बोधकथा - २७
आचार्य विनोबा भावेंची एक गोष्ट आहे. एके दिवशी एक मनुष्य त्यांच्याकडे आला. त्याला दारूचे व्यसन लागले होते. ते सोडण्याची त्याची इच्छा होती; मात्र प्रत्यक्षात त्याच्याकडून तशी कृती होत नव्हती. म्हणून तो विनोबा भावेंकडे सल्ला विचारायला गेला. तो त्यांना म्हणाला, 'दारू काही मला सोडायलाच तयार नाही. ती वाईट सवय आहे, याची मला कल्पना आहे आणि ती सवय मला सोडायची आहे; पण ती मला सोडतच नाही.'
विनोबा म्हणाले, 'तू उद्या मला येऊन भेट आणि मला बाहेरूनच हाक मार.' दुसर्या दिवशी तो मनुष्य ठरल्याप्रमाणे आला. त्याने घराबाहेरूनच विनोबांना हाक मारली आणि आल्याचे सांगितले.
आतून विनोबा म्हणाले, 'मी ऐकली हाक तुझी. मला बाहेर यायचे आहे; पण हा खांब मला सोडायला तयारच नाहीये.' तो मनुष्य चक्रावला. त्याने उत्सुकतेने आत डोकावून पाहिले आणि तो हसू लागला. विनोबा घरातील खांबाला घट्ट पकडून बसले होते आणि तो खांब आपल्याला सोडत नाही, अशी तक्रार करत होते.
तो मनुष्य म्हणाला, 'विनोबाजी, तुम्हीच खांबाला धरले आहे आणि तो खांब सोडत नाही असे म्हणताय?'
विनोबा म्हणाले, 'मी या खांबाला धरून ठेवले होते, तसेच तूही दारूला पकडून ठेवले आहेस. दारूने तुला पकडलेले नाही. त्यामुळे तू दारूला सोडायचे ठरवशील, तेव्हा ती आपोआप सुटेल.'
हे ऐकून त्याचे डोळे उघडले. त्याने दारू सोडण्याचा निश्चय केला.
बोध : वाईट सवयी हा माणसाच्या प्रगतीतील मोठा अडथळा असतो. वाईट सवयी सोडण्याचा नुसता विचार करून उपयोगी नाही, तर प्रत्यक्ष कृती करायला हवी आणि ती कृती आपण स्वतःच करू शकतो. वाईट सवयी आपण निश्चयपूर्वक सोडायला हव्यात, त्या सवयी आपोआप आपल्यापासून दूर जातील, असा विचार करू नये.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment