उक्ती आणि कृती

बोधकथा - ३१

उक्ती आणि कृती मुख्य फोटो
उक्ती आणि कृती अतिरिक्त फोटो

एका सज्जन व्यक्तीने विद्यालय सुरू केले. समाजाच्या विकासात सहभागी होऊ शकतील, असे सुसंस्कृत तरुण-तरुणी तयार करणे हा या विद्यालयाचा मुख्य उद्देश होता. एके दिवशी त्यांनी त्यांच्या शाळेत वादविवाद स्पर्धा आयोजित केली. स्पर्धेचा विषय होता - 'सर्व प्राणिमात्रांची सेवा.'

नियोजित दिवशी नियोजित वेळेत विद्यालयात स्पर्धेला सुरुवात झाली. सेवेसाठी साधनसंपत्ती आवश्यक असल्याचे सांगून काही विद्यार्थ्यांनी सांगितले, की जेव्हा आपल्याकडे पुरेशी साधने असतील तेव्हाच आपण इतरांची सेवा करू शकतो. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांनी असे सांगितले, की सेवेसाठी साधनांची गरज नसून, भावना असणे आवश्यक आहे.

अशा प्रकारे, सर्व स्पर्धकांनी एकापेक्षा एक सरस भाषणे केली. शेवटी बक्षीस देण्याची वेळ आली, तेव्हा त्या सज्जन व्यक्तीने स्पर्धेत सहभागीच होऊ न शकलेल्या एका विद्यार्थ्याची निवड केली. तो वेळेवर स्पर्धेच्या दालनात न आल्याने त्याला स्पर्धेत सहभागी होता आले नव्हते. अशा विद्यार्थ्याची विजेता म्हणून निवड झाल्याने संताप व्यक्त झाला.

त्या सज्जन व्यक्तीने सर्वांना शांत केले आणि सांगितले, 'तुम्हा सर्वांची तक्रार आहे, की मी असा विद्यार्थी का निवडला, ज्याने स्पर्धेत भागही घेतला नाही. खरे तर, मला हे जाणून घ्यायचे होते, की या विद्यार्थ्यांपैकी सेवा कोणाला चांगल्या प्रकारे समजते. म्हणूनच मी एक जखमी मांजर स्पर्धेच्या दालनाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवले होते. तुम्ही सगळे एकाच दारातून आत आलात; पण कोणीही मांजराकडे ढुंकूनही पाहिले नाहीत. हा एकमेव विद्यार्थी होता जो तिथे थांबला, त्याने त्या मांजरावर प्राथमिक उपचार केले आणि त्याला सुरक्षित ठिकाणी सोडले. म्हणून तो स्पर्धेच्या वेळेत दालनात येऊ शकला नाही आणि स्पर्धेत सहभागी होऊ शकला नाही. सेवा किंवा मदत या विषयावर केवळ बोलण्यापेक्षा ते कृतीतून दिसणे गरजेचे आहे.'

बोध : उक्ती आणि कृती यात विरोधाभास असून उपयोग नाही.

Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 16-02-2026 News publication date | Time: 12:12 PM News publication time | Views: 25 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news
Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 16-02-2026 News publication date | Time: 12:12 PM News publication time | Views: 25 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words