तुझे आहे तुझपाशी...

बोधकथा - ६

तुझे आहे तुझपाशी... मुख्य फोटो
तुझे आहे तुझपाशी... अतिरिक्त फोटो

एका राज्याची राणी आंघोळ केल्यावर आपल्या राजवाड्याच्या छतावर केस सुकवायला गेली. तिच्या गळ्यात हिऱ्याचा हार होता. तिने तो काढला आणि बाजूल ठेवून ती केस विंचरू लागली. इतक्यात एक कावळा आला. त्याने ती चमकदार वस्तू उचलली आणि उडून गेला. त्याने झाडावर बसून ते खाण्याचा प्रयत्न केला; पण शक्य झाले नाही. कडक हिऱ्यावर मारून चोच दुखायला लागली. शेवटी हार त्याच झाडावर ठेवून तो उडून गेला.

राणीचे केस सुकल्यावर ती हार घेण्यासाठी वळली; पण हार गायब होता. रडतरडत ती राजाकडे गेली आणि म्हणाली, की हार चोरीला गेला आहे, कृपया शोधावा.

राजा म्हणाला, 'कशाला काळजी करताय. आपण अजून एक करून आणू;' पण राणीला हे पटले नाही, तिने हट्ट केला, की तोच हार पाहिजे. आता सगळे जण शोधू लागले; पण हार कोणालाच सापडला नाही.

राजा कोतवालाला म्हणाला, 'हरवलेला हार शोधून आणा.' कोतवाल हैराण झाला? शिपाई, कोतवाल सगळेच शोधायला लागले.

राजाने घोषणा केली, की जो कोणी हार शोधून आणील, त्याला अर्धे राज्य बक्षीस म्हणून दिले जाईल. अर्धे राज्य मिळवण्याच्या लोभाने सर्व जण हार शोधू लागले. अचानक एका गलिच्छ नाल्यात कोणालातरी हार दिसला; पण दुर्गंधी येत होती. पाणी काळे होते. तरीही एका सैनिकाने उडी मारली. त्याने इकडे-तिकडे शोधले; पण काही सापडले नाही. हार कुठे गायब झाला कळले नाही.

त्यानंतर कोतवालाने ते पाहिले आणि त्यानेही उडी घेतली. दोघांना उड्या मारताना पाहिल्यावर अन्य काही उत्साही लोकांनीही उड्या मारल्या. मग मंत्र्यानेही उडी मारली. त्यामुळे त्या मार्गावर लोकांची गर्दी झाली. लोक येत राहिले आणि काढून उड्या मारत राहिले; पण कोणालाही हार मिळाला नाही. उडी मारल्यावर तो गायब होत होता. मग एकेक जण बाहेर येऊन उभा राहायचा. अंगभर घाण असलेले आणि दुर्गंधी येत असलेले लोक ओलेत्याने उभे होते. मंत्री, विद्वानही हार आणण्याच्या स्पर्धेत होते. इतक्यात राजाला ही गोष्ट कळली. त्याला वाटले, आपण त्यात उडी का टाकू नये? निदान आपण अर्धे राज्य गमावणार नाही. त्यामुळे राजानेही उडी मारली.

इतक्यात एक साधू तिथून जात होते. हे सारे पाहून ते हसायला लागले. हा कसला तमाशा? राजा, प्रजा, मंत्री, सैनिक - सर्व चिखलाने माखलेले होते. यात तुम्ही का उडी मारता आहात, असे त्यांनी विचारले. लोक म्हणाले, 'राणीचा हार चोरीला गेला आहे. तो या गटारात दिसतोच पण माणसाने उडी मारताच तो गायब होतो. तो हार कोणाच्या हाती लागत नाही.'

साधू हसायला लागले, 'अरे भाऊ! कुणी वर बघितले का? वर पाहा. तो हार एका फांदीवर लटकलेला आहे. तुम्हाला खाली दिसणारी त्याची छाया (सावली) आहे.'

ज्या गोष्टीची आपल्याला गरज आहे, जे आपल्याला मिळवायचे आहे, ज्यासाठी आपले हृदय तळमळत आहे - तो आनंद क्षणिक सुखांच्या रूपात हरवलेला, सावलीसारखा दिसतो आणि हे आपण पूर्ण करू असे वाटते. आपली इच्छा पूर्ण झाली, तर आपल्याला शांती मिळेल, आपण सुखी होऊ; पण जेव्हा आपण त्यात उडी मारतो तेव्हा आपल्याला ती आनंद आणि शांती मिळू शकत नाही.

बोध : सर्व संत-महात्मे आपल्याला एकच संदेश देतात की, शांती, आनंद आणि आनंदाच्या रूपातील हिऱ्यांचा हार, जो आपण सावलीप्रमाणे जगात मिळवण्याचा प्रयत्न करीत आहोत, तो बाहेर नाही तर आपल्यामध्येच सापडेल!

(संकलित)

Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 08-01-2026 News publication date | Time: 12:14 PM News publication time | Views: 175 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news
Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 08-01-2026 News publication date | Time: 12:14 PM News publication time | Views: 175 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 1 Comments

V
Vijay Joshi
09-01-2026 11:01 AM

बोधकथा सुंदर आहे...
धन्यवाद

Write a Comment
0 / 50 words