स्वतःची खरी ओळख

बोधकथा - ३०

स्वतःची खरी ओळख मुख्य फोटो
स्वतःची खरी ओळख अतिरिक्त फोटो

एक भिकारी रेल्वे प्रवासात लोकांकडून भीक मागत होता. तेवढ्यात त्याला एक सूटबूट घातलेला श्रीमंत माणूस दिसला. भिकाऱ्याला वाटलं, 'याच्याकडून नक्कीच चांगले पैसे मिळतील.' म्हणून तो त्याच्याकडे भीक मागायला गेला.

त्याने त्याला पाहिलं आणि विचारलं, 'तू नेहमी मागतोसच, पण कधी कुणाला काही दिलं आहेस का?'

भिकारी म्हणाला, 'साहेब, मी तर भिकारी आहे. माझ्याकडे काहीच नाही, मग मी इतरांना काय देणार?'

तो माणूस म्हणाला, 'तू कुणाला काही देऊ शकत नाहीस, तेव्हा मागण्याचाही तुला अधिकार नाही. मी एक व्यापारी आहे. माझा विश्वास फक्त ‘देणं-घेणं’ या व्यवहारावर आहे. तुझ्याकडे देण्यासारखंकाही असेल, तरच मी तुला काही देईन.'

तेवढ्यात त्या माणसाचं स्टेशन आलं आणि तो ट्रेनमधून उतरला.

भिकारी मात्र त्याच्या त्या एका वाक्यावर विचार करत राहिला. त्या विचारांनी त्याचं डोकं हलवून टाकलं. त्याला वाटलं, 'कदाचित मला भीक मिळत नाही, त्याचं कारण मी त्या बदल्यात कुणालाही काही देत नाही.' पण लगेचच दुसरा विचार डोक्यात आला, 'मी तर भिकारी आहे, मी काय देणार?'

संपूर्ण दिवस तो याच विचारात घालवतो; पण उत्तर मिळत नाही.

दुसऱ्या दिवशी स्टेशनजवळ बसलेला असताना त्याला जवळच्या झाडांवर फुलं उमललेली दिसतात. त्याच्या डोक्यात विचार येतो, 'लोकांनी मला भीक दिल्यावर मी त्यांना फुलं दिली, तर?' हा विचार त्याला स्वतःलाच खूप आवडतो. तो काही फुलं तोडतो आणि ट्रेनमध्ये जातो.

जेव्हा कोणी त्याला भीक म्हणून काही पैसे देतं, तेव्हा तो त्यांच्याकडे हसून बघतो आणि म्हणतो, 'या पैशांसाठी तुमचे आभार! हे घ्या, हे फूल तुमच्यासाठी.'

लोक ती फुलं आनंदाने स्वीकारतात. अशा पद्धतीने त्याचा भीक मागण्याचा व्यवहार हळूहळू बदलतो. आता त्याला अधिक लोक पैसे देतात. फुलं संपेपर्यंत लोक भीक देतात, फुलं संपली की पैसेही थांबतात, असं त्याच्या लक्षात आलं.

अशातच काही दिवसांनी पुन्हा एकदा त्याला तोच श्रीमंत माणूस, ट्रेनमध्ये दिसतो. भिकारी लगेच त्याच्याकडे जातो आणि म्हणतो, 'साहेब, आज माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी फुलं आहेत. तुम्ही मला काही पैसे द्या, मी तुम्हाला फुलं देतो.'

तो हसतो आणि पैसे देतो. भिकारी त्याला फुलं देतो. तो माणूस म्हणतो, 'वा! काय मस्त! आता तूपण माझ्यासारखा व्यापारी झालास.'

ते ऐकून भिकाऱ्याच्या डोळ्यात चमक येते. तो ट्रेनमधून उतरतो, आकाशाकडे पाहून जोरात म्हणतो, 'मी भिकारी नाही. मी व्यापारी आहे! मी श्रीमंत होऊ शकतो, मी श्रीमंत होऊ शकतो!'

लोक त्याला पाहतात आणि त्यांना असं वाटतं, की तो वेडा झाला आहे. दुसऱ्या दिवसापासून तो भिकारी त्या स्टेशनवर दिसेनासा होतो.

एक वर्षानंतर त्याच स्टेशनवर सूटबूट घातलेली दोन माणसं बसलेली असतात. ट्रेनमध्ये चढल्यावर त्यापैकी एक जण दुसऱ्याला हात जोडतो आणि म्हणतो, 'आपण पुन्हा भेटलो आहोत. ओळखलंत का मला?'

आधीचा श्रीमंत माणूस म्हणतो, 'नाही, आपली आधीची भेट नाही आठवत.'

तो हसतो आणि म्हणतो, 'आपण एकदा नाही, दोनदा भेटलोय. मी तोच भिकारी आहे, जो एके काळी भीक मागत असे. तुम्ही मला दोन वेळा काहीतरी दिलं. पहिल्यांदा तुम्ही याची जाणीव दिली, की जेव्हा काही देऊ शकत असेल तेव्हाच काही मागावं आणि दुसऱ्यांदा तुम्ही मला याची जाणीव दिली, की मी भिकारी नाही, मी व्यापारी आहे.'

'आज मी फुलांचा एक मोठा व्यापारी आहे आणि दुसऱ्या शहरात व्यापाराच्या कामासाठी जात आहे. तुम्ही मला माझी ओळख दिली.'

बोध : आपण स्वतःला काय समजतो, यावरच प्रगती अलंबून असते. स्वतःची खरी ओळख समजून घेणं हेच परिवर्तनाचं खरं बीज आहे.

Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 13-02-2026 News publication date | Time: 03:19 AM News publication time | Views: 59 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news
Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 13-02-2026 News publication date | Time: 03:19 AM News publication time | Views: 59 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words