'एक व्यक्ती एक झाड' उपक्रमाचे पुरस्कर्ते
आपण आपल्या सगळ्या समस्यांसाठी सोयीस्करपणे शासनाला जबाबदार धरतो. परंतु या समस्यांसाठी नागरिक म्हणून आपणही जबाबदार असतो. समाजाचा एक भाग म्हणून आपलीही काही कर्तव्ये असतात, हे मात्र आपण विसरतो. काही व्यक्ती मात्र समाजाला बरोबर घेऊन हे कार्य करत असतात. आपला स्वार्थ न पाहता समाजासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे या विचाराने अशा व्यक्ती कार्यरत आहेत. असेच एक समाजपरिवर्तक आहेत छत्तीसगडमधील विश्वनाथ पाणिग्रही.
महासमुंद रायपूर, बागबाहराचे येथील विश्वनाथ पाणिग्रही १७ वर्षांपासून प्रकृतिरथाचे सारथी बनले आहेत. स्वच्छ भारतचे घोषवाक्य गावोगावी लावून ते गावोगावी फिरतात. त्यांचा नारा आहे 'एक व्यक्ती एक झाड.' या उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत देशभरात दीड लाखाहून जास्त झाडे लावण्यात आलेली आहेत. १९९८पासून या उपक्रमाची त्यांनी सुरुवात केली. विश्वनाथ पाणिग्रही हे गावांमध्ये औषधी वाटिका तयार करत आहेत आणि आपल्या पूर्वजांची आठवण म्हणून झाड लावायची प्रेरणा दिली आहे. लग्नकार्यांमध्येसुद्धा ते भेट म्हणून रोपटे देतात. कन्यादान करताना त्या वधूच्या हातून माहेरी झाड लावून घेतात आणि आपल्या लेकीची आठवण म्हणून आई-वडिलांना त्या झाडाची जोपासना करण्याची प्रेरणा देतात. ते महासमुंद जिल्ह्यातील ११३२ गावांमध्ये ‘स्वच्छता संकल्प मशाल’ घेऊन ते फिरले आहेत. स्वखर्चाने आठ हजार किलोमीटरचा प्रवास केला. २०१६मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment