ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज यांच्या जयंतीनिमित्त (माघ शुद्ध द्वादशी) त्यांच्या विचारांचा धांडोळा...
आजच्या धावपळीच्या, स्पर्धेच्या आणि अस्वस्थतेच्या काळात एक प्रश्न प्रकर्षाने उभा राहतो - माणूस प्रगती करतो आहे; पण तो शांत होत आहे का? याच प्रश्नाचे उत्तर आपल्या साध्या, पण अत्यंत सखोल विचारांतून देणारे संत म्हणजे श्री गोंदवलेकर महाराज. त्यांच्या जीवनकार्याकडे आणि संदेशाकडे पुन्हा एकदा अंतर्मुख होऊन पाहण्याची गरज आहे.
संत गोंदवलेकर महाराज म्हणजे साधेपणातून प्रकटलेली महानता. श्री गोंदवलेकर महाराजांचे जीवन म्हणजे कोणतेही चमत्कार दाखवण्यापेक्षा आचरणातून अध्यात्म जगण्याचा आदर्श. त्यांनी कधीही स्वतःला मोठे संत म्हणून मिरवलं नाही. उलट, 'मी काहीच नाही, सर्व काही राम आहे' हा भाव त्यांनी अखेरपर्यंत जपला. त्यांचं संपूर्ण जीवन नामस्मरण, प्रामाणिक कष्ट आणि निरपेक्ष सेवा याभोवती फिरत राहिलं.
गोंदवलेकर महाराजांसाठी नामस्मरण म्हणजे केवळ माळ हातात घेऊन केलेला जप नव्हता. ते म्हणत, 'नाम ओठांवर नसलं तरी चालेल, पण नाम मनात आणि कृतीत उतरलं पाहिजे.' नामस्मरणामुळे मन स्थिर होतं, अहंकार विरघळतो, राग, द्वेष, मत्सर कमी होतो आणि जीवनात एक अंतर्गत शिस्त निर्माण होते. आज जिथे मानसिक ताण, नैराश्य आणि असमाधान वाढत आहे, तिथे महाराजांचं नामस्मरणाचं तत्त्व एक प्रभावी मानसिक औषध ठरू शकतं.
आज अनेकांना वाटतं, की अध्यात्म म्हणजे संसारातून दूर जाणं; पण गोंदवलेकर महाराजांनी हेच गैरसमज दूर केले. ते ठामपणे सांगत, 'काम सोडू नका, पण कामात राम विसरू नका.' काम करताना प्रामाणिकपणा टिकतो, निर्णय अधिक शांतपणे घेतले जातात, यश-अपयशाचा ताण कमी होतो आणि कामालाच साधना मानण्याची दृष्टी मिळते. संसारात राहूनही आसक्ती न ठेवणं हेच त्यांच्या शिकवणीचं वैशिष्ट्य होतं.
आजचा तरुण प्रश्न विचारतो, 'यश मिळालं, पण समाधान का नाही?' 'सगळं असूनही मन रिकामं का वाटतं?' गोंदवलेकर महाराज याच प्रश्नाला उत्तर देतात, 'बाहेर शोध थांबवा, आत रामाला जागं करा.' त्यांचं जीवन सांगतं, की मोठेपणा प्रसिद्धीत नाही, तर नम्रतेत आहे. अध्यात्म वेगळं नाही, ते रोजच्या जगण्यात आहे आणि शांतता बाहेरून मिळत नाही, ती आपल्या आत जागवावी लागते.
श्री गोंदवलेकर महाराजांचे विचार काळाच्या पलीकडचे आहेत. आजच्या अस्थिर, धावत्या आणि तणावग्रस्त जीवनात त्यांचे साधे, पण ठाम संदेश अधिकच अर्थपूर्ण वाटतात. नामस्मरण, प्रामाणिक कर्तव्य आणि अहंकाररहित जीवन हे त्रिसूत्री तत्त्व अंगीकारलं तर जीवन नक्कीच अधिक सुंदर, शांत आणि अर्थपूर्ण होऊ शकतं.
त्यांच्या जयंतीनिमित्त एवढाच संकल्प करू या - 'काम करताना राम आणि रामात राहून काम.'
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment