संतत्वाकडे जायच्या वाटेवर 'हा' साथीदार नको!

बोधकथा - ५

संतत्वाकडे जायच्या वाटेवर 'हा' साथीदार नको! मुख्य फोटो
संतत्वाकडे जायच्या वाटेवर 'हा' साथीदार नको! अतिरिक्त फोटो

एका विख्‍यात संताला भेटण्‍यासाठी एक राजा आला आणि म्‍हणाला, 'तुम्‍ही ज्‍या स्थितीमध्‍ये आहात, त्या स्थितीत मला घेऊन जा.' संताने म्‍हटले, 'महाराज मी तुम्‍हाला त्‍या अवस्‍थेत निश्चित तिथे घेऊन जाईन; पण माझी एक अट आहे. उद्या पहाटे चार वाजता तुम्‍ही एकटे माझ्या कुटीवर या.' राजा म्‍हणाला, 'ठीक आहे.'

दुसऱ्या दिवशी पहाटे राजा कुटीवर आला. कुटीच्‍या दारापाशी येताच राजाने संताच्‍या नावाने हाक मारली. त्‍याबरोबर आतून संताने विचारले, 'कोण आले आहे?' राजाने सांगितले, 'मी राजा आलो आहे.' संताने सांगितले, 'उद्या या.' राजाला विचित्र वाटले; पण तो तिथून निघून गेला.

दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता राजा एकटा पुन्‍हा कुटीपाशी गेला. त्‍याने हाक मारली. संताने तोच प्रश्न विचारला. राजाने या वेळी उत्तरात सुधारणा केली. 'मी राजा आलो आहे' हे वाक्य कदाचित त्यांना आवडले नसेल असे वाटून राजाने सांगितले, 'मी आलो आहे.' संताने सांगितले, 'उद्या या.'

तिसऱ्या दिवशी राजा पुन्‍हा गेला. दोन दिवसांप्रमाणेच घडले. या वेळी राजाने उत्तर दिले, 'मी आहे.' संताने पुन्‍हा त्याला उद्या यायला सांगितले.

राजा चौथ्‍या दिवशी मात्र विचारात पडला, की आता जावे की नाही. कारण काहीही उत्तर दिले तरी संत हाकलून देतात. त्‍यापेक्षा न जाणेच बरे या विचारात तो होता; मात्र आता तीन दिवस हाकलून दिले आहे, तर चौथ्‍या दिवशी जाऊन बघू असा विचार करून तो गेला. संताने आतूनच विचारले, 'कोण आहे?' या वेळी मात्र काय उत्तर द्यावे हे राजाला सुचले नाही. तो गप्प राहिला. मग काही क्षणातच आतून संत बाहेर आले. त्‍यांनी राजाला जवळ घेतले, घट्ट मिठी मारली आणि म्‍हणाले, 'राजन्, तुम्‍ही परीक्षेत उत्तीर्ण झालात. पहिल्या तीन दिवसांत तुमच्‍या उत्तरात 'मी आलो' असा उल्लेख होता; पण मी तर तुम्‍हाला एकट्यानेच बोलावले होते. तुम्‍ही तुमच्‍या 'मी'पणाला बरोबर घेऊन आला होतात.'

तात्‍पर्य : मानवी जीवनात या 'मी'पणाला काहीही स्‍थान नाही. 'मी'पणा सोडला, की खूप काही शिकावयास मिळते. ज्या दिवशी मानवाच्या 'मी'पणाचा मृत्‍यू होतो, त्‍या दिवशी तो संतत्‍वाकडे वाटचाल करू लागतो.

(संकलित)

Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 07-01-2026 News publication date | Time: 03:47 PM News publication time | Views: 290 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news
Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 07-01-2026 News publication date | Time: 03:47 PM News publication time | Views: 290 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words