गंगाधर गाडगीळ यांनी लिहिलेल्या लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचा परिचय...
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे भारतातील महान नेते, संपादक, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती होते. त्यांचे आयुष्य हे बहुआयामी होते. लहानपणापासूनच्या त्यांच्या अनेक पैलूंची माहिती आपल्याला समजावून घ्यायची असेल तर दुर्दम्य हे पुस्तक नक्कीच वाचायला हवे. ते गंगाधर गाडगीळ यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेले आहे.
टिळकांच्या डेक्कन कॉलेजातील शिक्षणापासून दुर्दम्य पुस्तकाची सुरुवात होते. तेथे झालेली त्यांची गोपाळ गणेश आगरकरांसोबत मैत्री व शिक्षणाबद्दल आणि राष्ट्रसेवेबद्दल त्यांच्यात झालेली चर्चा, वाद यांचीही माहिती मिळते. राष्ट्रसेवेसाठी आतुर झालेल्या टिळकांनी, वासुदेव बळवंत फडक्यांकडे तलवारबाजीचे प्रशिक्षण घेतले होते. पुढे डेक्कन एजुकेशन सोसायटी आणि केसरी, मराठाच्या स्थापनेकरिता व त्या संस्था चालवताना येणाऱ्या अनेक अडथळ्यांवर मात करताना त्यांनी व आगरकरांनी घेतलेल्या प्रचंड कष्टांचे वर्णन यात आहे. गणेशोत्सवाच्या सुरुवातीचे वातावरण, तेव्हाची सामाजिक परिस्थिती याचे वर्णन या पुस्तकात मिळते. आगरकरांशी झालेल्या मतभेदानंतर केसरी व मराठाचे संपादक टिळक झाले. वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांनी लोकजागृती चालू ठेवली. आपल्या नंतरच्या पिढ्यांमध्ये त्यांनी राष्ट्रप्रेमाची भावना व राष्ट्रसेवेची इच्छा जागवली. आधी चाफेकर आणि नंतर सावरकर अशा महान स्वातंत्र्यवीरांना त्यांनी दिलेला उपदेश - की तुम्ही देशसेवेसाठी अविचाराने कोणतेही साहस करू नये; पण ते जर केलेच तर मी ठामपणे तुमच्या पाठीशी उभा आहे याची खात्री बाळगा. हे पुस्तक वाचून त्यांना 'भारतीय असंतोषाचे जनक' का म्हणतात याची प्रचिती येते.
पुढे या पुस्तकात काँग्रेसचा उल्लेख होतो. स्वराज्य मिळवणे हेच काँग्रेसचे धोरण असावे असा टिळकांचा आग्रह होता. पण मवाळ मतांच्या पुढाऱ्यांना ते मान्य नव्हते. त्यामुळे काँग्रेसमध्ये मवाळ आणि जहाल अशी फूट पडली. आपल्याआपल्यातच पडलेली ही फूट आणि त्यामुळे हरवलेली एकी टिळकांना त्रासदायक वाटत होती. कॉंग्रेस पुन्हा एकत्र व्हावी यासाठी टिळकांनी खूप प्रयत्न केले. कारण त्यांना राष्ट्रहितापुढे काहीही महत्त्वाचे वाटत नव्हते. बंगालच्या फाळणीनंतर झालेल्या बॉम्ब हल्ल्याच्या कटात टिळकांना गुंतवून त्यांना मंडालेला सहा वर्षांची शिक्षा झाली. या शिक्षेमुळे टिळकांना खूप हाल सोसावे लागले. ते हाल सहन करून त्यांनी तेव्हा त्यांनी गीतारहस्य लिहिले.
दुर्दम्य ही कादंबरी फार सोप्या शब्दांत लिहिली आहे. या पुस्तकात, टिळकांच्या जीवनातील बारीकसारीक घटनांचा उल्लेख आहे. हे पुस्तक वाचल्यावर, टिळक, त्यांचा स्वभाव, त्यांचे विचार व त्यांचा त्याग नव्याने कळतो. या थोर नेत्याला जाणून घ्यायचे असेल तर अवश्य वाचावे असे प्रेरणादायी पुस्तक म्हणजे 'दुर्दम्य.'
पुस्तकाचे नाव - दुर्दम्य
लेखकाचे नाव - गंगाधर गाडगीळ
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment