आर्य चाणक्यांनी सांगितलेले मंत्र
- आर्य चाणक्य
चाणक्यनीती ही आपल्या इतिहासातील सर्वांत प्रसिद्ध नीती आहे. जगात वावरताना कोणत्या गोष्टींचे भान ठेवावे, कोणत्या व्यक्तींपासून दूर राहावे, जगताना लागणारे नियम, राजकारणाची मूलभूत तत्त्वे अशा अनेक क्षेत्रांतले मार्गदर्शन चाणक्यांनी केले आहे. त्यातील एक महत्वाचे सूत्र म्हणजे आयुष्यातील हे तीन मंत्र आहेत.
आनंदात वचन देऊ नये. खरे तर कोणत्याही भावनेच्या भरात केलेली कृती ही चुकीची असू शकते. आनंदाच्या भरात दिलेले वचन पूर्ण करणे कधीकधी पश्चाताप करण्याची वेळ आणते. इतिहासातही अशी उदाहरणे आहेत, जेव्हा आनंदाच्या भरात दिलेले वचन अडचणीत आणणारे ठरले आहे. मग ते दशरथाने कैकयीस दिलेले वचन असो वा भगवंताने एखाद्या असुरास दिलेले वचन अथवा आशीर्वाद असो. म्हणूनच चाणक्य सांगतात, की आनंदाच्या भरात वचन देऊ नये. कारण तेव्हा आपण भावनिक होऊन वचन देतो. रागामध्ये दिलेला प्रतिसादही तसाच नुकसानकारक असतो. रागाच्या भरातही आपले आपल्या भावनांवर नियंत्रण नसते. अशात बोलून गेलेला एखादा शब्द आपले आयुष्य कायमचे उद्ध्वस्त करू शकतो. आपले एखादे जवळचे नाते कायमचे तुटू शकते. आपल्याविषयी असा एखादा गैरसमज निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे उर्वरित आयुष्यात एखादे शल्य कायमचे आपल्या मनात राहते. दु:खावेगाने कोणताही निर्णय घेऊ नये. इथेही आपल्या भावना आपल्या ताब्यात राहत नाहीत. दु:खात आपण एखाद्या घटनेने दु:खी झालेले असतो. आपली मानसिक अवस्था ठीक नसताना आपण घेतलेला निर्णय हा आपल्यालाच हानिकारक होऊ शकतो. मग या तिन्ही अवस्थेत केलेली कृती टाळण्यासाठी आपण काय करायला हवे? या प्रश्नाचे एकच उत्तर आहे ते म्हणजे संयम. या तिन्ही भावनांमध्ये थोडे थांबणे फार महत्त्वाचे असते. ती भावना ओसरून गेल्यावर आपल्याला त्या निर्णयाबद्दल तटस्थ राहता येते आणि तटस्थ राहून घेतलेला निर्णय कधीच अयोग्य नसतो.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment