मातृभाषा टिकवू या, संस्कृती जपू या!

मातृभाषा दिनानिमित्त मराठी भाषेविषयीचा हा लेख...

मातृभाषा टिकवू या, संस्कृती जपू या! मुख्य फोटो
मुख्य फोटो

दर वर्षी २१ फेब्रुवारीला संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे जागतिक मातृभाषा दिवस साजरा करण्यात येतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुभाषावादाला प्रोत्साहन देण्यासाठी, भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेला चालना देण्यासाठी दर वर्षी हा दिवस साजरा करण्यात येतो. जागतिक मातृभाषा दिवस युनेस्कोकडून (UNESCO) १९९९ साली पहिल्यांदा साजरा करण्यात आला. जागतिकीकरण आणि तंत्रज्ञानाच्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या वापराने जगभरातील अनेक भाषा लोप पावत चालल्याचे चित्र आहे; मात्र असे होऊ नये यासाठी युनेस्कोने पुढाकार घेऊन मातृभाषा आणि त्याबरोबर संबंधित संस्कृती टिकावी यासाठी या दिवसाची निवड केली आहे. जगात सुमारे सात हजार भाषा बोलल्या जातात. भारतातही प्रामुख्याने २२ भाषा बोलल्या जातात. आपल्या महाराष्ट्रीय लोकांची मातृभाषा म्हणजे मराठी. आपल्या मराठी भाषेविषयी काही रंजक गोष्टी या निमित्ताने जाणून घेऊ या.

आठव्या शतकाच्या शेवटी लिहिल्या गेलेल्या ‘कुवलयमाला कथा’ नावाच्या ग्रंथात जवळपास १८ देशी भाषांचा उल्लेख करण्यात आल्याचे आढळून येते. त्या भाषांमध्ये ‘मरहट्ट’ नावाचीही एक भाषा आढळून येते. मरहट्ट जनसमुदाय आणि त्यांच्या भाषेच्या वर्णनासाठी ‘दढमडह सामलंगे सहिरे अहिमाण कळहसीले य दिण्णले गहिल्ले उल्लाविरे तत्थ मरहट्टे’ असे लिहिण्यात आले आहे. मराठी भाषेच्या उदयाची गोष्ट सन ८५९मध्ये घेऊन जाते. तिथे ‘धर्मोपदेशमाला’ ग्रंथामध्ये ‘मरहट्ट’ भाषेचा उल्लेख असल्याचे आढळून येते. हे सर्व उल्लेख बघता मराठी भाषेला प्राचीन काळात ‘मरहट्ट’ म्हटले जात असावे, असे जाणवते. मराठी भाषेच्या नावाचा उल्लेख यादवकालीन साहित्यामध्येही करण्यात आला. तिथे या भाषेसाठी ‘मऱ्हाटी’ असा शब्द वापरला गेल्याचे दिसून येते. मऱ्हाटीसोबतच त्या काळात मराठी भाषेसाठी असणारे दुसरे नाव म्हणजे ‘देशी.’ महानुभव पंथांचे ग्रंथ आणि ज्ञानेश्वरीमध्ये मराठीचा उल्लेख अशाच प्रकारे असल्याचे दिसून येते. काळ पुढे गेला आणि मऱ्हाटीचे बहुविध उच्चार केले जाऊ लागले. पुढे ‘ऱ्ह’ शेवटच्या ‘टी’ला जोडला जाऊ लागला आणि त्यातूनच उदयास आलेला शब्द ठरला ‘मराठी.’ मराठी भाषेला मराठी हे नाव मिळण्यामागेही अनेक संदर्भ आहेत. मराठी हा शब्द महाराष्ट्र या शब्दाच्या अपभ्रंशातूनही आल्याचे एक मत आहे. मध्य प्रदेशातील एरण येथे इ. स. चौथ्या शतकातील शिलालेख सापडला होता. त्यात सर्वप्रथम ‘महाराष्ट्र’ या नावाचा उल्लेख आढळला होता. हा शिलालेख शक राजा श्रीधरवर्मा याचा सेनापती सत्यनाग याने युद्धात मरण पावलेल्या नाग लोकांच्या स्मरणार्थ उभारला होता. विशेष म्हणजे या लेखात सत्यनाग याने तो ‘माहाराष्ट्र’ म्हणजे महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचे सांगितले होते. यावरूनच प्राचीन महाराष्ट्रात नाग लोकांची वस्ती होती असे मानले जाते.

मराठी ही भारतातील सर्वांत जुन्या भाषांपैकी एक असून तिचा इतिहास सुमारे १३०० ते १५०० वर्षांहून अधिक जुना आहे. ऑक्टोबर २०२४मध्ये भारत सरकारने मराठीला 'अभिजात भाषेचा' दर्जा बहाल केला आहे. आज आपण मराठी लिहिण्यासाठी देवनागरी लिपी वापरतो. परंतु पूर्वी मराठी लिहिण्यासाठी 'मोडी' लिपीचा वापर केला जात असे. ही लिपी वेगाने लिहिण्यासाठी सोयीस्कर होती. कारण यात लेखणी न उचलण्यावर भर दिला जाई. मराठी ही भारतातील तिसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा असून, जागतिक स्तरावर ती १५ व्या क्रमांकावर येते. जगभरात सुमारे नऊ कोटींहून अधिक लोक मराठी बोलतात. मराठीत जवळपास ४२पेक्षा जास्त बोलीभाषा आहेत. यात अहिराणी, वऱ्हाडी, मालवणी, कोकणी आणि झाडी बोली यांसारख्या विविध प्रकारांमुळे भाषेला एक वेगळाच गोडवा प्राप्त झाला आहे. 

इतर अनेक भारतीय भाषांच्या तुलनेत मराठीत 'नपुंसकलिंग' हा तिसरा लिंगप्रकार स्पष्टपणे आढळतो. तो हिंदीसारख्या भाषांमध्ये नसतो. मराठीतील 'ळ' हे अक्षर अनेक भारतीय भाषांमध्ये आढळत नाही. ते मराठीला एक विशिष्ट नाद आणि ओळख देते. आपले मराठी गीतकार किती काटेकोरपणे लिहितात त्याचे एक उदाहरण म्हणजे कविवर्य ग. दि. माडगूळकर यांनी या ‘ळ’ अक्षराचा वापर एका गीतात किती छान केला आहे! ते गाणे आहे 'घननिळा लडिवाळा, झुलवू नको हिंदोळा' – या गाण्याच्या प्रत्येक ओळीचा शेवट ‘ळ’ याच अक्षराने झालेला आहे. 

शके १११०मध्ये मुकुंदराजांनी रचलेला विवेकसिंधू हा मराठी भाषेतील पहिला ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरांनी ‘परि अमृतातेही पैजा जिंके। ऐसी अक्षरे रसिके मेळवीन।’ अशा शब्दांत मराठी भाषेचा गोडवा अमृतापेक्षाही जास्त आहे असे म्हटले आहे. भगवद्‌गीता सर्वसामान्यांना समजावी, यासाठी ज्ञाने्वरी वा भावार्थदीपिका या ग्रंथाचे लेखन त्यांनी मराठीत केले. त्याचप्रमाणे श्री चक्रधर स्वामींनी लिहिलेले लीळाचरित्र म्हणजे मराठीतील पहिला मराठी पद्य चरित्रग्रंथ होय. तेव्हापासून पद्यलेखनाची परंपरा सुरू झाली. 

कालानुक्रमे मराठीच्या उगमापासून ते सध्याच्या मराठीच्या स्वरूपात अनेक बदल झालेले दिसतात. या बदलाचे एक कारण म्हणजे मराठी मातीत राज्य केलेल निरनिराळ्या सत्ता होय. त्यापैकी १२५० ते १३५० या काळातील यादवी सत्ता, १६०० ते १७०० या काळातील शिवरायांची सत्ता, १७०० ते १८१८ पेशवाई सत्ता आणि १८१८पासून इंग्रजी सत्ता. यामुळे प्रत्येक काळात मराठी भाषेवर याचे परिणाम दिसून येतात. काळाप्रमाणेच स्थलानुसार मराठी भाषा बदलत गेली. शिवछत्रपतींच्या काळात फारशी भाषेचा प्रभाव मराठीवर झालेला दिसून येतो. त्या काळात राजकीय पत्रव्यहार, बखरी लिहिण्यासाठी मराठीचा वापर केलेला दिसून येतो. या पत्रांचा समावेश ‘मराठी रुमाल’ किंवा ‘पेशव दफ्तर’ यांसारख्या संग्रहातून करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘आज्ञापत्रात’ मराठी भाषेची बदललेली शैली दिसून येते. तसेच यावरून तत्कालीन सामाजिक, राजकीय, धार्मिक परिस्थितीचा प्रभाव भाषेवर पडत असतो, हे सिद्ध होते. पेशवेकाळात मराठी भाषेवर संस्कृतचे वर्चस्व प्रस्थापित झालेले दिसते. या कालखंडात संस्कृत काव्याचे अनुकरण करणाऱ्या पंडिती कविता लिहिल्या गेल्या. यातील कथाभाग, अलंकारिकता, अभिजात भाषावैभव या विशेषांमुळे पंडिती कवितेने मराठीला समृद्ध केले आहे. 

इंग्रजांच्या सत्ताकाळात इंग्रजी साहित्याच्या प्रभावामुळे मराठीत निबंध, कादंबरी, लघुकथा, शोकात्मिका असे अनेक नवे साहित्यप्रकार मराठीतून लिहिले जाऊ लागले. ‘केशवसुत’ हे या आधुनिक कवितेचे प्रवर्तक होते. त्यानंतर वि. वा. शिरवाडकर, प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे, चिं. वि. जोशी, कुसुमाग्रज, ग. दि. माडगूळकर, वि. स. खांडेकर, ना. सी. फडके यांसारख्या साहित्यिकांनी मराठीत आपल्या साहित्याची भर घालून मराठी भाषा मराठी मनामनातून जागृत ठेवली. आज सामाजिक शास्त्रे, तत्त्वज्ञान, चित्रकला, साहित्य, संगीत, नाटक यांसारख्या कलांचे समीक्षा-विचार मराठीत मूळ धरू लागले आहेत. असे असंख्य कवी आणि साहित्यकारांनी आपली मराठी भाषा खऱ्या अर्थाने समृद्ध केली आहे. ही आपली अभिजात भाषा टिकवणे आपल्या हातात आहे. आपण आपल्या घरात आपल्या मुलांशी मराठीत बोलणे, मित्रपरिवार किंवा जिथे जिथे मराठी बोलणे शक्य आहे, तिथे तिचा वापर करणे अशा छोट्या उपायांनी आपल्याला ही भाषा टिकवायची आहे. कारण ही मातृभाषाच आपली खरी ओळख आहे. 

जपा मराठी, लिहा मराठी

चला मराठीच बोलू या

जरी वावरलो जगात साऱ्या

फक्त मराठी राहू या...

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 21-02-2026 News publication date | Time: 03:55 AM News publication time | Views: 135 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 21-02-2026 News publication date | Time: 03:55 AM News publication time | Views: 135 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words