मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं?

बोधकथा - ७

मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं? मुख्य फोटो
मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं? अतिरिक्त फोटो

एका धनिकाला एका ज्योतिष्याने सांगितले, की 'तुमचे आता आठच दिवस राहिले आहेत. काय ती निरवानिरव करून टाका. काही अपुऱ्या इच्छा असतील, त्या पूर्ण करून घ्या.'

धनिकाने वेगवेगळ्या ज्योतिष्यांकडून खात्री करून घेतली. सगळ्यांनी हेच भविष्य वर्तवलं. धनिक म्हणाला, 'पृथ्वीवर कमावण्यासारखे जे आहे ते मी मिळवले. पैसा-अडका खूप आहे माझ्याकडे; पण सुख कशाला म्हणतात ते काही मला कळले नाही. आजवर ते मिळाले नाही. मला कुणीतरी सुखाची एक छोटीशी झलक दाखवली, तरी त्या माणसाला मी हवी तेवढी संपत्ती द्यायला तयार आहे.'

ज्योतिषी म्हणाले, 'तो आमचा विषय नाही. सुख ज्याचे त्याने शोधायचे.'

बऱ्याच ठिकाणी विचारणा केल्यानंतर तो धनिक निराश झाला. शेवटी खजिन्यातील मौल्यवान हिरेमाणकांची एक थैली घेऊन, एका घोड्यावर स्वार होऊन तो गावोगाव फिरू लागला. 'सुखाची झलक दाखवा,' असे आवाहन करू लागला.

एका गावातले लोक त्याला म्हणाले, 'तुम्ही योग्य ठिकाणी आलात. असल्या विचित्र माणसांना सरळ करणारा एक माणूस आहे आमच्या गावात. एक फकीर आहे, त्याला भेटा.'

धनिक म्हणाला, 'पण मी विचित्र काय केले?'

गावकरी म्हणाले, 'पैसे देऊन सुख खरेदी करायला निघालायत आणि वर विचारताय? भेटा फकिराला. तोच ठीक करेल तुम्हाला.'

फकीर एका झाडाखाली बसला होता. धनिकाने त्याच्यासमोर थैली टाकली आणि म्हणाला, 'यात कोट्यवधींची संपत्ती आहे. ती घे आणि मला सुख मिळवून दे. सुखाची किमान झलक तरी दाखव.'

फकीर म्हणाला, 'एका मिनिटात दाखवतो.' त्याने थैली उचलली आणि धूम ठोकली.

आधी या धनिकाला कळेचना की काय झाले. जेव्हा कळले, तेव्हा तो ओरडू लागला... 'पळाला, पळाला, माझी हिरेमाणके घेऊन पळाला, चोर चोर...' हा त्याचा पुकारा ऐकल्यावर गावकरी गोळा झाले. त्यांना त्याने काय झाले ते सांगितले. सगळे फकिराच्या मागे धावू लागले. फकिराने सगळ्या गावाला सगळा गाव फिरवला आणि पुन्हा त्याच झाडापाशी आला. ती थैली त्याने होती तिथेच ठेवली आणि झाडामागे पळाला.

धनिक धापा टाकत झाडापाशी पोहोचला. त्याने थैली उचलून हृदयाशी कवटाळली. त्याचे मन आनंदाने भरून आले.

झाडामागून फकिराचा आवाज आला, 'झलक मिळाली?'

धनिकाने विचार केला, 'हो, खरेच किती सुख मिळाले ही थैली मिळाल्यावर.'

फकीर म्हणाला, 'ती थैली तुझ्यापाशी आधीही होती; पण, तू सुखी नव्हतास. ती हरवली, तेव्हा तुला तिची किंमत समजली. ती असण्यातील सुख समजले. आपण सुखातच जन्माला आलो आहोत.'

बोध : सुख आपल्यापाशी आहेच. ते हरवू दिले नाही, तर शोधायची वेळच येत नाही.

Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 09-01-2026 News publication date | Time: 01:32 PM News publication time | Views: 230 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news
Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 09-01-2026 News publication date | Time: 01:32 PM News publication time | Views: 230 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words