष्ठेची साक्ष देतो. प्रामणिक कष्ट, कामाप्रति असलेली निष्ठा आणि समाजाच्या भल्यासाठी आपल्या परीने योगदान करण्याची सकारात्मक मानसिकता यांमुळेच विश्वास चंद्रात्रे यांचे वेगळेपण भावते, पुढील पिढीसाठी मार्गदर्शक ठरते आणि प्रेरणास्रोत ठरते.
(माहिती स्रोत : देशदूत)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment