इच्छाशक्ती, जिद्द आणि प्रयत्न

बोधकथा - १२

इच्छाशक्ती, जिद्द आणि प्रयत्न मुख्य फोटो
इच्छाशक्ती, जिद्द आणि प्रयत्न अतिरिक्त फोटो

एखादी गोष्ट मिळवायची असेल, तर माणसाकडे जिद्द लागते. एकदा ध्येय निश्चित केले, की माणूस हात धुऊन त्याच्या मागे लागतो. सातत्य, चिकाटी, मेहनत, परिश्रम, त्याग यातून तो अपेक्षित ध्येय गाठू शकतो. कारण प्रत्येकाला हवे ते मिळवण्यासाठी कष्ट करावेच लागतात.

खेळाडू तर लहानपणापासूनच परिश्रम करत असतात. ते खेळासाठी आणि देशासाठी सर्वस्व त्यागून खेळतात. असाच एक खेळाडू खेळला आणि जिंकला, फक्त मैदानावरच नाही तर आयुष्यातही जिंकला. लहानपणी झालेल्या अपघातामुळे पायातील त्राण गेले; मात्र जिद्दीने पुन्हा उभा राहून शर्यतीत जिंकून विश्वविक्रम प्रस्थापित केला.

कॅन्सस स्टेटमधील छोट्याशा शाळेत एक ग्लेन कनिंगहॅम नावाचा सात वर्षांचा मुलगा शिकत होता. तो शाळेत अपेक्षेपेक्षा लवकरच पोहोचायचा. त्या दिवशी शाळेत भयाण आग लागली. या आगीत हा मुलगा अडकला. जेव्हा विद्यार्थी आणि शिक्षक शाळेत पोहोचले, तेव्हा त्यांच्या लक्षात आले, की हा मुलगा त्या आगीत अडकलेला आहे.

शाळेत लागलेली आग या मुलाच्या अगदी जिवावर बेतली होती. त्याला कसेबसे त्या आगीतून बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढले गेले. त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याची परिस्थिती पाहून डॉक्टर म्हणाले, 'तो कधीच चालू शकणार नाही. कारण त्याच्या पायांची दुरवस्था झाली आहे. '

पण जगण्याच्या प्रचंड इच्छाशक्तीने त्या मुलाला तारले आणि डॉक्टरही हे पाहून आश्चर्यचकित झाले. त्याला रुग्णालयामधून सोडण्यात आले. रुग्णालयातून घरी आल्यानंतर आपल्या पायावर पुन्हा एकदा सक्षमपणे उभे राहण्यासाठी मुलाने आत्यंतिक प्रयत्न करायला सुरुवात केली. दररोज त्याची आई त्याच्या पायांना मालिश करायची. तो सारखा प्रयत्न करायचा; पण ते त्याला अवघड जात होते. व्हीलचेअरच्या मदतीने तो आता बाहेर जाऊ लागला. एक दिवस त्या मुलाने व्हीलचेअरवरून अंग सोडून दिलं आणि तो जमिनीवर पडला. रांगतच एका आधाराला धरून उभा राहिला. हळूहळू त्याचा आत्मविश्वास वाढू लागला. तो दररोज उठून उभे राहण्याचा प्रयत्न करू लागला.

एक दिवस कोणताही आधार न घेता तो मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहिला. शेवटी त्याच्या आईने घेतलेली काळजी आणि त्याचा दृढनिश्चय यामुळे तो चालू लागला. यानंतर हळूहळू तो धावू लागला. घरातून शाळेपर्यंत तो धावत जात असे. यानंतर महाविद्यालयात धावपटूंच्या गटात तो सहभागी झाला. यानंतर त्याने अनेक मोठमोठ्या स्पर्धांत भाग घेऊन मेडल्स मिळवली.

१९३४ साली न्यूयॉर्कमध्ये या मुलाने धावण्याच्या शर्यतीत विश्वविक्रम प्रस्थापित करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्या मुलाचे नाव डॉ. ग्लेन कनिंगहॅम. ग्लेन उर्वरित आयुष्यात स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील की नाही, याचीही शाश्वती नव्हती; मात्र सकारात्मक विचार आणि आत्मविश्वासाच्या जोरावर अशक्य गोष्ट त्यांनी शक्य करून दाखवली.

बोध : जीवनात कितीही प्रतिकूल परिस्थिती असली, तरी निराश न होता त्यावर मात करण्याची प्रचंड इच्छाशक्ती, जिद्द, संयम बाळगून सातत्यपूर्ण प्रयत्न केले, की अशक्य गोष्टी शक्य होऊ शकतात.

(संकलित)

Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 20-01-2026 News publication date | Time: 11:37 AM News publication time | Views: 307 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news
Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 20-01-2026 News publication date | Time: 11:37 AM News publication time | Views: 307 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words