अस्थिर मनांच्या युगातील दीपस्तंभ - समर्थ रामदासस्वामी

दासनवमीनिमित्त त्यांच्या विचारांचा एक धावता आढावा

अस्थिर मनांच्या युगातील दीपस्तंभ - समर्थ रामदासस्वामी मुख्य फोटो
अस्थिर मनांच्या युगातील दीपस्तंभ - समर्थ रामदासस्वामी अतिरिक्त फोटो

आजचे जग प्रचंड वेगाने पुढे धावत आहे; पण माणसाचे मन मात्र मागे पडले आहे. बाह्य प्रगतीच्या झगमगाटात अंतर्मनातील अंधार अधिकच गडद होत चालला आहे. शिक्षण वाढले, पैसा वाढला, सुविधा वाढल्या; पण समाधान कमी झाले. आजूबाजूला आत्महत्या, हत्या, हिंसा, युद्ध, तणाव, असुरक्षितता यांचीच चर्चा अधिक ऐकू येते. माणूस इतका अस्वस्थ का झाला? सुख असूनही शांती का हरवली? उत्तर शोधायला बाहेर पाहण्याऐवजी आत वळावे लागते. आणि तेथेच आपल्याला भेटतात समर्थ रामदासस्वामी.

मनुष्याच्या मनाचा नकाशा ज्यांनी शेकडो वर्षांपूर्वीच रेखाटला, मनाच्या विकारांवर अचूक औषध सांगितले, ते म्हणजे समर्थ रामदासस्वामी. मनाचे श्लोक हे केवळ काव्य नाही, ते मानसशास्त्र आहे; केवळ उपदेश नाही, तर जीवनदर्शन आहे. आजच्या अस्थिर, धावपळीच्या, ताणतणावाच्या युगातही हे श्लोक तितकेच लागू पडतात, कारण मनुष्य बदलला नाही, फक्त काळ बदलला आहे.

माघ कृष्ण नवमी अर्थात रामदासनवमी. हा केवळ एका संताचा स्मृतिदिन नाही; तो आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. आपण कुठे आहोत, कुठे चाललो आहोत आणि आपले मन आपल्या ताब्यात आहे की नाही, हे तपासण्याचा दिवस आहे.

तपश्चर्येतून ‘समर्थ’ होण्याचा प्रवास

मराठवाड्यातील जांब या छोट्याशा गावात, ठोसर घराण्यात जन्मलेले हे बालक पुढे संपूर्ण महाराष्ट्राचा, किंबहुना भारताचा वैचारिक दीपस्तंभ ठरेल, हे कोणाला ठाऊक होते? सूर्याजीपंत आणि राणूबाई यांच्या संस्कारांत रामदास घडले. घरात रामभक्ती, सूर्योपासना, साधना यांचे वातावरण होते. वडिलांचे छत्र लवकर हरपले; पण त्यातूनच वैराग्याचे बीज अधिक दृढ झाले.

रामदासांना मिळालेला राममंत्र हा केवळ मंत्र नव्हता; तो त्यांच्या जीवनाचा श्वास होता. “श्रीराम जय राम जय जय राम” या मंत्रानेच त्यांचे आयुष्य व्यापले.

लग्नमंडपातून पलायन या घटनेकडे त्यांच्या अंतःकरणातील तीव्र साधनावृत्तीचे प्रतीक म्हणून पाहायला हवी. संसाराचा मार्ग नाकारून त्यांनी साधनेचा कठीण, काटेरी, पण तेजस्वी मार्ग स्वीकारला. 

गुहेपासून हिमालयापर्यंतचा शोध

नाशिकजवळील टाकळीच्या गुहेत रामदासांनी स्वतःला घडवले. तेरा कोटी रामनाम जप, वेद-उपनिषदांचा अभ्यास, वेदान्त, पुराणे, संगीतसाधना हा काळ म्हणजे त्यांच्या आयुष्याची प्रयोगशाळा होती. येथेच ‘रामदास’ ‘समर्थ’ झाले. १६३२ साली सुरू झालेली भारतयात्रा ही केवळ तीर्थयात्रा नव्हती, ती समाजाचे, मनोवृत्तीचे, दुर्दशेचे दर्शन घेणारी यात्रा होती. काशी, प्रयाग, अयोध्या, बद्रीनाथ, केदारनाथ, मानसरोवर, पुरी, दक्षिण भारत – संपूर्ण भारत त्यांनी अनुभवला. अयोध्येत अकरा महिने वास्तव करून रामराज्याचा अर्थ त्यांनी मनावर ठसवला.

या प्रवासातून एक विचार पक्का झाला, तो म्हणजे परमार्थाशिवाय ऐहिक उन्नती पोकळ आहे आणि सशक्त समाजाशिवाय परमार्थ अपूर्ण आहे.

धर्मसंस्थापना म्हणजे समाजनिर्मिती

समर्थांसाठी धर्म म्हणजे केवळ पूजापाठ नव्हता. धर्म म्हणजे सज्जनांची उभारणी, दुर्जनांवर नियंत्रण आणि समाजात नैतिक शक्ती निर्माण करणे. म्हणूनच त्यांनी राजकारणालाही धर्मकारणाचा भाग मानले.

शिवाजी महाराजांशी प्रत्यक्ष राजकारणात सहभागी नसतानाही, स्वराज्यासाठी आवश्यक असलेली मानसिक तयारी समर्थांनी समाजात निर्माण केली. आत्मविश्वास, स्वाभिमान, कर्तव्यबुद्धी, शौर्य आणि भक्ती या सगळ्यांची बीजे समर्थांच्या विचारांत होती.

इस्लामी राजवटीत विहिरीत, नद्यांत टाकलेल्या देवमूर्ती बाहेर काढून त्यांची पुनर्स्थापना करणे, मंदिरे उभारणे, सार्वजनिक उत्सव सुरू करणे हे सर्व केवळ धार्मिक नव्हते, तर सांस्कृतिक पुनरुज्जीवनाचे कार्य होते.

स्त्री, शूद्र, फकीर – सर्वांसाठी परमार्थ

समर्थ रामदास हे काळाच्या पुढचे संत होते. स्त्रियांनाही परमार्थाचा पूर्ण अधिकार आहे, हे त्यांनी निर्भीडपणे सांगितले. अक्काबाई, वेणूबाई यांसारख्या शिष्या याचे जिवंत उदाहरण आहेत. इतकेच नव्हे, तर मुसलमान फकीरही त्यांच्या अनुयायांमध्ये होते. त्यांच्या दृष्टीने भक्तीला जात, धर्म, लिंग यांची बंधने नव्हती.

ग्रंथसंपदा 

दासबोध हा केवळ ग्रंथ नाही, तर तो जीवन मार्गदर्शक आहे. व्यवहार आणि परमार्थ यांचा सुंदर समन्वय यात दिसतो. माणसाने कसे जगावे, कसा विचार करावा, कसे वागावे याचे तपशीलवार मार्गदर्शन दासबोध करतो.

मनाचे श्लोक हे तर मनुष्याच्या अंतःकरणातील आरसा आहेत. मनाची चंचलता, अहंकार, भय, लोभ, मोह यांवर समर्थांनी थेट बोट ठेवले आहे.

करुणाष्टके : समर्थही माणूस होते, त्यांनाही निराशा, वेदना, उद्वेग या भावना होत्या, हे या रचनांतून स्पष्ट होते. त्यामुळे ते अधिक मानवी वाटतात, अधिक जवळचे वाटतात.

आजही घरोघरी म्हटली जाणारी “सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी” ही आरती त्यांच्या प्रतिभेची अमर खूण आहे.

आजच्या काळासाठी समर्थांचे महत्त्व

आज मानसिक आरोग्य, तणाव, नैराश्य, अस्थिरता यांवर उपाय शोधले जात आहेत. समर्थ रामदासांनी यावर शेकडो वर्षांपूर्वीच उपाय सांगितले आहेत. ते म्हणजे मनावर नियंत्रण, विवेक, संयम, कर्तव्य आणि भक्ती. आज गरज आहे ती समर्थांना केवळ पूजेत न ठेवता, त्यांचे विचार जीवनात उतरवण्याची.

१६८२ साली सज्जनगडावर देह ठेवपूर्वी समर्थांनी आपल्याला अमूल्य वैचारिक संपत्ती दिली. रामदासनवमी हा केवळ स्मरणाचा दिवस नाही, तो आत्मबोधाचा दिवस आहे. अस्थिर जगात स्थैर्य देणारा, अस्वस्थ मनाला शांत करणारा, कर्तृत्वाला दिशा देणारा असा हा समर्थांचा वारसा जपू या.

श्री समर्थ रामदासस्वामींना कोटी कोटी प्रणाम!

Publisher: Jignesh Kamani News publisher name | Date: 11-02-2026 News publication date | Time: 08:29 AM News publication time | Views: 189 Number of times this news has been viewed | District: buldhana Related district of the news
Publisher: Jignesh Kamani News publisher name | Date: 11-02-2026 News publication date | Time: 08:29 AM News publication time | Views: 189 Number of times this news has been viewed | District: buldhana Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words