डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार
आज आपण पाहतो, की सगळे जग नुसते धावत आहे. लहान असोत की मोठे, सगळे कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा पाठलाग करत आहेत मग ते यश असो, पैसा असो की घर किंवा अन्य कोणतीही गोष्ट. सर्वच बाबतीत आपण फक्त आणि फक्त इतरांशी स्पर्धा करत असतो. त्याच्याकडे मोठी गाडी आहे, माझ्याकडे नाही. त्याच्याकडे तीन खोल्यांचे घर आहे, मात्र माझे दोनच खोल्यांचे. अशा किती तरी जणांशी आपण सतत तुलना करत असतो. यालाच आयुष्य म्हणतात का, याने आपण समाधानी राहतो का, हे प्रश्न मात्र आपण स्वत:ला विचारत नाही.
म्हणूनच संविधानकर्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगतात - तुम्ही किती अंतर चालत गेलात, यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने चालत आहात हे अधिक महत्त्वाचे आहे. कारण अंतर फक्त पायांनी मोजले जाते; पण दिशा मन, विचार आणि ध्येय ठरवतात. चुकीच्या दिशेने केलेली मोठी वाटचाल शेवटी निराशेकडे घेऊन जाते. योग्य दिशेने टाकलेले छोटे पाऊलही यशाच्या जवळ नेणारे ठरते. दिशा स्पष्ट असेल, तर वेगाला अर्थ मिळतो. ध्येय ठरलेले असेल तर अडथळेही मार्ग दाखवतात. जीवन ही शर्यत नाही, तर प्रवास आहे. या प्रवासात योग्य दिशा आपली ओळख घडवते. दिशाहीन वेग अपयश निर्माण करतो, तर दिशेसह संयम यशाची गुरुकिल्ली ठरतो. म्हणूनच चालण्याच्या अंतरापेक्षा जीवनाच्या दिशेला अधिक महत्त्व द्यावे.
आपण आपल्या अवतीभवती अशी कितीतरी माणसे पाहतो, जी चुकीच्या मार्गाने यश मिळवतात. त्यांना प्रसिद्धी, संपत्तीसुद्धा मिळते. ते समाजात प्रतिष्ठित म्हणून वावरत असतात. परंतु जेव्हा त्यांचे चुकीचे वागणे, भ्रष्टाचार लोकांसमोर येतो, तेव्हा मात्र त्यांच्याबद्दल लोकांना राग येतो, लोक त्या व्यक्तीचा तिरस्कार करतात. अशा वेळी ही गेलेली प्रतिष्ठा परत मिळण्यासाठी त्यांच्या संपत्तीचा काहीच उपयोग होत नाही. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, की तुम्ही कोणत्या दिशेने जाता ते जास्त महत्त्वाचे आहे.
सत्य मार्गाने, प्रामाणिक कष्टांनी आणि पारदर्शक वर्तनाने मिळवलेले यश चिरकाल टिकते, मग ते थोडे उशिरा मिळाले किंवा अपेक्षेपेक्षा कमी मिळाले तरी चालेल. कारण अशा मार्गाने मिळालेल्या यशात पश्चात्ताप करावा लागत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या आदर्श व्यक्ती याच पद्धतीने जगल्या. त्यामुळे त्यांचे विचार, जीवन पुढील पिढ्यांसाठी आदर्श ठरले. त्यांचे समाजासाठी झटणे, समरस होऊन जगणे यातून आपल्याला जगण्याची योग्य दिशा मिळते. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या सुविचाराचे महत्त्व फार आहे. योग्य दिशेने टाकलेले छोटेसे पाऊलसुद्धा खूप मोठे परिवर्तन घडवून आणते. हाच विचार डॉ. आंबेडकर यांच्यासारख्या थोर व्यक्तिमत्त्वाने समाजात समानता येण्यासाठी राज्यघटनेच्या माध्यमातून मांडला. अशा या थोर व्यक्तिमत्त्वाला त्रिवार वंदन!
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment