नाशिकमधील अनोखा श्रीराम रथोत्सव - अमृत महाराष्ट्र

नाशिकमधील अनोखा श्रीराम रथोत्सव

दर वर्षी चैत्र शुद्ध एकादशी अर्थात कामदा एकादशीला नाशिकमध्ये श्रीराम रथोत्सव साजरा होतो. त्याविषयी...

नाशिकमधील अनोखा श्रीराम रथोत्सव मुख्य फोटो
नाशिकमधील अनोखा श्रीराम रथोत्सव अतिरिक्त फोटो

भारत हे विश्व संस्कृतीचे उगमस्थान आहे. जागतिक स्तरावर मानवाने केलेल्या संशोधनांचा विचार केल्यास त्यात भारताचा सिंहाचा वाटा आहे. भारताचे जगासाठी अध्यात्म, संस्कृती, तत्त्वज्ञान, अवकाश विज्ञान, ज्योतिषशास्त्र, दर्शनशास्त्र, गणित अशा असंख्य क्षेत्रांत अमूल्य असे योगदान आहे. भारतीय परंपरा, सण, उत्सवसुद्धा अवघ्या विश्वासाठी आदर्श आहेत. अध्यात्म आणि विज्ञान यांचा सुंदर मिलाफ म्हणजे या परंपरा. भारतात अशा अनेक अनोख्या आणि वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहेत. त्यातीलच एक परंपरा म्हणजे रथोत्सव. या परंपरेतून आपल्याला त्या काळच्या सामाजिक समरसतेचे उत्तम उदाहरण पाहायला मिळते. कोणत्याही देवाच्या मोठ्या उत्सवानंतर रथोत्सवाची परंपरा आपल्या देशात वर्षानुवर्षे चालू आहे. अगदी छोट्या छोट्या गावांमध्येही ही परंपरा बघायला मिळेल. या रथोत्सवामागचा हेतू हाच आहे, की समस्त गावाला त्या देवाचे दर्शन घडावे आणि तो उत्सव त्या गावातील सर्व जाती-धर्मांतील लोक साजरा करू शकतील. नाशिकमध्येही अशीच एक परंपरा आहे. श्रीराम नवमी अर्थात प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवानंतरच्या एकादशीला श्रीराम रथोत्सव साजरा केला जातो.

नाशिक म्हणजे प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली भूमी. नाशिकमध्ये प्रभू श्रीरामांचे वास्तव्य होते. त्यामुळे येथील पंचवटी, काळाराम मंदिर, सीतागुंफा, कपालेश्वर, गोराराम मंदिर यांसारख्या वास्तू नाशिकची ओळख आहेत. नाशिकच्या अस्तित्वाचा प्रेरणास्रोत आहेत. या वास्तूंमध्ये प्रभू श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण, हनुमान यांचा पावन स्पर्श जाणवतो. त्या वास्तूत प्रवेश केला, की मन भारावते. काळाराम मंदिरातील मूर्ती तर हजार वर्षे जुन्या आहेत. श्रीराम नवमीनंतर दोनच दिवसांनी अर्थात एकादशीला रथोत्सव साजरा केला जातो. रथोत्सवाची ही परंपरासुद्धा सुमारे एक हजार वर्षांपासून आजतागायत सुरू आहे. या रथोत्सवाला एवढे भव्य स्वरूप साधारण २८६ वर्षांपासून आले आहे. त्याची एक कथा अशी सांगितली जाते - सवाई माधवराव पेशवे एकदा आजारी पडले. त्यांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी श्रीमंत गोपिकाबाई पेशवे यांनी प्रभू श्रीरामाला नवस केला. त्या नवसाची पूर्तता म्हणून बरे वाटल्यानंतर पेशव्यांनी प्रभू श्रीरामाला रथ अर्पण केला. या रथाच्या देखभालीची जबाबदारी पेशवे यांनी त्यांचे मामा सरदार रास्ते यांच्याकडे सोपवली.

आखाडा तालीम संघाची स्थापना

या जबाबदारीच्या निमित्ताने रास्ते यांनी त्या वेळी तरुण मंडळी एकत्र येण्याकरिता रास्ते आखाडा तालीम संघाची स्थापना करून व्यायामप्रेमी व पहिलवान घडवले आणि नंतर हेच पहिलवान रथोत्सवात रथ ओढण्याचे काम करू लागले. तेव्हापासून आजतागायत सरदार रास्ते आखाडा तालीम संघाकडे श्रीरामरथाची जबाबदारी आहे. श्रीरामरथाचे मानकरी हे सरदार रास्ते आखाडा तालीम संघाचे पदाधिकारी असतात, तर गरूडरथाचा मान अहिल्याराम व्यायाम शाळेकडे आहे. रथोत्सवाचे मुख्य मानकरी हे बुवा असतात. श्रीरामाचा रथ हा पूर्णपणे सागवानी लाकडापासून तयार केलेला आहे. काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजापासून निघणाऱ्या या रथोत्सव यात्रेत तमाम नाशिककर मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात.

रथयात्रा - चैत्र शुद्ध एकादशी 

चैत्र शुद्ध एकादशी अर्थात कामदा एकादशीच्या दिवशी प्रभू श्रीरामांचा रथ नगरप्रदक्षिणा करतो. भाविकांना प्रभू श्रीरामांचे दर्शन होते. रथोत्सवाच्या दिवशी रथाचे मानकरी असलेले बुवा दोन्ही रथांकडे तोंड करून उलट्या दिशेने रथोत्सव मार्गावर मार्गक्रमण करत असतात. दर वर्षी पुजारी कुटुंबीयातील सदस्यांना हा मान मिळत असतो. रथोत्सवाच्या आदल्या दिवशी मालवीय चौकातून रथ राममंदिराकडे नेला जातो. रथोत्सवापूर्वी श्रीरामरथ व गरूडरथाला रंगरंगोटी करून आकर्षक विद्युत रोषणाईचे काम केले जाते. गरूडरथ आकाराने श्रीरामरथापेक्षा थोडा लहान आहे. रथाच्या पुढच्या बाजूला जो लाकडी दांडा असतो त्याला रथाचे नाडे गुंडाळलेले असतात. त्यामुळे रथ वळवता येतो. त्या लाकडी दांड्याला धुरा म्हणतात. रथोत्सवाची तयारी पूर्ण झाल्यानंतर आदल्या दिवशी रथांची चाके, धुरा यांची तपासणी करून चाकांना वंगण लावण्याचे काम केले जाते. धुरा वाहण्याचा मान समस्त पाथरवट समाज श्रद्धेने पार पाडतो. 

रथयात्रेला प्रारंभ करण्यापूर्वी ढोल, नगारा, झांज यांच्या गजरात मानकऱ्यांचा सत्कार होतो. प्रभूंचा प्रसाद म्हणून सालकरी बुवांकडून हार घालण्यात येतो व श्रीफळ देऊन सत्कार केला जातो. मानकरी म्हणजे श्री अहिल्याराम तालीम संघाचे पदाधिकारी, श्री रास्ते आखाड्याचे पदाधिकारी, श्री काळाराम संस्थानाचे अध्यक्ष, विश्वस्त, तसेच वंशपरंपरागत सेवा करणारे सेवेकरी, उत्सवात व इतर वेळीही सेवा देणारे भाविक. त्यानंतर सालकरी बुवांच्या हस्ते ‘राजाधिराज श्री रामचंद्र महाराज की जय! महारुद्र हनुमान की जय’ असा जयघोष करून श्रीफळ वाढवण्यात येते. जरीचे पांढरेशुभ्र उपरणे फेट्यासारखे बुवांच्या डोक्यावर बांधले जाते. रथयात्रेत बुवांचे उन्हापासून संरक्षण व्हावे, तसेच त्यांची वेगळी ओळख समजावी, हा हेतू. सालकरी बुवांच्या हातात प्रभू श्रीरामचंद्रांच्या पादुका व श्रीराम, लक्ष्मण व सीता यांच्या भोगमूर्ती ठेवल्या जातात. मूर्ती अलंकृत केल्या जातात व प्रभूंवर चांदीच्या चवऱ्यांनी वारा घातला जातो. सर्वच उपस्थित भाविक प्रभूंच्या पादुकांचे दर्शन घेतात. प्रभूंच्या पादुका व मूर्तींना हात लावून दर्शन घेण्याची सगळ्यांनाच मुभा असते. कोणत्याही तर्‍हेचा भेदभाव तेथे नाही. श्रीरामांच्या पादुका व भोगमूर्ती घेऊन सालकरीबुवा मंदिराभोवती एक प्रदक्षिणा मारतात व पूर्वेला घंटेखालील बाजूला चांदीची पालखी ठेवलेली असते तिथे येतात. 

असंख्य भाविक दर्शनाचा लाभ घेतात. पालखीत विधिवत पूजा-आरती करून श्रीरामांच्या पादुका व भोगमूर्ती ठेवण्यात येते व खऱ्या अर्थाने रथयात्रेला प्रारंभ होतो. येथून सालकरीबुवा प्रभूंना पाठ दाखवायची नसते म्हणून ते प्रभूंकडे तोंड करून म्हणजे पालखीकडे तोंड करून उलटे चालतात. सालकरी मंदिराच्या पूर्वेला पूर्व दरवाज्याबाहेर येतात. तिथे गरूडरथ तयार असतो. गरूडरथ व श्रीरामरथ उत्तम तऱ्हेने सजवलेले असतात. सालकरीबुवा रथारूढ होतात. त्यांच्या हस्ते पूजा व आरती केली जाते. श्रीरामांच्या पादुका व भोगमूर्ती पालखीतून गरूडरथात ठेवल्या जातात. त्यानंतर श्री अहिल्याराम व्यायाम प्रसारक मंडळाचे मानकरी व धुरीचे मानकरी यांच्या हस्ते धुरीवर श्रीफळ वाढवला जातो. पुढील बाजूला बांधलेल्या दोरखंडाने (त्याला नाडा म्हणतात) श्री अहिल्याराम व्यायाम प्रसारक मंडळाच्या कर्यकर्त्यांकडून व भाविकांकडून रथ ओढावयास सुरुवात होते. गरूडरथ श्रीरामरथाजवळ बाजूला थांबवला जातो. रामसीतेच्या नामाच्या गजरात श्रीरामांच्या भोगमूर्ती पालखीत ठेवल्या जातात. नंतर आरती केली जाते व सालकरीबुवा गरूडरथातून उतरून श्रीरामरथावर आरूढ होतात. श्रींची पालखी श्रीरामरथाजवळ घेतली जाते. पूजा करून श्रीरामांची मूर्ती असलेला गरूडरथ व त्यानंतर श्रीरामरथ अशी भव्य रथयात्रा सुरू होते. रथयात्रेबरोबरच ढोल-नगारा पथक, बॅंडपथक, लेझीम पथक याचाही समावेश असतो. अशी ही भव्य रथयात्रा श्रीराम मंदिराच्या पूर्व द्वारापासून सुरू होते. 

रथयात्रा गणेशवाडीतून गाडगेमहाराज पुलाखाली येते. श्रीरामरथ व सालकरीबुवा तेथेच थांबतात. सालकरी बुवा व्रतस्थ असतात. त्यांना नदी ओलांडायची नसते. गरू रथ नदी ओलांडून तेथील आसपासच्या परिसरात फेरी मारतो. बालाजी मंदिरापासून गरूडरथ कपूरथळा मैदानात येतो. येथे सर्व विश्रांती घेतात. येथेच बालाजी कोटावर गायधनी परिवारातर्फे गरूडरथ ओढणाऱ्या भाविकांना जलपान दिले जाते. जलपानाच्या विश्रांतीनंतर रथयात्रा गाडगे महाराज पुलाखालील सांडव्यावरून नदी ओलांडून पंचवटी परिसरात येतो. तोपर्यंत सालकरीबुवा व श्रीरामरथ तिथेच असतात. भाविक प्रचंड संख्येने दर्शनाला येत असतात. हजारोंच्या संख्येने भाविक म्हसोबा पटांगण, गाडगे महाराज पूल, रामसेतूपूल, तसेच नदीच्या दोन्ही काठांवर उपस्थित राहून प्रभू श्रीरामांच्या दर्शनाचा लाभ घेतात. रथातून पादुका व भोगमूर्ती यांची विधिवत पूजा करून त्या पालखीत ठेवल्या जातात व वाजतगाजत रामकुंडावर येतात. तोपर्यंत रात्रीचे नऊ वाजलेले असतात. रामकुंडावर षोडशोपचार पूजा, अभिषेक व स्नान होते. या स्नानाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक भाविकाला पादुका व मूर्तीला स्नान घालता येते. कोणत्याही तऱ्हेचा भेदभाव तेथे नाही. 

पूजाधिकारी व पुजारी परिवारातील तरुण मंडळी पादुका व मूर्ती घेऊन रामकुंडाच्या काठावर प्रदक्षिणा मारतात, जेणेकरून उपस्थित असलेला प्रत्येक भाविक लाभ घेऊ शकेल. या स्नानानंतर मूर्तीला पोशाख चढवून आरती होते व परत पादुका गरूडरथात आणि मूर्ती श्रीरामरथात विराजमान होते. मंदिराच्या पूर्वद्वारी आल्यानंतर विधिवत पूजा-आरती होऊन पादुका व मूर्ती पालखीत ठेवल्या जातात. पूर्व दरवाजात पुजारी परिवारातील सुवासिनींकडून व इतर महिलांकडून औक्षण केले जाते. पालखी व हनुमानाची मूर्ती मंदिरात आणली जाते. सर्वांना पिठीसाखरेचा प्रसाद दिला जातो नंतर शेजारती होऊन रथयात्रा उत्सवाची सांगता होते.

अशा या परंपरा सकल समाजाला एकत्र आणण्यासाठी, सामाजिक समरसतेसाठी महत्त्वपूर्ण आहेत. आपला समाज संघटित करण्यासाठी हे उत्सव साजरे केले जातात. अशा धार्मिक आणि आध्यात्मिक धाग्यांनी त्यांना एकत्र ठेवता येते. हीच आपली संस्कृती आहे. मूर्ती, पालखी आणि रथ अशा प्रतीकांमधून एकात्मेतेचे हे सूत्र शतकानुशतके बांधले गेले आहे आणि असेच भविष्यातही बांधले जाणार आहे. तेव्हा रथोत्सवासारख्या अशा परंपरा आपण पुढच्या पिढीपर्यंत नेल्या पाहिजेत. तरच आपली संस्कृती फुलणार आहे आणि चिरंतन टिकून राहणार आहे.

(माहिती स्रोत : श्री. चेतन पुजारी व श्री. धनंजय पुजारी यांच्याकडून मिळालेली माहिती. वेबदुनिया वेबसाइट)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 28-03-2026 News publication date | Time: 07:55 PM News publication time | Views: 25 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 28-03-2026 News publication date | Time: 07:55 PM News publication time | Views: 25 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement