बोधकथा - १५
एकदा बिरबलाला पर्शिया देशात भेटीसाठी पाठवण्यात आले होते. बिरबलाने त्या देशातील सर्व ठिकाणांना भेटी दिल्या. सगळी ठिकाणे पाहिली. थोरा-मोठ्यांच्या गाठीभेटी घेतल्या व सर्वांत शेवटी राजाच्या भेटीसाठी दरबारात गेला.
बराच वेळ सर्व विषयांवर चर्चा झाल्यावर कुणीतरी अचानकच बिरबलाला विचारले, 'महाशय! तुमच्या देशाचे बादशहा आणि पर्शियाचे बादशहा यांच्यात तुम्हाला काय फरक जाणवला? किंवा यांची कशी तुलना तुम्ही कराल?'
बिरबलाने तात्काळ त्याचे उत्तर दिले, 'अहो! तुमचे बादशहा म्हणजे अगदी पौर्णिमेच्या चंद्रासारखे तेजस्वी आहेत आणि आमचे बादशहा हे प्रतिपदेच्या चंद्राइतके तेजस्वी आहेत.' या उत्तरावर त्या दरबारातील सर्वच जण खूश झाले.
त्या बादशहाने तर बिरबलाचा खूप मोठा सन्मान केला. जेव्हा बिरबल आपल्या देशी परतला तेव्हा त्याच्या त्या विधानाची कीर्ती अगोदरच तिथे पोहोचली होती. बादशहा व सर्व दरबाऱ्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. आपल्या बादशहाला परदेशात जाऊन कमी लेखणे हे अनेकांच्या जिव्हारी लागले.
बादशहालाही हे आवडले नाही. त्याने बिरबलाला विचारले, 'तू परदेशी गेला असता असे उद्गार का काढलेस?' यावर बिरबल म्हणाला, 'महाराज! तुम्हाला प्रतिपदेचा चंद्र म्हणजे दिवसेंदिवस समृद्ध होत जाणारा चंद्र अशी उपमा दिली. पर्शियाच्या बादशहाला पौर्णिमेचा चंद्र म्हणजे कलेकलेने कमी होत जाणारा चंद्र अशी उपमा दिली आहे. मला माझे बादशहा हे दिवसेंदिवस समृद्ध होत गेलेले पाहायचे आहेत. त्यामुळे मी असा फरक केला."
या उत्तराने बादशहाचे समाधान झाले.
बोध : कोणत्याही गोष्टीत नेहमी सकारात्मक बाजू पाहावी.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment