एका सुप्रसिद्ध संगीतकाराची, देशप्रेमी व्यक्तिमत्त्वाची संघर्षगाथा
सुप्रसिद्ध संगीतकार कै. सुधीर फडके तथा बाबूजी यांचे ‘जगाच्या पाठीवर’ हे अपुरे आत्मचरित्र म्हणजे वणवण भटकणार्या आणि कंगाल अवस्थेतही संगीतसाधना करत राहिलेल्या एका कलंदर कलावंताचे विलक्षण पारदर्शी आत्मकथन आहे. उत्तरायुष्यात त्यांना मिळालेल्या प्रचंड यशामागे दडलेले त्यांचे अपयश आणि त्यावर मात करणारी त्यांची जिद्द याचे प्रभावी दर्शन घडवणारे हे पुस्तकसुद्धा लोकप्रियतेचे उच्चांक प्रस्थापित करणारे ठरले आहे. ललिता फडके यांनी सांगितलेल्या हृद्य आठवणींच्या आणि असंख्य दुर्मीळ छायाचित्रांच्या समावेशामुळे पुस्तकाच्या मौलिकतेत अधिक भर पडली आहे.
सुप्रसिद्ध संगीतकार सुधीर फडके यांनी ‘किर्लोस्कर’ मासिकातून आपल्या आत्मचरित्राचा काही भाग लिहून प्रसिद्ध केला होता. त्या लेखमालिकेचे नाव होते ‘जगाच्या पाठीवर.’ त्याचेच नंतर पुस्तकात रूपांतर करण्यात आले. सुधीर फडके यांच्या लहानपणीच्या व अगदी सुरुवातीच्या खडतर उमेदवारीच्या काळातील आठवणी आहेत.
सुधीर फडके हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जणू भक्तच होते. सावरकरांच्या राष्ट्रभक्तीच्या विचारांनी ते भारावले होते. या स्वातंत्र्यसूर्याच्या जीवनावर चित्रपट निर्मिती व्हावी अशी त्यांची जबरदस्त इच्छा होती. त्यांनी जणू याचा ध्यासच घेतला. या प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर, अनंत हालअपेष्टा सोसत, अडीअडचणींवर प्रयत्नपूर्वक मात करून, कुचेष्टा-अपमान-आजारपण यांची तमा न बाळगता कशी पूर्ण केली हे या पुस्तकातून वाचताना आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. चित्रपटसृष्टीत संगीत-दिग्दर्शक व पार्श्वगायनाच्या क्षेत्रात त्यांना मिळालेले यश, या क्षेत्रातील भले-बुरे अनुभव या पुस्तकात दिले आहेत. ‘गीतरामायण’ या अद्वितीय कलाकृतीशिवाय सुधीर फडके यांचे आयुष्य अपूर्ण आहे. गीतरामायण म्हणजे बाबूजी अर्थात सुधीर फडके आणि आधुनिक वाल्मीकी म्हणून ज्यांचा उल्लेख होतो ते ग. दि. माडगूळकर यांची झालेली भेट. गीतरामायणाची निर्मिती, त्यानंतरची लोकप्रिय वाटचालीची कथा या पुस्तकातून वाचताना त्या कलाकृतीच्या दिव्यत्वाची प्रचीती येते. सुधीर फडके यांनी गोवा मुक्तिसंग्रामातसुद्धा भाग घेतला होता. दादरा-नगरहवेली पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त करण्याच्या साहसी योजनेतला प्रत्यक्ष सहभाग अशा आणि अनेक घटनांचा उल्लेख या पुस्तकात आहे.
एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचे यश आपल्याला दिसते; मात्र त्या यशामागची तपश्चर्या आपल्याला अशा पुस्तकातून कळते. फक्त आपल्याच आयुष्यात अडचणी आहेत अशी आपली कल्पना असते; पण संघर्ष म्हणजे काय, हे आपल्याला या पुस्तकातून कळते. पुस्तकात असे अनेक प्रसंग आहेत, जे वाचताना आपल्या डोळ्यांत पाणी येते. बाबूजींच्या जागी आपण असतो तर कदाचित त्या हालअपेष्टा असह्य होऊन आत्महत्येचा मार्ग स्वीकारला असता, असेच वाटते. अशा भयावह परिस्थतीतून या थोर माणसाने वाट काढली आणि यशस्वी होऊन दाखवले. अगदी आवर्जून वाचावे आणि संग्रही ठेवावे असे प्रेरणादायी पुस्तक म्हणजे जगाच्या पाठीवर.
पुस्तकाचे नाव - जगाच्या पाठीवर (आत्मचरित्र)
लेखक - सुधीर फडके
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment