जहाँ चाह है, वहाँ राह है

विद्युत मोहन या तरुणाच्या वेगळ्या प्रयोगाची गोष्ट

जहाँ चाह है, वहाँ राह है मुख्य फोटो
मुख्य फोटो

सध्या जेन-झी परिचित आहे ती विविध देशांमध्ये प्रस्थापित सरकारांच्या विविध धोरणांविरुद्ध आंदोलने करणे, काही ठिकाणी हिंसक आणि उग्र निदर्शने करून वेळ पडली तर तेथील प्रस्थापित सरकारांचा पाडाव करणे यासाठी. या आंदोलनात कोणकोणत्या विघातक शक्ती आहेत, त्या या तरुणांची कशी दिशाभूल करत आहे,हे हळूहळू जगासमोर येत आहेच. परंतु भारतातील जेन-झी मात्र अशा निरर्थक आंदोलनात आपला बहुमोल वेळ आणि उर्जा वाया घालवत नाहीये. भारताची ही तरुण पिढी आपल्या देशाला सर्वच बाबतीत प्रगतिपथावर कसे नेता येईल, या दृष्टीने प्रयत्नशील आहे. अगदी पर्यावरण क्षेत्रातसुद्धा नैसर्गिक आणि प्रदूषणमुक्त संसाधनांच्या साह्याने भारताच्या प्रगतीसाठी विचार करते आहे. याच तरुण पिढीतील एक चेहरा म्हणजे विद्युत मोहन. 

दिल्लीत राहणाऱ्या विद्युत मोहनने दर वर्षी हिवाळ्याच्या सुरुवातीला पंजाब आणि हरियाणा या शेजारील राज्यांमध्ये पेंढा जाळल्यामुळे निर्माण होणाऱ्या धोकादायक धुक्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. धुराने वेढलेल्या राजधानी दिल्लीत चांगल्या दर्जाची हवा नाही. त्यामुळे आरोग्य आणि दृश्यमानतेवर परिणाम होतो. श्वास घेणेही कठीण जाते. हिवाळ्यात तर शेजारच्या राज्यांमध्ये पेंढा जाळल्याने दिल्लीच्या वायू प्रदूषणात वाढ होते. एकूण प्रदूषणापैकी सुमारे ३० टक्के भाग पेंढा जाळण्याच्या कृतीचा आहे. या समस्येवर तोडगा निघावा यासाठी या २९ वर्षीय उद्योजकाने ‘तकाचार’ ही कंपनी सुरू केली. ती कचऱ्याच्या बायोमासचे कमी किमतीत विक्रीयोग्य उत्पादनांमध्ये रूपांतर करते. 

खरे तर विद्युत लहानपणापासून नेहमीच पर्यावरणाविषयी जागरूक होता. याविषयी नैसर्गिक ऊर्जेचा वापर करून काय करता येईल याविषयी त्याच्या मनात प्रचंड उत्सुकता होती. त्याला असे काहीतरी करायचे होते, जे गरिबांसाठी उत्पन्नाच्या संधी तर निर्माण करीलच; पण त्याचबरोबर पर्यावरणाचे रक्षणदेखील करील. या विचाराने आणि त्याच्या अथक प्रयत्नाने त्याने तयार केलेले उपकरण म्हणजे ‘तकाचार.’ लहानपणी विद्युत त्याच्या आई-बाबांबरोबर ग्रामीण भारतात राहिला आहे. त्यामुळे तेथील समस्या त्याला माहिती होत्या. यातूनच त्याला प्रेरणा मिळाली. पुढे नेदरलँड्समधील टेक्निकिश युनिव्हर्सिटी डेल्फ्ट येथे शाश्वत ऊर्जा तंत्रज्ञान आणि शाश्वत उद्योजकता या विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमादरम्यानही तो याच विचारात होता. त्याला एक प्रबंध तयार करायचा होता. त्या काळात त्याने एक नमुना विकसित केला आणि शेतात त्याची चाचणी केली. उत्तराखंडमधील हा पायलट प्रकल्प म्हणजे स्थानिक जंगलातील कचऱ्याचे कोळशात रूपांतर करणे. त्यामुळे स्थानिकांचे उत्पन्न दुप्पट झाले. जेव्हा विद्युत दिल्लीमध्ये राहू लागला तेव्हा त्याला माहिती होते, की अनेक लोक वायूप्रदूषणाने त्रस्त आहेत. म्हणूनच गरीब समुदायांना आर्थिकदृष्ट्या फायदा करून देण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी त्याने २०१८मध्ये तकाचारची निर्मिती केली. 

२०१४मध्ये त्याच्या पदव्युत्तर पदवीच्या काळात विद्युतच्या संपर्कात आलेल्या केविन कुंगसोबत, त्याने प्रायोगिक तत्त्वावर, कमी किमतीचे आणि पोर्टेबल उपकरण विकसित केले, जे कचऱ्याचे घन इंधन आणि खतामध्ये रूपांतरण करते. यासाठी शेती आणि वन कचरा वापरला जातो. तकाचार मशीनमध्ये थर्मो-रासायनिक पद्धतीने त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यामुळे बायोमास अंशतः विघटित होतो आणि कार्बन-समृद्ध पदार्थ म्हणजेच ‘चार’ किंवा जैवकोळसा तयार होतो. या उपकरणाद्वारे गरीब लोकांना रोजगार आणि पर्यावरणाचा विचार अशी दोन्ही उद्दिष्टे साध्य होतील. 

तकाचार हे नाव बंगाली आहे. बंगालीमध्ये तका म्हणजे पैसा, तर चार म्हणजे कार्बन-समृद्ध पदार्थ. २०१६मध्ये केनियामध्ये एक पायलट प्रोजेक्ट सुरू केल्यानंतर, काही काळातच ते जवळजवळ ६००० शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले. त्यानंतर भारतात या उपक्रमाची अधिकृतपणे सुरुवात झाली. संशोधकांचा असा अंदाज आहे, की दर वर्षी शेतकरी भारतात सुमारे २३ दशलक्ष टन भातपिकाचे अवशेष जाळतात. भारतात पीकअवशेष जाळण्यामुळे होणाऱ्या एकूण जागतिक उत्सर्जनाच्या हे १३ टक्के आहे. शेतकऱ्यांसाठी हा सर्वांत स्वस्त आणि सोपा मार्ग आहे. तथापि, विद्युतच्या तकाचार तंत्रज्ञानाने वायूप्रदूषण कमी करण्यास तसेच ग्रामीण उपजीविका निर्माण करण्यास मदत होऊ शकते. यातून शेतकऱ्यांना दुहेरी मदत होत आहे – तकाचारला त्यांचा कचरा विकून त्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याची संधी आणि स्वच्छ पर्यावरण.

विद्युतचा हा प्रवास सोपा नव्हता. कारण सुरुवातीला शेतकऱ्यांना तकाचारचे उद्दिष्ट आणि ध्येय समजावून सांगणे हे सर्वांत मोठे आव्हान होते. त्यांना हे पटवून देण्यासाठी थोडा वेळ लागला, की यातून त्यांचे शोषण होणार नाही. हळूहळू या उपकरणाने मान्यता मिळवण्यास सुरुवात केली. नंतर प्रिन्स विल्यम्स आणि रॉयल फाउंडेशनतर्फे दिला जाणारा पहिला अर्थशॉट पुरस्कार जिंकल्यानंतर तकाचारला जागतिक नकाशावर स्थान मिळाले आणि त्याला संभाव्य ग्राहक, भागीदार आणि कॉर्पोरेट्स मिळू शकले. या प्रसिद्धीमुळे अनेक लोक आकर्षित झाले आणि कोणासोबत काम करायचे आहे हे निवडण्याची संधी मिळाली. आता त्याने हरियाणा आणि तमिळनाडूमध्ये दोन पायलट प्रोग्राम सुरू केले आहेत. तमिळनाडूमधील त्यांच्या पायलट प्रकल्पासाठी लहान नारळ तेल कारखान्यांशी सहकार्य केले आहे. ते नारळाच्या करवंट्यांचा वापर बायोमासमध्ये रूपांतरित करण्यासाठी करत आहेत आणि हरियाणा प्रकल्पासाठी भाताच्या तुसाचा वापर करत आहे. अशा प्रकारे आतापर्यंत ५० टन बायोमासचे घन इंधनात यशस्वीरीत्या रूपांतर केले गेले आहे. 

विद्युतच्या मते,सरकारी धोरणे नवोपक्रमाला चालना देण्यास आणि जीवाश्म इंधनापासून स्वच्छ ऊर्जेकडे लक्ष केंद्रित करण्यास मदत करत आहेत. विद्युतच्या या उपक्रमामुळे त्याला फोर्ब्ज-३०मधील ३० वर्षांखालील तरुण उद्योजकांत स्थान मिळाले आहे. याशिवाय त्यांना क्लीन अवर एअर श्रेणीअंतर्गत यंग चॅम्पियन्स ऑफ द अर्थ-२०२० पुरस्कार आणि अर्थशॉट पुरस्कार-२०२१ (इको ऑस्कर) मिळाला आहे.

आपण नेहमी अर्ध्या रिकाम्या पेल्याकडे लक्ष देतो आणि आपल्या समस्या सांगत बसतो; पण विद्युतसारखी तरुण, कर्तबगार मंडळी आपल्याला हेच सांगतात की नाही, पेला अर्धा भरलेला आहे. इच्छाशक्ती असेल तर उपाय नक्कीच सापडेल. कारण ‘जहाँ चाह है, वहाँ राह है!

(संकलित)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 12-02-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 1 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 12-02-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 1 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement