विद्या ठकार यांच्या 'इंदू सरल' कंपनीच्या दर्जेदार, वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद
कोल्हापूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या संस्थेने आपल्या लक्ष्यित गटातील उद्योजकांच्या उत्पादनांना ऑनलाइन बाजारपेठ मिळण्याकरिता अमृतपेठ हा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म तयार केला आहे. अनेक उद्योजक यावर नोंदणी करून आपली वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने यावर विक्रीसाठी उपलब्ध करत आहेत. कोल्हापुरातील यशस्वी उद्योजिका विद्या ठकार यांनीही अमृतपेठ ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर नोंदणी केली असून, त्या माध्यमातून त्यांच्या उत्पादनांना ग्राहकांकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे.
इंदू सरल या नावाने विद्या ठकार यांचा व्यवसाय आहे. यात रसायनमुक्त उत्पादनांची निर्मिती केली जाते. त्यात डिश क्लीन, हँडवॉश, मॉस्क्विटो रिपेलंट, फ्लोअर क्लीनर अशा विविध उत्पादनांचा समावेश आहे. ही उत्पादने सुरक्षित आणि पर्यावरणपूरक आहेत. साबण भांड्याला चिकटून राहिल्यामुळे सूक्ष्मजीव पसरून आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. परंतु इंदूर सरलच्या डिश क्लीन या उत्पादनाचा वापर केल्यास भांडी स्वच्छ होतात, आरोग्याची सुरक्षितता राखली जाते आणि पाण्याचाही कमी वापर होतो.
अमृतपेठ या अमृत संस्थेच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची माहिती ठकार यांना मिळाली. या प्लॅटफॉर्मवर नोंदणी केल्याने खरोखर फायदा होईल का, अशी शंका सुरुवातीला त्यांच्या मनात होती; मात्र नोंदणी केल्यानंतर त्यांच्या उत्पादनांना चांगला प्रतिसाद मिळाला. विक्री सुरू झाली आणि अधिक ग्राहकांपर्यंत त्यांची उत्पादने पोहोचली. मुळात विश्वासार्ह असलेल्या त्यांच्या उत्पादनांना अमृतपेठसारखे विश्वासार्ह व्यासपीठ मिळाले. अमृतपेठवर उपलब्ध असलेले उत्पादन म्हणजे विश्वासार्ह उत्पादन अशी भावना ग्राहकांमध्ये असल्याचा अनुभव आल्याचे ठकार यांनी सांगितले.
amrutpeth.com/shop/indusaral-1143
उत्पादनांची वैशिष्ट्ये :
आजचे मानवी जीवन रासायनिक पदार्थांनी व्यापलेले आहे. आजच्या काळात आरोग्य आणि पर्यावरण या दोन्हींचे जतन करणे अत्यावश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीवर इंदू सरल ही कंपनी आरोग्यदायी, रसायनमुक्त आणि पर्यावरणपूरक उत्पादनांच्या निर्मितीसाठी कार्यरत आहे. इंदू सरल या कंपनीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ही उत्पादने भारतीय पारंपरिक ज्ञानावर आधारित आहेत. गायीपासून मिळणाऱ्या बायप्रॉडक्ट्सपासून, तसेच औषधी वनस्पतींपासून तयार केलेली ही उत्पादने शरीराच्या नैसर्गिक प्रतिकारशक्तीला आधार देतात.
डास, कीटक आणि विषाणूंमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी ही उत्पादने उपयुक्त ठरतात. रासायनिक घटकांचा वापर टाळून नैसर्गिक पर्याय देणे हा या कंपनीचा मुख्य उद्देश आहे. ही संस्था फक्त मानवी आरोग्याचाच विचार करत नाही, तर पर्यावरणाचीही तितकीच काळजी घेते. ही संस्था रसायनमुक्त शेतीला प्रोत्साहन देऊन स्थानिक शेतकऱ्यांना सहकार्य करते. त्यामुळे ग्राहक, शेतकरी आणि निसर्ग यांच्यात संतुलन राखण्याचा प्रयत्न केला जातो. आरोग्यपूर्ण जीवन, स्वच्छ पर्यावरण आणि शाश्वत शेती यांचा संगम साधण्याचा प्रयत्न या उत्पादनांच्या निर्मितीतून केला जात आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment