शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्यांचा आढावा घेणारा सुदर्शन जोशी यांचा लेख...
जगाच्या इतिहासात अनेक राजे आले आणि गेले. अनेक महात्मे आले आणि गेले, तरी त्यापैकी काहींचीच नावे इतिहासात अमर होतात, असे का ? १४ हजार वर्षांनंतरसुद्धा रामायण भारताच्याच नव्हे, तर जगातील अनेक राष्ट्रांच्या हृदयांमध्ये कोरलेले आहे. कृष्णाच्या लीला सात हजार वर्षांनंतरसुद्धा घराघरांमध्ये गायल्या जातात. याचे एक कारण म्हणजे श्रीराम, श्रीकृष्ण यांसारख्या व्यक्ती, त्यांची चरित्रे अशी काही शिकवण देत असतात, की जी हजारो वर्षांनंतरसुद्धा लागू पडत असते. शिवाजी महाराज हीदेखील अशाच अलौकिक विभूतींपैकी एक विभूती आहे, जिने इतिहासावर अजरामर ठसा उमटवला आहे. असे म्हणतात, की रामायण नीतिप्रधान आहे, महाभारत कर्मप्रधान आहे, तर भागवत हे भक्तिप्रधान आहे. याच साखळीत पुढे आपल्याला असे म्हणता येते, की शिवचरित्र हे व्यवस्थापन प्रधान आहे.
एकोणिसाव्या शतकामध्ये युरोपात औद्योगिक क्रांतीचा विस्तार होत होता, तेव्हा उद्योगांमध्ये कर्मचारी, वित्त, व्यवसाय, मार्केटिंग इत्यादी सांभाळण्यासाठी मॅनेजर्सची गरज भासू लागली. त्यातूनच पुढे आधुनिक व्यवस्थापन तंत्र, कौशल्ये आणि थिअरीज निर्माण झाल्या; पण जरा विचार केला तर समजते, की व्यवस्थापन कौशल्ये पुरातन काळापासून सर्व क्षेत्रांमध्ये आवश्यकच राहिली आहेत. शिवचरित्र हे अशा व्यवस्थापन तंत्रांचे आणि कौशल्यांचे गाइडबुकच म्हणता येईल. शिवरायांच्या मॅनेजमेंटच्या काही तंत्रांची चर्चा शिवजयंतीनिमित्त करणे प्रासंगिक तर आहेच, शिवाय स्वाभिमान आणि आत्मविश्वास जागवणारे आहे.
बऱ्याचदा असे दिसते, की एखादा व्यवसाय, चळवळ, आंदोलन किंवा संस्था ही संस्थापकाच्या नंतर दुबळी होत जाते. एका कणखर नेत्यावरच त्या चळवळीची सर्व शक्ती आणि प्रभाव अवलंबून असतो. त्या कणखर नेत्याच्या अनुपस्थितीत ती संस्था वा चळवळ दुर्बल होत जाऊन शेवटी संपून जाते. जगाच्या पाठीवर याची अनेक उदाहरणे आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात बघायला मिळतात. त्यामुळे आपल्या सहकाऱ्यांमधून नवीन नेतृत्व निर्माण करणे ही खऱ्या नेत्याची कसोटी ठरते. शिवाजीराजांनी आपल्या सामान्य सहकाऱ्यांमधून असामान्य कामगिरी करणाऱ्या नेतृत्वाची फळी उभी केली होती. पुरंदरावर युद्ध करताना मुरारबाजी धारातीर्थी पडले. नेता पडल्यावर सैन्य गलितगात्र आणि हतोत्साही होण्याची अनेक उदाहरणे भारताच्या इतिहासात सापडतात. परंतु मुरारबाजी पडल्यावर पुरंदराहून शिवरायांना निरोप जातो, त्यात मावळ्यांनी म्हटलेलं आहे, "एक मुरारबाजी पडला म्हणून काय झाले, आम्हीही तैसेच आहोत, हिम्मत धरून लढतो!" बुंदेलखंडातून कुमार छत्रसाल शिवाजीराजांच्या सैन्यात चाकरी करावी म्हणून त्यांना भेटायला आला होता. शिवाजीराजांनी छत्रसालाला तलवार बक्षीस देऊन सांगितले, "तू तुझ्या प्रांतात परत जा. स्वतःचे राज्य उभे कर." शिवरायांची प्रेरणा घेऊन छत्रसाल जो निघाला, त्याने खरेच स्वातंत्र्याचे युद्ध मांडले. पुढे स्वतंत्र बुंदेलखंडाचा राजा म्हणून छत्रसाल नावाजला गेला. नवीन नेतृत्व निर्माण करण्याची शिवाजीराजांची क्षमता ही आपल्या सहकाऱ्यांवर असलेला विश्वास आणि प्रेम यावर आधारलेली होती. आपल्या मनात असलेले उद्दिष्ट आपल्या सहकाऱ्यांच्या मनातही तशाच तीव्रतेने बिंबवल्यामुळे, स्वतःहून जबाबदारी घेऊन नेतृत्व स्वीकारण्याची मानसिकता सहकाऱ्यांमध्ये तयार झाली. Leader is the one who creates more leaders (नेता म्हणजे अशी व्यक्ती, की जी आणखी नेते घडवते) ही आजच्या मॅनेजमेंटच्या तत्त्वांनुसार नेत्याची एक महत्त्वाची व्याख्या आहे. प्रत्येक सामान्य मावळ्यामध्ये जबाबदारीची जाणीव शिवरायांनी एवढी तीव्र केली होती, की पुढे संपूर्ण एका पिढीचा कालखंड लोटल्यावर एक काळ असा आला, की राजा नसतानाही सैन्य मात्र स्वयंस्फूर्तीने प्रचंड शत्रूसैन्याशी वर्षानुवर्षे लढत राहिले. राजाशिवाय प्रजेने लढून स्वातंत्र्याचे युद्ध मांडल्याचे आणि अंतिमतः विजय मिळवल्याचे उदाहरण इतिहासात क्वचितच कुठे आढळेल. या यशाचे मुख्य कारण म्हणजे शिवाजीराजांनी कधीही उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम केले नाही. स्वतःच्या हातचे राखून कधीही काम केले नाही. "लीडिंग फ्रॉम द फ्रंट" या तत्त्वाप्रमाणे प्रत्येक आणीबाणीच्या प्रसंगी ते स्वतः परिस्थितीला भिडले. अफझलखान वधापासून ते शाहिस्तेखानावरील हल्ल्यापर्यंतच्या प्रत्येक घटनेत त्यांनी स्वतः आचरणाने दाखवले, की उद्दिष्ट किती मोठे आहे आणि त्यासाठी काय काय करण्याची तयारी असली पाहिजे. त्यामुळेच मुलाचे लग्न सोडून सिंहगडावर स्वारी करायला जाणारा तान्हाजी तयार झाला. पावनखिंडीत देहाची भिंत करून शत्रूला अडवणारा बाजीप्रभू तयार झाला.
"उद्दिष्टाची स्पष्टता" ही एका यशस्वी मॅनेजरची महत्त्वाची खूण आपल्याला शिवरायांमध्ये बघायला मिळते. कधी आघात करू, कधी माघारही घेऊ; पण ध्येयावरून नजर कधीही ढळणार नाही, अशा प्रकारची नीती राजांनी अवलंबली. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा" हे ध्येय पुरंदरचा तह करतानासुद्धा मनातून हटले नव्हते. दिल्ली दरबारात औरंगजेबाच्या भेटीला जातानाही हटले नव्हते. रायगडला राजधानी करताना काशीचा विश्वनाथ आपल्याला सोडवायचा आहे याची जाणीव राजांना पुरेपूर होती. "अहत पेशावर, तहत तंजावर हिंदवी स्वराज्य व्हावे" या उद्दिष्टाची जाणीव आपल्या सहकाऱ्यांमध्ये शिवरायांनी अशा प्रकारे बिंबवली होती, की दोन पिढ्या उलटल्यानंतर राघोबादादांनी जेव्हा अटकेपार भगवे झेंडे रोवले, तेव्हा पुण्याला पाठवलेल्या पत्रात त्यांनी म्हटलेले आहे, "थोरल्या आबासाहेबांचे स्वप्न आपण जवळजवळ पूर्ण करत आणले आहे." राघोबांनाही जाणीव होती, की शिवरायांचे स्वप्न हे फक्त भोसले कुटुंब किंवा मराठी राज्यापुरते मर्यादित नसून, आसेतुहिमाचल भारतवर्ष स्वतंत्र करण्याचे आहे. गायकवाड, शिंदे, होळकर, पवार इत्यादी सरदारांनी हिंदुस्थानातील विविध प्रांतांत मारलेल्या मुसंड्या, थोरल्या बाजीरावांनी दिल्लीपर्यंत मारलेली धडक, अटकेपार झालेली राघोभरारी या सर्वांची मुळे ही शिवरायांनी पेरलेल्या स्पष्ट उद्दिष्टाच्या बीजात आहेत.
कुठल्याही क्षेत्रातील मॅनेजरला विविध विषयांची चौफेर माहिती असणे आवश्यक समजले जाते. अगदी एमबीएसाठीच्या इंटरव्ह्यूमध्ये क्रीडा, मनोरंजन, नाट्य क्षेत्रापासून अर्थ, राजनैतिक इत्यादी कुठल्याही विषयांचे प्रश्न विचारले जातात. शिवाजीराजांच्या ऐतिहासिक यशामागे त्यांच्या राज्यातील अत्यंत सावध, अत्यंत चोख अशा बिलंदर हेरखात्याचा सिंहाचा वाटा आहे. राज्यात सर्वत्र फिरून परिस्थितीचा अंदाज घेणे, आवश्यक ती माहिती राजांना देणे, शत्रूच्या गोटात काय चालले आहे याची खडानखडा माहिती/अपडेट्स राजांना पोहोचवणे ही कामे बहिर्जी नाईकांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याचे हेरखाते अथवा आजच्या भाषेत "इंटेलिजन्स" विभाग करे. चोरवाटा, गुप्त बातम्या, शत्रूच्या गोटात आपल्याशी सहानुभूती असलेले कोण कोण, आपल्या गोटात शत्रूशी मिळालेले लोक कोण, असा सर्व प्रकारचा महत्त्वाचा तपशील वेळोवेळी मिळत गेल्यामुळे नियोजन करणे राजांना सुलभ होई. डेटा अॅनालिसिस करणे आणि त्यातून इन्साइट्स काढणे हे आज महत्त्वाच्या व्यवस्थापन कौशल्यंपैकी एक आहे. मिळालेल्या माहितीवरून समोरच्या शत्रूचे बलस्थान कोणते, दुर्बल स्थान कोणते आणि त्याचा कसा वापर करून घ्यायचा हे शिवचरित्रातून शिकायला मिळते. अफजलखानाच्या अहंकाराचा वापर त्याच्याच विरोधात करून त्याला राजांनी सापळ्यात अडकवला होता. शाहिस्तेखानाच्या गोटात असलेला ढिसाळपणा, त्याच्या सैन्यामधली अव्यवस्था, दिरंगाई याचा वापर त्याच्याच विरुद्ध केला गेला. सुरतेवर स्वारीचे नियोजन असो वा आग्र्याहून सुटण्याची योजना असो, डेटा आणि त्याचे विश्लेषण हा कायम महत्त्वाचा दुवा राहिला आहे. कुठलाही निर्णय घ्यायच्या आधी त्यासंबंधीचा सर्व प्रकारचा तपशील माहीत असणे, आपली बलस्थाने व दुबळी स्थाने माहीत असणे, आपल्या स्पर्धकांबद्दलची सगळ्या प्रकारची माहिती असणे आणि त्यानुसार योग्य ती योजना आखणे हे आजच्या यशस्वी मॅनेजरचे सर्व गुण शिवरायांमध्ये पुरेपूर दिसतात.
सर्व तपशील जमा झाल्यानंतर अचूक प्लॅनिंग आणि तितकेच अचूक एक्झिक्युशन हे तर व्यवस्थापनाचे शिखरच! शिवरायांची रणनीती हा तर स्वतंत्र लेखनाचा विषय आहे. शिवरायांना उकसवण्यासाठी अफजलखानाने पंढरपूरचे मंदिर भग्न केले. राजांची कुलदेवता असलेली तुळजाभवानी फोडली. मंदिरात गाय कापून तिचे मांस पुजाऱ्यांना खायला लावले. शिवाजी चवताळून बाहेर यावा आणि आपल्या तावडीत सापडावा ही खानाची मनीषा; पण अफझलखानाच्या दुर्दैवाने राजे फारच हुशार होते! दुनियाभरचे डावपेच आणि क्लृप्त्या वापरून जावळीच्या खोऱ्यात अवघड ठिकाणी खानाचे सैन्य आणून बसवले. प्रतापगडच्या पायथ्याशी अफजलखानाला भेटीसाठी बोलावले, जणू हसत हसत आमंत्रण देऊन फौजेनिशी खानाला काही मृत्यूच्या मुखातच आणून सोडले होते. पुढचा इतिहास तर सर्वश्रुत आहेच. राजांनी संयम पाळला होता. संधीची वाट बघितली होती, नव्हे तशी संधी निर्माण केली होती आणि योग्य वेळ येताच खानाचा कोथळा काढायचा तो काढलाच होता. आपल्या सोयीच्या वेळी, आपल्या सोयीच्या ठिकाणी शत्रूला खेचून आणून आपल्या नियमांप्रमाणे त्याला खेळायला लावून त्याला हरवणे हा अत्यंत कौशल्याचा डाव राजांनी सर्व काळ वापरला. शाहिस्तेखानही पुण्यामध्ये तीन वर्षे धुमाकूळ घालत होता. योग्य संधी आणि योग्य वेळ पाहून त्याच्यावर अशा प्रकारे हल्ला चढवला गेला, की हा औरंगजेबाचा मामा हाताची बोटे गमावून चरफडत पळून गेला. मराठ्यांचा धाक सर्वत्र रातोरात पसरला होता. गनिमी कावा हा शिवरायांचा युद्धप्रकार जगप्रसिद्ध आहे.
वाईटात वाईट काय होऊ शकते अशा परिस्थितीचे अर्थात worst case scenarioचेही (वर्स्ट केस सिनॅरिओ) नियोजन शिवाजीराजांनी अनेकदा केलेले आढळते. अफजलखानाच्या भेटीस जाताना आपल्या जिवाचे काही बरे वाईट झाले तर पुढे जिजाबाईंच्या आदेशाखाली संभाजीला गादीवर बसवून सरनोबत नेताजी पालकरांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याचा लढा पुढे चालवण्याचा संदेश राजांनी दिलेला होता. सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा अगदी सुयोग्य वापर आपल्या गनिमी काव्यासाठी, रणनीती आखण्यासाठी सुंदर रीतीने शिवाजीराजांनी केला. आपल्या हातातील रिसोर्सेस (साधनसंपत्ती) कसे वापरावेत याचे हे उदाहरण. सपाट मैदानी प्रदेश, हत्तीदळ आणि आग ओकणाऱ्या तोफा हे शत्रूचे बलस्थान होते, तर सह्याद्रीच्या अवघड पर्वतरांगा, वेगवान घोडेस्वार आणि काटक मावळे हे मराठ्यांचे बलस्थान होते. त्यामुळे शिवाजीराजांनी कधीही समोरासमोर युद्धाचा प्रसंग येऊच नये असे पाहिले. सह्याद्रीच्या अवघड दऱ्याखोऱ्यांमध्ये, अंधाऱ्या रात्री, चपळ व वेगवान हालचाली करून शत्रूच्या नाकी नऊ आणणे आणि आपल्याकडे असलेल्या बलस्थानांचा वापर करून शत्रूला जेरीस आणणे हा उद्योग मराठ्यांनी कायम केला. अशा प्रकारे हातात असलेले रिसोर्सेस उत्तम रीतीने वापरणे हे कुशल मॅनेजरचे लक्षण असते. उंबरखिंडीतील कार्तलब खानाशी केलेले युद्ध हे या सह्याद्रीच्या वापराचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
स्वराज्यापासून हजारो मैल दूर असलेल्या आग्र्यामध्ये शिवाजीराजे नऊ वर्षांच्या संभाजींसह नजर कैदेत होते. आपली माणसे जवळ नसताना, आपले राज्य दूर असताना, शत्रूच्या हजारो सैनिकांच्या गराड्यात फसलेले असताना, ज्या पद्धतीने तिथून सुटण्याची योजना शिवाजीराजांनी आखली आणि ती योजना पूर्णत्वास नेली हे अगदीच अजब आहे. औरंगजेबाच्या सरदारांना लाच देण्यापासून आजारी पडल्याचा बहाणा आणि गरिबांना पेटार्यातून मिठाई वाटण्याचा कार्यक्रम आणि एके दिवशी त्याच मिठाईच्या पेटाऱ्यात बसून शंभूराजासह बेमालूमपणे आग्र्याहून पलायन... हे सगळे अगदी चकित करणारे आहे.
१६७७ साली शिवाजीराजांनी दक्षिण दिग्विजयाची मोहीम हाती घेतली. तमिळनाडूच्या जिंजी किल्ल्यापर्यंत पार दक्षिणेच्या टोकापर्यंत स्वराज्याचा विस्तार केला. पुढे येणाऱ्या औरंगजेबाच्या मुघली झंझावातासमोर एक पर्यायी प्लॅन बी असावा, एक बॅकअप प्लॅन असावा या दृष्टीने केलेली ही व्यवस्था होती. राजांच्या दूरदृष्टीचे महत्त्व इतिहासाने लवकरच सिद्ध केले. सुमारे १२ वर्षांनंतर तत्कालीन छत्रपती राजाराम महाराज असताना औरंगजेबाच्या झंझावातापुढे स्वराज्याला महाराष्ट्रात जेव्हा टिकता आले नाही, तेव्हा राजाराम महाराजांनी थेट जिंजीला जाऊन आश्रय घेतला होता आणि तिथून प्रतिकाराचा गाडा हाकला होता. आदिलशाही आणि कुतुबशाही हेही शिवाजीराजांचे शत्रूच होते. परंतु मुघलांशी लढण्यासाठी दक्षिणेतील या दोन्ही शाह्यांसोबत आघाडी करण्याचीही शिवरायांनी तयारी केली होती. कोलॅबोरेशनचे हे एक उदाहरण होते. "दक्खनियांची पातशाही दख्खनियांच्याकडेच" असा 'मोटो' घेऊन त्यांनी ही आघाडी बांधण्याचा प्रयत्न केला होता. एवढेच कशाला, औरंगजेबाचा सरदार जयसिंग जेव्हा स्वराज्यावर चालून आला होता, त्या वेळीसुद्धा शिवाजीराजांनी राजपूत आणि मराठ्यांच्या एकत्रिकरणातून मुघलांशी कसा लढा उभारता येईल याविषयी जयसिंगाचे मन वळवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. कोलॅबोरेशन करून विन विन सिच्युएशन तयार करणे ही आजच्या मॅनॅजमेंटची कौशल्ये राजांना अवगत होती असेच इथून दिसते.
याच प्रकारचे व्यवस्थापन कौशल्य शिवाजीराजांनी आर्थिक आणि प्रशासकीय कामातसुद्धा दाखवले आहे, जनतेच्या प्रश्नांत म्हणजे सोशल वेल्फेअरमध्येसुद्धा दाखवलेले आहे. भारतीय इतिहास सांगतो, की महर्षी वाल्मिकींनी नारद मुनींना प्रश्न केला, की या जगतात सर्वसद्गुणसंपन्न असा कोणी मनुष्य आहे का? या प्रश्नाच्या उत्तरादाखल नारदमुनींनी वाल्मिकींना प्रभू श्रीराम, त्याचे चरित्र आणि त्याची कथा याचे वर्णन केले. इथूनच पुढे रामायणाचा उगम होतो. अशाच प्रकारे आपण प्रश्न केला, की या जगात सार्वकालिक श्रेष्ठ असा व्यवस्थापक कोण? तर त्याच्या उत्तरादाखल शिवाजी महाराज, त्यांचे चरित्र आणि त्यांच्या चित्तथरारक कहाण्या यांची गाथा सुरू होईल. सर्व क्षेत्रांत भरारी घेण्यास सिद्ध असलेल्या भारत देशाला सध्या व्यवस्थापकांची आणि कर्तबगार, नेतृत्वक्षमता असलेल्या तरुणांची गरज आहेच. शिवजयंतीच्या दिवशी शिवरायांच्या या सर्व कथा-कहाण्यांचे चिंतन करून एक उत्तम व्यवस्थापक आणि आपल्या क्षेत्रातील अधिकारी होण्याच्या दिशेने वाटचाल आपण करू या, याच शुभेच्छा!
(लेखक कम्प्युटर इंजिनीअर आहेत.)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment