बोधकथा - २३
फार पूर्वी एक गरीब माणूस होता. तो अत्यंत आळशी होता. त्याला कोणतेही कष्ट करायचे नव्हते; पण तो श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहत असे आणि भीक मागून जगत असे. एके दिवशी सकाळी त्याला भिक्षा म्हणून दुधाने भरलेला एक माठ मिळाला. तो खूप आनंदी झाला आणि तो दुधाचा माठ घेऊन घरी गेला. त्याने दूध उकळले, थोडे पिऊन उरलेले दूध एका भांड्यात ओतले. दुधाचे दह्यात रूपांतर करण्यासाठी त्याने भांड्यात थोडे विरजण घातले. त्यानंतर तो झोपला. झोपताना तो दह्याच्या भांड्याचा विचार करू लागला. सकाळी दुधाचे दही होईल. मी दही घुसळून ताक करीन, त्यातून लोणी काढीन. नंतर लोणी कढवून मी त्यापासून तूप तयार करीन. मग मी तूप बाजारात विकीन आणि काही पैसे मिळवेन. त्या पैशांतून मी कोंबडी विकत घेईन. कोंबड्या अंडी घालतील. त्या अंड्यांतून अनेक कोंबड्या जन्माला येतील. मग ही कोंबडी शेकडो अंडी देतील आणि लवकरच माझा तो व्यवसाय मोठा होईल... तो कल्पनेत मग्न होता. मग त्याने विचार केला, मी सर्व कोंबड्या विकीन आणि मग काही गाई-म्हशी विकत घेईन आणि दुधाचा व्यवसाय सुरू करीन. शहरातील सर्व लोक माझ्याकडे दूध घेण्यासाठी येतील आणि मी लवकरच श्रीमंत होईन. मग मी श्रीमंत घरातील एका सुंदर मुलीशी लग्न करीन. मग मला एक सुंदर बाळ होईल. चोर किंवा आणखी कोणी कधी आम्हाला त्रास देण्यासाठी आलेच, तर त्यांना धडा शिकवण्यासाठी मी चांगली दणकट काठी घेऊन त्यांना सामोरा जाईन. असा विचार करत असतानाच त्याने अर्धवट झोपेत असतानाच पलंगाच्या बाजूला पडलेली काठी उचलली आणि जोराने मारली. काठीचा वार त्याच्या दुधाच्या भांड्यावर बसला. त्यामुळे दुधाचे भांडे फुटले आणि सगळे दूध जमिनीवर पसरले. भांड्याचा आवाज ऐकून त्या माणसाची झोप उडाली. सांडलेले दूध पाहून त्याने डोके धरले. बोध : स्वप्न बघा; पण नुसत्या स्वप्नांनी काहीही होणार नाही, मिळणार नाही. आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतात जीवनात कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही. आपले जीवन सर्वोत्तम बनविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. कारण मेहनतीला पर्याय नाही. फक्त स्वप्न पाहत राहिलो आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले नाही, तर असे करून आपण स्वतःची फसवणूक करत असतो. म्हणूनच प्रथम आपल्या बाजूने १०० टक्के प्रयत्न करा, मग यश स्वतःच तुमच्याकडे चालत येईल.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment