१८५७चे स्वातंत्र्यसमर

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रेरक पुस्तकाविषयी...

१८५७चे स्वातंत्र्यसमर मुख्य फोटो
१८५७चे स्वातंत्र्यसमर अतिरिक्त फोटो

'क्रांतिकारकांचे मुकुटमणी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या '१८५७ चे स्वातंत्र्यसमर' या ग्रंथाने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात या ग्रंथापासून प्रेरणा घेऊन अनेक सशस्त्र क्रांतिकारक तयार झाले. या ग्रंथात त्यांनी तथाकथित 'शिपाई बंडा'चा सनसनाटी व संशोधनपूर्ण इतिहास मांडून ब्रिटिश सत्तेला हादरवून सोडले होते. विशेष म्हणजे हा ग्रंथ प्रकाशित होण्यापूर्वीच त्यावर बंदी घालण्यात आली. बहुतेक इतिहासकारांनी १८५७च्या प्रथम भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाला 'शिपाई बंड' किंवा 'भारतीय उठाव' असे संबोधले होते. दुसरीकडे, भारतीय विचारवंतांनीही तोपर्यंत या घटनेला भारतातील ब्रिटिश साम्राज्यावर केलेला एक सुनियोजित राजकीय व लष्करी हल्ला म्हणूनच पाहिले होते. परंतु सावरकरांनी मात्र १८५७मधील घटनांकडे भारतीय दृष्टिकोनातून पाहिले. स्वतः तेजस्वी नेता व क्रांतिकारक असल्याने, १८५७च्या वीरांचे शौर्य, पराक्रम, ज्वलंत उत्साह हे सगळे त्यांनी या पुस्तकातून मांडले आहे. त्या काळात उपलब्ध असलेल्या पुराव्यांच्या आणि दस्तऐवजांच्या आधारे या संपूर्ण घटनेचे पुनर्वाचन करून या सगळ्या घटना विस्तृतपणे शब्दबद्ध करण्याचा त्यांनी निर्धार केला. 

सावरकरांनी हे संपूर्ण पुस्तक मराठीत लिहिले आणि १९०८ साली ते पूर्ण झाले. त्या काळात भारतात त्याचे मुद्रण अशक्य होते. इंग्लंड व जर्मनी येथेही या ग्रंथाचे मुद्रण होऊ शकले नाही. इंडिया हाउसमध्ये वास्तव्यास असलेल्या काही विद्यार्थ्यांनी या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद केला आणि अखेरीस १९०९ साली हे पुस्तक हॉलंडमध्ये मुद्रित झाले. त्याचे शीर्षक होते 'द इंडियन वॉर ऑफ इंडिपेन्डन्स - १८५७.' या पुस्तकाची दुसरी आवृत्ती लाला हरदयाल यांनी गदर पक्षाच्या वतीने अमेरिकेत प्रकाशित केली, तर तिसरी आवृत्ती सरदार भगतसिंग यांनी प्रसिद्ध केली. चौथी आवृत्ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पूर्वेकडील देशांमध्ये प्रकाशित केली. त्यानंतर या ग्रंथाचा उर्दू, हिंदी, पंजाबी व तमीळ या भाषांत अनुवाद करण्यात आला. दुसरे महायुद्ध समाप्त झाल्यानंतर या पुस्तकाची एक आवृत्ती गुप्तरीत्या भारतातही मुद्रित करण्यात आली. 

या ग्रंथाची मूळ हस्तलिखित प्रत पॅरिस येथे मॅडम भिकाजी कामा यांच्या जवळ सुरक्षित ठेवण्यात आली होती. पहिल्या महायुद्धाच्या काळात पॅरिसमध्ये संकट उद्भवल्यावर ही प्रत 'अभिनव भारत'चे डॉ. कुतिन्हो यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. डॉ. कुतिन्हो यांनी ती एखाद्या पवित्र धार्मिक ग्रंथाप्रमाणे तब्बल ४० वर्षे जपून ठेवली. भारतीय स्वातंत्र्यानंतर त्यांनी ती रामलाल वाजपेयी आणि डॉ. मुंजे यांच्याकडे दिली होती. या पुस्तकावरची बंदी अखेर मे १९४६ मध्ये तात्कालीन मुंबई सरकारने उठवली होती. आजही हे पुस्तक वाचताना आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. १८५७च्या युद्धातील प्रत्येक घटनेचे, प्रसंगाचे, त्यातील प्रत्येक शूरवीराचे वर्णन वाचताना जणू काही ती घटना आपल्या डोळ्यांसमोर घडते आहे असेच वाटते. त्या शूरवीरांना आणि ते शब्दबद्ध करणाऱ्या क्रांतिसूर्याला वंदन! अवश्य वाचावे आणि संग्रही ठेवावे असे पुस्तक!

(संकलित)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 24-01-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 57 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 24-01-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 57 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words