स्वत्व ओळखा...

बोधकथा - ९

स्वत्व ओळखा... मुख्य फोटो
स्वत्व ओळखा... अतिरिक्त फोटो

एकदा अकबर बादशहाला आपल्या सरदारांची विचित्र परीक्षा घेण्याची लहर आली. त्याने आपल्या प्रत्येक सरदाराला मांजराचे एकेक गोजिरवाणे पिल्लू दिले. आजपासून बरोबर सहा महिन्यांनी दरबारात या पिल्लाची परीक्षा होईल आणि ज्याचं मांजर श्रेष्ठ ठरेल, त्याला मोठे बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा बादशहाने केली.

प्रत्येक सरदार मांजराचे पिल्लू घेऊन घरी गेले. बादशहाने त्या मांजरावर लावलेल्या बक्षिसाबद्दल त्यांनी घरी सांगितले. मांजराला दूध आणि चांगली मिठाई खाऊ-पिऊ घाला अशी प्रत्येकाने घरातल्या माणसांना सूचना दिली. प्रत्येक सरदाराच्या घरी सरदाराच्या मांजरांना खुराक चालू झाला. हळूहळू पिल्लांच्या अंगावर तो दिसू लागला. ती चांगली गुबगुबीत दिसू लागली; मात्र बिरबलाने त्याल्या मिळालेल्या मांजराच्या पिल्लाला असा वेगळा खुराक दिला नाही. घरातल्या साध्या अन्नावर त्याला वाढवलं आणि उंदीर पकडायला शिकवले. बिरबलाचे मांजर उंदीर पकडण्यात तरबेज झाले; मात्र ते गुबगुबीत झाले नाही.

अकबर बादशहाने सहा महिन्यांनी सर्व सरदारांना आपल्याकडचे मांजर दरबारात घेऊन यायला सांगितले. अकबराने दरबारात आलेल्या सर्व मांजरांवर नजर फिरवली. बिरबलाच्या हातातील मांजर पाहून बादशहाला हसू आले. आपले हसू अडवत बादशहा म्हणाला, 'बिरबला, सगळ्या सरदारांची मांजरे गुबगुबीत दिसत असताना तुझ्या मांजराची अशी अवस्था का?'

बिरबल आपल्या मांजराच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाला, 'खाविंद, आपण मांजराची परीक्षा तर घ्या. उंदीर पकडणे हे मांजराचे काम आहे. त्यात ते पटाईत असायला हवे.' बादशहाला ते पटले आणि त्याने सेवकाला दरबारात उंदीर सोडायला सांगितले. १५-२० उंदीर दरबारात धावू लागले. प्रत्येक सरदाराने त्या उंदरांच्या दिशेने आपले मांजर सोडले. बिरबलाच्या मांजराने तर बिरबलाच्या हातातून उडी मारली. ते उंदराच्या मागे सुसाट धावत सुटले. त्याने दोन-तीन उंदीर मारलेदेखील. इतर गलेलठ्ठ मांजरे फक्त आपल्या गोंडेदार शेपट्या फुगवून तशीच जागेवर बसून पाहून लागली. त्यांनी फक्त आपल्या मिशा फेंदारल्या होत्या आणि अंग फुगवले होते. सरदार त्यांना पुढे ढकलत होते. परंतु जागेवरून हलण्याची त्यांची तयारी नव्हती. साहजिकच बादशहाने बिरबलाच्या मांजराला श्रेष्ठ ठरवून बिरबलाला भलेमोठे बक्षीस दिले, हे वेगळे सांगायला नको.

बोध : प्रत्येकाने आपले काम ओळखून त्यात तरबेज होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. याचाच अर्थ असा, की स्वत्व ओळखणे महत्त्वाचे...



Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 12-01-2026 News publication date | Time: 11:13 AM News publication time | Views: 77 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news
Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 12-01-2026 News publication date | Time: 11:13 AM News publication time | Views: 77 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words