पुस्तकाचा परिचय...
आपले मन ही एक अजब दुनिया आहे. ‘मन चिंती ते वैरी न चिंती’ अशी एक म्हण आहे. आपल्या मनाला चांगल्या गोष्टींच्या सरावासाठी तयार करावे लागते. त्यासाठी मनाचा सराव करावा लागतो. अशाच छोट्या छोट्या पण चांगल्या सवयी लावून आपले मन आपल्या ताब्यात कसे आणावे?,वर्तमानक्षणात राहून आलेला प्रत्येक क्षण भरभरून कसे जगावे,यासाठी वाचण्यायोग्य असे पुस्तक म्हणजे सरावशील मन. ‘The practicing Mind’ या थॉमस एम. स्टर्नर यांच्या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद.
या पुस्तकामुळे आयुष्याला सर्वांगाने मदत मिळते. एखाद्या क्षेत्रात काम करताना ते अधिक प्रभावीपणे कसे करता येईल याची काही व्यावहारिक उदाहरणे यात दिलेली आहेत.ह्या सवयींच्या सरावाने वक्ता म्हणून अधिक उर्जेने बोलता येईल. पालक म्हणून सतर्क राहता येईल आणि सुटीच्या दिवशी एखादा छंद जोपासताना त्यातील गंमत अनुभवणे व त्यातून कौशल्य विकास करणे हे पण शिकता येईल. या पुस्तकामुळे जाणीव होते की उद्दिष्ट्य गाठण्यापेक्षाही तिथपर्यंत जाण्याचा प्रवास अधिक महत्वाचा आहे. आयुष्य हाही एक प्रवास आहे अंतिम ठिकाण नाही. तुम्ही ज्या गोष्टी आधीपासूनच काही प्रमाणात जाणता,त्या वास्तवात आणण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ‘मनाचा प्रवास’.जिथे त्या मार्गावर जाणे आणि त्यात सहभागी होण्यासाठी सक्षम होणे,ह्या दोन्ही गोष्टी साध्य होतात. हे पुस्तक तुम्हाला या प्रक्रियेची नव्याने ओळख करून देईल.
हे पुस्तक आकर्षकपणे,व्यवहारिक आणि सोप्या पद्धतीने अडचणींना सामोरे जाण्यास शिकवते ज्यामुळे आयुष्याच्या प्रवासात अधिक आव्हानात्मक आणि कंटाळवाण्या गोष्टींकडे पाहण्याचा तुमचा दृष्टीकोन बदलतो. सुस्पष्ट भाषा आणि रोचक अनुभवातून थॉमस स्टर्नर दर्शवितात की, तुमचे उद्दिष्ट्य गाठण्याच्या प्रक्रियेकडे शांततेने लक्ष केंद्रित केल्यास आपण परिणामांची भिती न बाळगता,जे आपल्या नियंत्रणात नाही त्याची चिंता करणे सोडून देऊ शकतो. स्टर्नर यांचे हे विचार आत्मसात केल्यास,आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण दुखा:ची तीव्रता कमी करू शकतो. हे पुस्तक जाणीवपूर्वक आपली गती कमी करणे,वर्तमान क्षणाविषयी सजग राहणे आणि स्वयंशिस्त आणि एकाग्रता विकसित करण्यासाठी दिशादर्शक आहे. या क्लिष्ट विषयाचे सादरीकरण अत्यंत नीटनेटक्या स्वरुपात सादर केले आहे. वर्तमानात जगणे आणि प्रक्रियाकेंद्रीत दृष्टीकोन स्वीकारणे,यांमुळे आपण एका अद्भूत वाटेवर जातो. जेव्हा आपण या प्रवासाचा आनंद घेणे शिकतो तेव्हा आपण स्वत:शी आणि आयुष्याशी संयमाने वागण्याचा विलक्षण अनुभव घेतो,हे पुस्तक याचसाठी आहे.आवर्जून वाचावे असे हे पुस्तक!
पुस्तकाचे नाव - सरावशील मन मूळ लेखक - थॉमस एम. स्टर्नर
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment