समर्थ रामदासस्वामींचा अभंग
छत्र सुखासनी अयोध्येचा राजा ।
नांदतसे माझा मायबाप ।।१।।
माझा मायबाप त्रिलोकी समर्थ ।
सर्व मनोरथ पूर्ण करी ।।२।।
पूर्ण प्रतापाचा कैवारी देवांचा ।
नाथ अनाथांचा स्वामी माझा ।।३।।
स्वामी माझा राम योगियां विश्राम ।
सांपडले वर्म थोर भाग्य ।।४।।
थोर भाग्य ज्याचें राम त्याचें कुळीं ।
संकटीं सांभाळीं भावबळें ।।५।।
भावबळें जेहीं धरिला अंतर ।
तथा क्षणभरी विसंबेना ।।६।।
विसंबेना कदा आपल्या दासासी ।
रामी रामदासां कुळस्वामी ।।७।।
- समर्थ रामदासस्वामी
(संकलक : प्रसाद वैद्य)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment