एक होता कार्व्हर

पुस्तकाचा परिचय...

एक होता कार्व्हर मुख्य फोटो
मुख्य फोटो

एक होता कार्व्हर ही लेखिका वीणा गवाणकर यांची १९८१ साली प्रकाशित झालेली पहिलीच कादंबरी होती. अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांची ही जीवनगाथा आहे. आपल्या आईवडिलांचे नीट तोंडही पाहू न शकलेल्या कार्व्हर यांची जीवनकहाणी जितकी आपल्याला भावनिक करते तितकीच ती प्रेरणा देऊन जाते. या पुस्तकात लेखिकेने कार्व्हर यांचे हलाखीचे बालपण, त्यांनी जगण्यासाठी व यशस्वी होण्यासाठी केलेली धडपड अतिशय सुरेखरीत्या शब्दबद्ध केलेली आहे. एका गुलाम स्त्रीच्या पोटी जन्माला आलेल बाळ पुढे त्याचे मालक सांभाळतात,त्याला शाळेत घालतात.जवळपास मुका असणाऱ्या या मुलाचे संगोपन करतात. रानावनातील झाडझुडुपं, पक्ष्यांची पिल्लं, डबक्यातील छोटे मासे हाच त्याचा गोतावळा. त्याला लहानपणी अनेक प्रश्न पडत असत जसे की झाडांना हिरवा रंग कसा येतो? इंद्रधनुष्याला रंग कोण देत? सकाळची कोवळी किरणं दुपारी कुठे जातात? थोडा मोठा झाल्यांनतर त्याला निओशी इथं निग्रो मुलांच्या शाळेत घातलं गेलं. त्याची इच्छा नसतानाही त्याला कार्व्हर कुटुंबापासून दूर जावं लागतं. तिथे तो मिळतील ती कामे करून शिक्षण घ्यायचा. दिवसभर शाळा शिकून तो रात्री जुन्या पडक्या गोठ्यात झोपायचा. मजल दरमजल करत तो त्याच शालान्त शिक्षण पूर्ण करतो. पुढे महाविद्यालयात प्रवेश घेताना त्याला निग्रो असल्यामुळे एका युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश नाकारला जातो. त्यानंतर तो सिंप्सन युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतो.

या सगळ्या प्रवासात त्याला पावलोपावली संकटं येत असतात पण तो जिद्द सोडत नाही. तो चिकाटीने मेहनत करून सगळ्या परिस्थितीसोबत लढत असतो. आपल्या समाजबांधवांसाठी कार्व्हर यांनी पुढे अनेक संस्था चालू केल्या त्यापैकीच एक म्हणजे अलाबामा येथील टस्कीगी संस्था. तिथे ते शेतीविषयक विभागाचे संचालक म्हणून रुजू झाले. तिथे त्यांनी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग कसे केले?सामान्य माणसालाही सहज करता येईल अशा प्रयोगानी त्यांनी अनेक नवीन शोध लावले, हे सारे या पुस्तकात वाचायला मिळते. आयुष्यभर कोणत्याही पदाची, पैशाचा मोबदला यांचा हव्यास न धरता आपले कार्य करत राहिले. असामान्य व्यक्तिमत्व असताना सुद्धा साधं आयुष्य कसे जगता येते याचा त्यांनी आदर्श परिपाठ घालून दिला. आज कार्व्हर यांचा अमेरिकेला घडवणाऱ्या महानायकांमध्ये समावेश होतो. चिकाटी, मेहनत आणि सतत शिकण्याची धडपड माणसाला कशी महान पदावर नेते याचं उत्तम उदाहरण म्हणजे कार्व्हर यांचं जीवन. आवर्जून वाचावे आणि संग्रही ठेवावे असे पुस्तक.

पुस्तकाचे नाव - एक होता कार्व्हर लेखक - वीणा गवाणकर

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 10-02-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 28 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 10-02-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 28 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement