बोधकथा - २९
जुन्या काळातील एक गोष्ट आहे. एक वृद्ध योद्धा होता. त्या काळात तो सर्वत्र प्रसिद्ध असा योद्धा होता. त्याला कोणत्याही प्रकारच्या युद्धात कोणीच हरवू शकत नसे. त्याची कीर्ती सगळीकडे पसरली होती. त्याने त्याच्या शिष्यांना व मुलांना युद्धकलेचे शिक्षण देण्यास सुरुवात केली होती. त्याच वेळी एक तरुण योद्धाही त्याच्या कौशल्यामुळे प्रसिद्ध होत होता. अनेक दिग्गज योद्धे त्या तरुण योद्ध्यासमोर पराभूत होत असत. प्रतिस्पर्ध्याचे कच्चे दुवे ओळखून त्याला सहज पराभूत करण्यात त्याचा हातखंडा होता. अतिशय कमी कालावधीत त्याने तो वृद्ध योद्धा वगळल्यास सर्व योद्ध्यांना पराभूत करून दाखवले. त्याचीही कीर्ती सर्वत्र पसरली. वृद्ध योद्ध्यात आणि तरुण योद्ध्यात एक मोठा फरक होता. तरुण योद्ध्याला मिळणाऱ्या प्रसिद्धीमुळे त्याच्या मनात अहंकार जागृत झाला. त्याने विचार केला, की त्या वृद्ध योद्ध्यालाही हरवून आपण अजिंक्य होऊ. त्याने वृद्ध योद्ध्याला आव्हान दिले. शिष्यांनी मनाई केली, तरी वृद्ध योद्ध्याने त्याचे आव्हान स्वीकारले. तो तरुण योद्धा ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळी उपस्थित राहिला. आपणच जिंकू अशी कल्पना करून तो आनंदात होता; पण वृद्ध योद्धा मात्र शांत आणि संयमाने त्याच्यासमोर उभा होता. युद्ध सुरू झाले. तरुणाच्या प्रत्येक वाराला वृद्ध प्रतिवार करत होता. तरुण योद्धा हळूहळू दमू लागला आणि आपण हरतो आहे, हे लक्षात येताच त्याने अपशब्द वापरण्यास सुरुवात केली. वृद्धाचे लक्ष विचलित होईल असा त्याचा होरा होता; पण त्याचा उपयोग झाला नाही. वृद्ध अविचल राहिला, त्याचा संयम ढळला नाही. अखेरीस तरुण योद्धा पराजित झाला. तो गेल्यावर शिष्यांनी व वृद्धाच्या मुलांनी वृद्धाला विचारले, 'बाबा, तो योद्धा तुम्हाला अपशब्द वापरत होता, तरी तुम्ही शांत कसे राहिलात?' तेव्हा तो म्हणाला, 'मुलांनो, कोणतेही युद्ध असो किंवा आणखी कोणती परिस्थिती असो, मनाची एकाग्रता महत्त्वाची असते. शरीर कणखर असायलाच हवे; पण कोणत्याही परिस्थितीत मन कणखर असेल तर विजय निश्चित आहे.' बोध : मनाची एकाग्रता असेल, तर कशातही यश नक्की मिळते.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment