बोधकथा - १४
फार पूर्वी एक तपस्वी ऋषी रघुवीर गुरुकुलात मुलांना शिक्षण देत असत. त्यांच्या गुरुकुलात मोठ्या राजांच्या मुलांपासून अगदी सर्वसामान्य कुटुंबातील मुलेही शिकत असत. वर्षानुवर्षे शिक्षण घेतलेल्या शिष्यांच्या शिक्षणाचा कालावधी एके दिवशी पूर्ण होत होता आणि सर्व जण मोठ्या उत्साहाने आपापल्या घरी परतण्याच्या तयारीत होते तेव्हा अचानक ऋषिवरांचा भारदस्त आवाज सर्वांच्या कानावर पडला, 'तुम्ही सर्व जण मैदानावर गोळा व्हा.'
शिष्यांनी आज्ञा ऐकून तसेच केले.
ऋषिवर म्हणाले, 'प्रिय शिष्यांनो, आज तुमचा या गुरुकुलातील शेवटचा दिवस आहे. येथून जाण्यापूर्वी तुम्ही सर्वांनी एका शर्यतीत भाग घ्यावा असे मला वाटते. ही एक अडथळा शर्यत असेल आणि यामध्ये तुम्हाला काही ठिकाणी उडी मारावी लागेल, काही ठिकाणी पाण्यातून धावावे लागेल आणि शेवटच्या भागात तुम्हाला एका काळोख्या बोगद्यातून जावे लागेल. तुम्ही सर्व जण तयार आहात का?'
'हो, आम्ही तयार आहोत,' शिष्य एका आवाजात म्हणाले आणि शर्यत सुरू झाली. सर्व जण वेगाने धावू लागले. सर्व अडथळे पार करून अखेर ते बोगद्यात पोहोचले. तिथे खूप अंधार होता आणि त्यात ठिकठिकाणी धारदार दगड पडलेले होते. ते टोचल्यावर त्यांना असह्य वेदना होत होत्या.
सर्व जण गोंधळून गेले. आतापर्यंत सर्व जण शर्यतीत एकसारखेच वागत होते; पण आता सर्व जण वेगळे वागू लागले. सगळे जण शर्यत कशी तरी संपवून ऋषिवरांसमोर जमले.
'मुलांनो! मी पाहतोय, की काही जणांनी खूप लवकर शर्यत पूर्ण केली आणि काहींना जास्त वेळ लागला. असे का?' ऋषिवरांनी विचारले.
हे ऐकून एक शिष्य म्हणाला, 'गुरुजी, आम्ही सगळे मिळून जवळपास सारखेच धावत होतो; पण बोगद्यात पोहोचताच परिस्थिती बदलली. काही जण पुढे जाण्यासाठी इतरांना ढकलण्याचा प्रयत्न करत होते, तर काही सावधपणे पुढे जात होते. असे काही जण होते, की ते टोचणारे दगड उचलून आपल्याकडे ठेवत होते. पाठीमागून येणार्यांना त्रास होऊ नये, असा त्यांचा उद्देश होता. त्यामुळे प्रत्येकाने वेगवेगळ्या वेळी शर्यत पूर्ण केली.'
'ठीक आहे! ज्यांनी दगड उचलले आहेत, त्यांनी पुढे येऊन मला ते दगड दाखवावेत,' ऋषीवरांनी आदेश दिला.
आदेश ऐकताच काही शिष्य पुढे आले आणि त्यांनी दगड काढण्यास सुरुवात केली. परंतु त्यांना जे दगड वाटले ते मौल्यवान हिरे होते. सगळे आश्चर्यचकित होऊन ऋषिवरांकडे पाहू लागले.
'मला माहीत आहे, की तुम्ही हे हिरे पाहून आश्चर्यचकित झाला आहात.' ऋषिवर म्हणाले.
'खरे तर, मीच हे हिरे त्या बोगद्यात टाकले होते आणि इतरांबद्दल विचार करणार्या शिष्यांसाठी हा माझा पुरस्कार आहे....'
'ही शर्यत जीवनातील घाईघाईचे दर्शन घडवते, जिथे प्रत्येक जण काही तरी साध्य करण्यासाठी धावत आहे. परंतु शेवटी फक्त तोच सर्वांत समृद्ध असतो, जो या धावपळीतही इतरांचा विचार करतो आणि त्यांचे भले करण्यास चुकत नाही. म्हणूनच इथून निघताना तुम्ही तुमच्या जीवनात उभारणार असलेल्या यशाच्या इमारतीमध्ये परोपकाराच्या विटा ठेवण्यास विसरणार नाही याची खात्री करा. कारण शेवटी तो तुमचा सर्वांत मौल्यवान खजिना असेल...'
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment