आनंददृष्टी...

बोधकथा - १३

आनंददृष्टी... मुख्य फोटो
आनंददृष्टी... अतिरिक्त फोटो

दोन आजारी माणसे एका हॉस्पिटलच्या खोलीत एकत्र होती. त्यापैकी एकाचा पलंग खोलीतील एकमेव खिडकीजवळ होता. दुर्दैवाने, दुसरा रुग्ण हालचाल करू शकत नव्हता आणि त्याला पलंगावरच सरळ पडून राहावे लागत होते. खिडकीजवळचा माणूस पलंगावर पडलेल्या रुग्णाला दररोज बाहेर काय दिसते ते सांगत असे.

किती सुंदर हवामान आहे, तिथे समोरचे उद्यान खूपच सुंदर दिसतेय. तिथे एक तलावही आहे. बदके पाण्यात खेळताहेत. तीन मुले त्या तलावात त्यांच्या प्लास्टिकच्या होड्यांनी खेळत आहेत. एक वृद्ध दाम्पत्य हातात हात घालून, विविध रंगांच्या फुलांनी सजलेल्या मार्गावर चालत आहे. दूरवरून शहरातील गगनचुंबी इमारतीही दिसत आहेत.

खिडकीजवळचा माणूस दररोज त्याच्या खोलीतल्या मित्राला बाहेर काय दिसतेय ते सांगत असे. जो पलंगावर होता, तो डोळे मिटून हे सर्व बाहेरचे दृश्य एका चित्राप्रमाणे डोळ्यांसमोर आणत असे. यामुळे त्याला खूप बरे वाटत होते. हे त्याच्यासाठी उपचारात्मकही होते आणि त्याला दैनंदिन जीवनातील निराशेपासून सुटका मिळवून देणारेही होते.
अनेक दिवस निघून गेले. एके संध्याकाळी खिडकीजवळचा माणूस शांतपणे झोपेतच वारला. दोन दिवसांनंतर पलंगावर पडलेल्या रुग्णाने दुसऱ्या पलंगावर नेण्याची आणि त्याच्या खोलीतील मित्राच्या आवडत्या खिडकीजवळ नेण्याची विनंती केली. नर्सने त्याची विनंती मान्य केली आणि आवश्यक ती व्यवस्था केली. हळूहळू आणि वेदनांसह तो माणूस पलंगावरून उठला. कारण बाहेरचे जग स्वतः पाहण्यासाठी तो उत्सुक होता.

जेव्हा त्याची नजर एका भिंतीवर पडली. तेव्हा त्याला खूप आश्चर्य वाटले. कारण बाहेर फक्त एक भिंत होती. तो खूपच आश्चर्यचकित झाला. मग त्याने नर्सला बोलावले आणि कुतुहलाने विचारले, 'माझा शेजारी मला जे काही सांगत होता, ते सगळे तो कसे पाहू शकला?' तेव्हा नर्सने त्याला सांगितले, की 'इथे भिंतीशिवाय दुसरे काहीही नव्हते. तो माणूस अंध होता आणि तो ही भिंतसुद्धा पाहू शकत नव्हता.'
तो काहीही पाहू शकत नव्हता, तरी तो कल्पनांच्या साह्याने आनंददायी वातावरणनिर्मिती करून त्याच्या खोलीतील रुग्णमित्राचा दिवस आनंदी करू इच्छित होता.

तात्पर्य : कुठलाही हेतू न ठेवता दुसऱ्याला आनंदी करण्यापेक्षा मोठे सुख काहीच नाही. कारण आनंद वाटून घेतला, तर तो दहापट वाढतोच. त्यामुळे आपल्याकडून दुसऱ्याला जे जे काही चांगले देता येऊन त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करता आला, तर त्याहून मोठे सुख आणि पुण्यकर्म कोणतेही नसते.

(संकलित)

Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 21-01-2026 News publication date | Time: 11:33 AM News publication time | Views: 107 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news
Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 21-01-2026 News publication date | Time: 11:33 AM News publication time | Views: 107 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words