भांड्यांचे मरण

बोधकथा - १०

भांड्यांचे मरण मुख्य फोटो
भांड्यांचे मरण अतिरिक्त फोटो

एक व्यापारी होता. तो भांडी भाड्याने देऊन त्यातून पैसे कमावत असे. एकदा त्याने कुणालातरी भांडी भाड्याने दिली. त्या व्यक्तीने त्याच्याकडून भांडी घेतली आणि भाडे दिले; पण भांडी परत करताना त्याने आणखी दोन-तीन भांडी दिली. तो व्यापारी विचारू लागला, की आणखी भांडी का दिली? त्या व्यक्तीने सांगितले, की तुम्ही दिलेल्या भांड्यांची ती मुले आहेत. त्यांचीही काळजी घ्या.

असा ग्राहक मिळाल्याने व्यापारी खूप खूश होता. याचा आपल्याला खूप फायदा होईल. आपल्याला फक्त भाडेच नाही, तर आणखी भांडीही मिळतील, असे त्याला वाटले. असेच काही दिवस गेले. पुन्हा तीच व्यक्ती आली. परत येताना त्याने आणखी काही भांडी दिली आणि त्या भांड्यांनी मुलाला जन्म दिला हेच पुन्हा सांगितले. व्यापारी खूप आनंदात होता आणि त्याने शांतपणे सर्व भांडी ठेवून घेतली.

महिन्याभरानंतर तो माणूस पुन्हा व्यापाऱ्याकडे गेला आणि म्हणाला, 'माझ्या घरी काही खास पाहुणे येणार आहेत. तेव्हा तुमच्याकडे असलेली चांदीची भांडी मला द्या.'

व्यापाऱ्याने विचार केला, की आधी दिलेल्या भांड्यांच्या बदल्यात आपल्याला जास्त भांडी मिळाली आहेत. या वेळी चांदीची भांडी दिल्यास आणखी भांडी मिळतील आणि फायदा होईल. त्यामुळे त्याने चांदीची भांडी दिली; पण बरेच दिवस झाले, तरी ती व्यक्ती भांडी परत करायला आली नाही. आता व्यापारी खूप अस्वस्थ झाला.

त्याने त्या व्यक्तीचे घर गाठले आणि त्याला विचारले, की भांडी का परत केली नाहीत?

ती व्यक्ती खूप उदास झाली आणि म्हणाली, 'काय करू, तुम्ही दिलेली चांदीची भांडी मेली आहेत!'

तो व्यापारी खूप चिडला आणि म्हणाला, 'काहीही काय सांगताय? भांड्यांचा कधी मृत्यू होतो का?' त्या व्यक्तीने सांगितलं, की 'भांड्यांना मुले झाल्याचे सांगितले, तेव्हा तुम्हाला ते बरोबर वाटले होते. भांड्यांना मुले होऊ शकतात तर मरू का शकत नाहीत?' यावर तो व्यापारी निरुत्तर झाला.

बोध : माया, लोभ, मोह यांमुळे माणूस इतका आंधळा होतो, की त्याला काहीच समजत नाही. महात्मा आणि संत प्रत्येक पावलावर माणसाला सावध करतात, की लोभामुळे सत्य सोडू नका. नाहीतर नंतर पश्चात्तापाची वेळ येते!

Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 13-01-2026 News publication date | Time: 11:11 AM News publication time | Views: 124 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news
Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 13-01-2026 News publication date | Time: 11:11 AM News publication time | Views: 124 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words