देवदिवाळीनिमित्त विडे ठेवण्याची कोकणातील परंपरा : एक चिंतन!

२१ नोव्हेंबर २०२५ रोजी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा अर्थात देवदिवाळी आहे. देवदिवाळीला कोकणातल्या शेतकर्‍यांच्या घरात विडे भरण्याची परंपरा आहे. ही परंपरा काय आहे, याचं मनोवेधक चिंतन करणारा, अमोल पालये यांचा हा लेख…

देवदिवाळीनिमित्त विडे ठेवण्याची कोकणातील परंपरा : एक चिंतन! मुख्य फोटो
मुख्य फोटो

कोकणातल्या शेतकर्‍यांमध्ये नरक चतुर्दशीपेक्षा देवदिवाळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नरकचतुर्दशीला तो भाताच्या कापणीत गुंतलेला असतो, तर देवदिवाळीला त्याच्या घरात धान्यलक्ष्मीचे आगमन झालेले असते. अर्थात तो समृद्ध बनलेला असतो. त्यामुळे देवदिवाळी हा धर्माचा उत्सव न राहता, लोकोत्सव असतो. देवादिकांच्या जत्राही याचमुळे देवदिवाळीपासूनच सुरू होतात.

नरकचतुर्दशीला अभ्यंगस्नानाची परंपरा आहे. देवदिवाळीलाही ती आहे; मात्र देवदिवाळीच्या अभ्यंगस्नानाचा पहिला मान गोठ्यातल्या गुरांचा! आधी त्यांना गरम पाण्याने आंघोळ घालायची, त्यांना तेल लावायचं. गोठ्यात दिवे लावायचे. दिव्याने ओवाळायचं. मग आंबोळ्या खायला घालायच्या.. स्वत:आधी दुसर्‍याचा विचार… जगाचा, विशेषत: आपल्या गुराढोरांचा विचार शेतकर्‍यांशिवाय या जगात कोणी करत नसेल. नरकचतुर्दशीला आधी आपल्या पोटोबाची सोय केली आहे, तर देवदिवाळीला गुरांढोरांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची रीत शिकवलेली आहे.

देवदिवाळीचा महत्त्वाचा विधी आहे तो विडे ठेवण्याचा. या पंरपरेतही ऊर भरून येणारा अर्थ दडला आहे. तो समजून घेतला, की या परंपरेचे जतन इथल्या शेतकर्‍यांच्यात कसा आत्मविश्वास रुजवत आहे, ते समजून येईल. देवदिवाळीला कोकणात सम्राट बळीराजाचे स्मरण केले जाते. सम्राट बळी हा कृषिप्रधान राजा होता. गोरगरिबांचे कल्याण करणारा राजा होता. चांगल्या राजांची नेहमीच आठवण काढली जाते. राम, कृष्ण हे आदर्श राजे मानले जातात. तसाच बळीराजा हाही एक आदर्श राजा होता, हेच या कथांमधून समोर येते. दशावताराचा संदर्भ लक्षात घेता, हे राजे प्राचीन युगांचे प्रतिनिधी आहेत आणि आज इतक्या वर्षांनंतरही त्यांची आठवण काढली जातेय. या सर्व राजांत बळीराजाचे वेगळेपण खूप उठून दिसणारे आहे. हा राजा शेतकर्‍यांचा आहे आणि म्हणूनच राम-कृष्णाच्या खूप आधीच्या काळात होऊन गेलेल्या बळीराजाची आजही आवर्जून आठवण केली जातेय, ती त्यामुळेच.

‘इडा टळो… पीडा टळो… माझ्या बळीचं राज्य येवो…’ या उक्तीचा जागर कोकणात घरोघरी देवदिवाळीला होतो. बळीचे राज्य कसे न्यायी राज्य होते, तेथील जनता कशी सुखी-समाधानी होती, हे सारे चित्र या एकाच उक्तीतून काहीही न सांगता समोर दिसते. हजारो वर्षांनंतरही आज शेतकर्‍याला दुसर्‍या कुणाची नव्हे, तर कधीकाळी होऊन गेलेल्या बळीच्या राज्याचीच आस लागली आहे, यावरून बळीच्या राज्याची कल्पना येते.

केरळमध्ये ओणम सण बळीराजाच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजरा केला जातो. तेथे बळीराजा ओणममध्ये घरोघरी येणार, अशी कल्पना मांडून त्याच्या स्वागताची तयारी केली जाते. कोकणात थेट बळीच्या राज्याची मूर्त संकल्पनाच मांडून ‘इडा-पीडा टळो…’अशी करुणा भाकली जाते. या प्रथेचे बारकावे लक्षात घेतले, तर त्यामागची भावना अधिक सुस्पष्ट होत जाते. त्यासाठीच या प्रथेची ही चिकित्सा…

कोकणातल्या मुख्य घरात ओटीवर विडे ठेवण्याचा (भरण्याचा) कार्यक्रम पार पडतो. ओटी या जागेला कोकणात मानाची जागा आहे. ती सार्वजनिक जागा आहे. घराचा कारभार घरातला कारभारी ओटीवर बसून हाकत असतो. अशा कारभार हाकण्याच्या जागेवर हा विडे ठेवण्याचा कार्यक्रम पार पडतो. सर्वांत आधी ‘कणा’ घातला जातो. सध्याच्या भाषेत याला ‘रांगोळी घालणे’ म्हणतात. ही रांगोळी फुलाफुलांची नव्हे किंवा ओम, स्वस्तिक अशा प्रतीकांची नव्हे, तर ती चौकोनात घातली जाते. मोठ्या चौकोनाला चारही बाजूंनी बंदिस्त करून तो कणा म्हणजेच चौकोन सुबक केला जातो. चौकोनाची टोकं सांधणारा जो सांधा रांगोळीने काढला जातो, त्यालाच कणा मोडणे असे म्हणतात. त्यामुळे या रांगोळीत कणा काढणे आणि कणा मोडणे असे शब्दप्रयोग आहेत. यातून बळीराज्याच्या पायाभरणीची संकल्पना कशी रेखीव आहे, ते स्पष्ट होते. बरे, ही रांगोळी दगडाची नसते. ती एक तर तांदळाची किंवा मग भाताच्या तुसाची असते. म्हणजे येथेही शेतीशी संबंधित गोष्टीचा विचार प्रामुख्याने केलेला दिसतो.

या कण्यावर अर्थात रांगोळीवर धोतर अंथरले जाते. शुभ्र धोतर हे स्वच्छ चारित्र्याचे प्रतीक. ते घालण्याआधी सर्व गावकर्‍यांना धोतर पांघरणार्‍यांनी ‘गादी घालायला हुकूम काय..?’ हे विचारावे लागते. (यावरून बळीच्या राज्यात जनतेला, मतदाराला काय किंमत होती, हे या गादी मांडण्याच्या अर्थात सत्ता स्थापनेच्या विधीवरून लक्षात येईल.) येथे धोतर अंथरणे ही संकल्पना गादी घालणे अशी गृहीत धरलेली आहे. ही गादी म्हणजे बळीराजाची राजगादी. त्यामुळेच खाली अंथरलेली शुभ्र धोतराची गादी ही बळीराज्याच्या स्वच्छ, पारदर्शक कारभाराची मुख्य खुण आहे, हेच यातून प्रतीत होते. कणा मोडून त्यावर राजगादी मांडून झाली, की मग त्यावर तांदळाचे चौकोनी मंडळ काढले जाते. हेही मंडळच असावे. स्वस्तिक, ओम वगैरे नाही. त्या चौकोनी मंडळाच्या मध्यभागी पाच पाने, त्यावर अख्खी ओली सुपारी… हा साक्षात बळीराजा. आता उरलेल्या चार कोपर्‍यांवर तशीच पाच पाने, त्यावर ओली सुपारी, असे चार विडे… हे चार दिशांचे चार खंडोबा.. अर्थात बळीराज्याचे चार दिशांचे मुख्य सेनापती. त्यानंतर उरलेल्या जागेवर एक पान, त्यावर सुपारीचे एक खंड, खोबर्‍याचा तुकडा… अशी पन्नास-शंभर पाने मांडली जातात. हे स्वतंत्र विडे म्हणजेच बळीराज्यातील शेतकरी जनतेचे प्रतीक…

अशी राजगादी मांडून झाली, की घरातील कर्त्या पुरुषाने त्या राजगादीची पूजा करायची. ही पूजा काही पोथीत सांगितल्याप्रमाणे मंत्रोच्चार किंवा षोडशोपचारांची नव्हे. जशी भावेल तशी… अर्थात गावकर सांगेल तशी… प्रथम मधल्या बळीराजाची पूजा. मग खंडोबांची पूजा…मग इतरांची पूजा… त्यात गंध, फूल आणि गुळाचा नैवेद्य… ही पूजा झाली, की मग सर्व उपस्थितांना अक्षतांचे वाटप केले जाते. सर्व जण त्या गादीभोवती राज्याभिषेकासाठी उभे राहतात. घरातील कर्ता पुरुष प्रथम आपली प्रार्थना करतो. सुख-शांती मागतो. ‘इडा-पीडा टळो… बळीचं राज्य येवो,’ अशी प्रार्थना करतो. त्यानंतर स्वत: गावकर प्रार्थना करतो. त्याची प्रार्थना व्यापक इच्छा-आकांक्षांची असते. त्यात तो कुटुंबासहित गावाचे, गुरांचे, चाकरमान्यांचे, मुलांचे अशा साऱ्यांचे कल्याण करण्याची इच्छा व्यक्त करत असतो. ही कल्याणाची इच्छा व्यक्त करत असताना साऱ्यांनी आपल्या हातातील अक्षता धारेप्रमाणे त्या राजगादीवर सोडायच्या असतात. हा जणू बळीराजाच्या राज्यस्थापनेचा राज्याभिषेकच!

यानंतर हे विडे देव, वडील-थोर, गावकरी यांना वाटून त्यांचा सन्मान करायचा असतो. (हा असा सन्मान करायची रीत बहुधा सणांमध्ये कमीच दिसायला लागली आहे. देवदिवाळीत मात्र ती आवर्जून दिसते.) त्यानंतर समाप्ती. हा क्षण अत्यंत भावपूर्ण. ती राजगादी सार्‍यांनी मिळून टोक धरून उचलायची. ‘इडा टळो… पीडा टळो… माझ्या बळीचं राज्य येवो… चांगभलं… चांगभलं…’ असा जोराने जयघोष करून ती गादी… ते बळीचं राज्य घरातील कर्त्या पुरुषाच्या हातात स्वाधीन करून त्याला आशीर्वाद द्यायचा..

गेली कित्येक वर्षे ही परंपरा डोळे भरून पाहतोय… आणि दर वर्षी ती तितकीच नित्यनूतन भासते आहे.

– अमोल पालये, सडये/पिरंदवणे, ता. जि. रत्नागिरी
मोबाइल : ९०११२१२९८४

Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 20-11-2025 News publication date | Time: 12:00 AM News publication time | Views: 39 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news
Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 20-11-2025 News publication date | Time: 12:00 AM News publication time | Views: 39 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words