बोधकथा - २१
एक दानशूर राजा होता. त्याने एक दिवस जाहीर केलं, की 'उद्या माझ्या महालाचा मुख्य दरवाजा उघडला जाईल. त्यानंतर ज्याला जी वस्तू हवी असेल, त्याने फक्त त्या वस्तूला हात लावायचा. ती वस्तू त्याला मिळेल.'
दुसरा दिवस उजाडला. सर्व लोक राजवाड्यात शिरले, गर्दी जमली. प्रत्येक जण आपल्याला हवी असलेली वस्तू शोधायचा. कुणी सोने घेतले, कुणी पैसे, कुणी घोडा, तर कुणी दुभती जनावरे घेतली. राजा एका कोपऱ्यात थांबून हा सर्व प्रकार पाहात होता. अचानक त्याचं लक्ष एका चिमुकलीकडे गेलं. ती गर्दीतून वाट काढत हळूहळू राजाच्या दिशेने येत होती. राजा पाहत असतानाच ती त्याच्याजवळ पोहोचली आणि तिने आपल्या नाजूक हातांनी राजाला स्पर्श केला. क्षणार्धात राजा तिचा झाला. राजाच तिचा झाल्यामुळे तिथल्या सर्व वस्तूदेखील तिच्या मालकीच्या झाल्या.
बोध : ज्या पद्धतीने राजाने लोकांना संधी दिली होती, त्याच पद्धतीने परमेश्वर आपल्या प्रत्येकाला रोज संधी देतो; पण त्या लोकांसारखीच आपली चूक होते. परमेश्वराऐवजी आपण त्याने निर्मिलेल्या प्रापंचिक वस्तू निवडतो; पण देवच आपला झाला, तर संपूर्ण जगच आपले होईल.
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment